गडचिरोलीच्या वाटेवर तलासरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020   
Total Views |

palghar_1  H x



‘भारताचे संविधान इथे चालणार नाही. इथे आमचे सरकार’ असा लाल रंगाचा ग्रामपंचायतीच्या बाहेर लागलेला बोर्ड एकवेळ काढताही येतो. मात्र, लोकांच्या मनात हिंसेच्या आधारावर बसवलेली राजकीय पकड कशी ढिली करायची, हाच तलासरीतला खरा प्रश्न आहे.



१६ एप्रिल हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याच नव्हे, तर रक्तरंजित शब्दात लिहिला जाईल. पालघर जिल्ह्यातील, तलासरी तालुक्यातील गडचिंचले या दादरा-नगरहवेली नजीकच्या गावात जे घडले, ते माणुसकीला काळीमा फासणारे तर होतेच; पण त्याचबरोबर अनेक प्रश्न निर्माण करणारे होते. निरागस, भोळाभाबडा आदिवासी इतका क्रूर का व्हावा, हा पहिला प्रश्न. त्या रात्री ती अफवा कोणी पसरवली, हा दुसरा प्रश्न आणि पोलिसांच्या लेखी ही साधी हत्येचीच केस होती का, हा तिसरा प्रश्न. घटनेच्या चार दिवस नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयात त्यांचा एक व्हिडिओ पेश केला. केवळ अफवेच्या आधारावर ही हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याला कुणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असेही बजावले. आपल्या या व्हिडिओत त्यांनी सांगितले होते की, “हा रस्ता पोहोचायला खडतर आहे.” पण, वस्तुस्थिती यापेक्षा निराळी होती. तीन दिवसांच्या पालघर जिल्ह्याच्या प्रवासात निर्माण झालेले प्रश्न केवळ साधूंच्या हत्येपर्यंत मर्यादित नव्हते. वस्तुस्थिती अस्वस्थ करणारी आहे आणि धोक्याची घंटा कधीच वाजायला लागली आहे. आपल्याला त्या साधूंपाशी कृतज्ञ व्हायला लागेल, ज्यांच्या आर्त किंकाळ्यांनी आपले लक्ष याठिकाणी वेधले गेले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘या घटनेला धार्मिक रंग नको,’ असे विधान केले होते. राज्यात कायदा-सुव्यवस्था स्थापित ठेवण्यासाठी राज्याचे विद्यमान प्रमुख म्हणून त्यांनी असे वागणे एखाद वेळी स्वीकारावे लागेल. पण, राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी ज्या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष केले तो विषय आहे, राजकीय हिंसेचा. होय, राजकीय हिंसा! साधूंच्या हत्या हा राजकीय हिंसेचाच एक भाग आहे. अशी हिंसा जी पद्धतशीरपणे राबविली जाते. स्थानिकांवर जरब बसविली जाते आणि माणसातल्या पशूला असे बळी देऊन कायम जागे ठेवते. अशा हिंसा कोण करते, त्याची रक्तरंजित वर्णने आपण पश्चिम बंगाल, केरळ आणि गडचिरोलीत ऐकलेली आहेत.
 
साधूंची हत्या झाली, त्या दिवशी गडचिंचले गावात एक अफवा होती. चोर येतात, लहान मुलांना घेऊन जातात किंवा किडन्या चोरतात. साधू दुर्दैवाच्या फेर्‍यात जाऊन अडकले ते याचमुळे आणि या अफवेमुळेच त्यांचा बळी गेला असे सांगितले जाते. दादरा-नगरहवेलीला जाण्याच्या प्रयत्नात असलेले साधू या गावात पोहोचले. सर्वात आधी त्यांना पकडण्यात आले आणि मारहाणही झाली. गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी त्यांना त्यावेळी वाचविले. तेथील वन विभागाच्या चौकीत आसराही मिळवून दिला. खुनाची घटना मात्र यानंतर घडली. ती किती वेळात घडली, याचे उत्तर कुणाकडेच नाही. पोलीस दप्तरी तशी नोंद नाही. पोलिसांच्या लेखी ते मदत करायला लगेचच पोहोचले होते. मात्र, त्या व्हिडिओंनी हा पोलिसी दावा पूर्णपणे उघडा पाडला. पोलीस पोहोचले, मात्र त्यांनी साधूंच्या रक्षणासाठी काहीच केले नाही. निरागस लहान मुलाप्रमाणे एक साधू पोलिसांच्या मागे दडत राहिला. पोलिसांनी त्याला त्या जमावाच्या ताब्यात सोपविले आणि जमावाने त्याचा बळी घेतला. पोलिसांच्या पहिल्या अधिकृत वार्तापत्रात ‘५०० लोकांनी एकत्र येऊन रचलेला कट’ असे या घटनेचे वर्णन केले आहे. गडचिंचले गावात आम्ही पोहोचलो. अशी घटना घडल्यानंतर एखाद्या दुर्गम गावाचे जे व्हायला हवे तेच इथेही झाले होते. गावात जितकी घरे नाहीत, त्याच्या पन्नासपट पोलीस छावणी लावून बसले होते. गावात अपेक्षित सन्नाटा. घरे रिकामीच; कारण हत्या उघडकीला आली आणि योगी आदित्यनाथांनी ट्विट केले आणि विषय देशभर पसरला. मग पोलिसी दमनचक्राला सुरुवात झाली. शंभरांहून अधिक आदिवासींना अटक करण्यात आली. यात व्हिडिओ पाहून आरोपी कोण याची साक्ष पटविण्यात आली आहे का? यासारख्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी समोर आलेली नाहीत.
 
धक्कादायक वास्तव


कायदा, तपास यासगळ्याच्या पलीकडेही अशी घटना घडली की, मुख्य प्रश्न येतो तो गुन्ह्यामागचा उद्देश. त्याच रात्री या गावाकडे येणार्‍या एका पोलीस वाहनाला रस्त्यावर झाडांचे ओंडके टाकून अडकविण्यात आले होते आणि ओलिसही धरण्यात आले होते. रस्त्यावर ओंडके टाकून पोलिसांना अडविण्याची ही पद्धत थेट डाव्यांची आणि तीसुद्धा नक्षलप्रभावित परिसरातली. इथेही असेच घडले होते. आदिवासी इतके हिंसक का झाले, या प्रश्नाचे उत्तर मग सापडायला सुरुवात होते. अशी घटना इथे पहिल्यांदा घडली का, असा प्रश्न इथल्या काही कार्यकर्त्यांना विचारला. असे कार्यकर्ते जे गेली अनेक वर्षे आदिवासींसोबत काम करीत आहेत. यातल्या प्रत्येकाने सांगितलेले वास्तव हे भीषण होते. हिंसा हा येथील नित्यनेमाने चालणारा प्रकार. त्याला किमान ४० वर्षांची परंपरा आहे. तलासरीच्या शिक्षण प्रकल्पावर झालेला डाव्यांचा हल्ला हा असाच भीषण होता. त्यातून कसेबसे बचावलेले कार्यकर्ते आजही हयात आहेत. दंतकथा वाटावी असे त्यांचे निवेदन असते. हे सारे कार्यकर्ते आजही तिथे भेटतात, ग्रामपंचायतीत निवडून आलेले लहान-मोठे राजकीय कार्यकर्तेेही आहेत. लोकशाही रुजविण्याच्या प्रक्रियेतला शेवटचा स्तर असलेला ग्रामीण भाग कसा हिंसेच्या छायेत वावरतो, याचे पुरावेच सापडले. विरोधी विचाराच्या मंडळींचे घर पेटविणे, वाहने जाळणे हे इथे नवीन नाही. गाईगुरांसारखी मुकी जनावरेही इथे वाचलेली नाहीत. पेटवापेटवी करणार्‍यांचे शहरी सहानुभूतीदार माध्यमांत बसलेले असतात. त्यामुळे त्यांना इथल्या कथा हिंसेच्या बळींपेक्षा क्रांतीच्या कथा वाटतात आणि त्यामुळे त्या कधीच बाहेरही येत नाहीत. मतांतराचे फसवून केल्या जाणार्‍या धर्मपरिवर्तनाचे येथील किस्से सुरुवातीला रंजक वाटतात. आजार मग तो कितीही दुर्धर असो, एका विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळी तुम्ही गेलात की तेलपाण्याच्या मिश्रणाने बरे होतात. येथील आदिवासींची नावेही सुरुवातीची इंग्रजीत. पण ही रंजकता संपते ती हिंसेच्या घटना ऐकल्या की...
 

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आमदारकीही मिळविण्यासाठी ‘विकास’ हा केंद्रीय मुद्दा असतो. इथे मात्र अद्यापही ‘हिंसा’च केंद्रस्थानी असते. पाड्यांवर रोजगार नसतो. मात्र, आदिवासींच्या डोक्यात धर्माच्या विरोधातले विष मात्र उत्तम कालवले जाते. ‘तुम्ही आदि काळापासून आले आहेत. आर्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. शहरातून येणार्‍यांचा आणि तुमचा काही संबंध नाही.’ त्यांना राम आणि रावण यांच्या कथा मग सांगितल्या जातात. हिंदू समाजातल्या सर्वच जातींमध्ये पंथांमध्ये, उपपंथांमध्ये सर्वमान्य असलेली देवता म्हणजे प्रभू रामचंद्र. मग त्याच विरोधातला रावण उभा करायचा. दलितांमध्ये रावणाच्या नावाने तो ‘धर्मात्मा’ होता हे जसे पसरविले जाते, तसेच आदिवासींमध्येही ‘रावणच तुमचा देव’ ही गोष्ट पसरविली जाते. यातून जे उभे राहते, ते केवळ भयंकर आहे. साधूंच्या हत्या हा तर हिमनगाच्या टोकाचा एक भाग आहे. डाव्या आणि कम्युनिस्टांच्या माध्यमातून निर्माण केले जाणारे हे वातावरण केवळ राजकीय नाही, तर ते समाज विघातकदेखील आहेत. इथे केवळ राजकीय संघर्ष उभे राहात नाहीत, तर त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही उभे राहतात आणि साधूंसारखे निष्पाप लोकही मारले जातात. गेली ३०-४० वर्षे हे सगळे सुरूच आहे. हिंसा, हिंसेच्या साहाय्याने टिकवून ठेवलेली राजकीय ताकद, हे केरळ, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये राबविले जाणारे ‘मॉडेल’ तलासरीमध्ये जोरात राबविले जात आहे. विद्यमान आमदार निवडून येण्यामागे या हिंसेचा मोठा हातभार आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा करूनच आता ही मंडळी आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहेत. पुढच्या वाढीसाठी त्यांना नव्या रक्तपाताची गरज आहे. तलासरीत जे सुरु आहे, ते दुर्लक्ष करण्यासारखे मुळीच नाही. सांस्कृतिक मूल्यांशी गल्लत करीत चाललेला हा हिडीस डाव अत्यंत क्लेेषकारक आहे.

अफवा पसरली आणि दुर्दैवाने साधूंच्या हत्या झाल्या, अशी प्राथमिक माहिती समोर आली. वरवर पाहता सगळ्यांना पटेल अशी ही माहिती खरी वाटावी अशीच आहे. अफवा होतीच, पण पंचक्रोषित त्यांनी जे पसरविले, ते त्याहूनही अवघड होते. अशाच अफवा अजूनही काही गावात होत्या लुईस काकड नावाच्या सरपंचाच्या खुनाचा डावही तलासरीत शिजत होता आणि तिथेही अशीच अफवा पसरविण्यात आली होती. आता या अफवा कोण पसरविते? अफवेला उत्तर देण्यासाठी हिंसा कोण घडवून आणतात? आणि त्यातून कुणाचे राजकीय भवितव्य उभे राहते? तलासरी आज एका भयंकर अराजकाच्या उंबरठ्यावर उभी आहे. डाव्यांचा वाढता हिंसक प्रभाव याला कारणीभूत आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईच्या जवळ निपजणारे ही नक्षल समकक्ष लोक कोणत्या क्षणी मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतील, हे सांगता येत नाही. या सगळ्याची उत्तरे शोधायची असतील, तर आता आदिवासींच्या मूळ हिंदू धर्मपरंपरांचे पुनर्जागरण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या नव्या संधी इथल्या तरूणांसाठी कशा उभ्या राहतील, हेदेखील पाहणे आवश्यक आहे; अन्यथा हे डावे तलासरीची गडचिरोली केल्याशिवाय राहणार नाहीत.

 
 
@@AUTHORINFO_V1@@