जागतिक वैद्यकशास्त्रात भारताचा आश्वासक चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

dr. soumya swaminathan_1&

डॉ. सौम्या स्वामीनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘डेप्युटी जनरल’ म्हणून नियुक्त होणार्‍या पहिल्या भारतीय. त्यानिमित्ताने या प्रख्यात वैद्यकीय संशोधक आणि आरोग्य धोरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्याविषयी जाणून घेऊया...

चीनच्या वुहान येथून सुरू झालेली कोरोनाची साथ आज संपूर्ण जगभरात पसरली आहे. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. अनेक विकसित आणि पुढारलेल्या देशात कोरोनामुळे मृत्यूसंख्या झपाट्याने वाढत असताना भारत मात्र कोरोनाशी लढा देत हा संसर्ग रोखण्यात आणि कोरोनाचा मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झाला. भारताच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण जगाने तसेच जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर भारत कोरोनावरील लस शोधण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केली. तेव्हा जाणून घेऊया या प्रख्यात वैद्यकीय संशोधक आणि आरोग्य धोरणतज्ज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्याविषयी...
डॉ. सौम्या स्वामिनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘डेप्युटी जनरल’ म्हणून नियुक्त होणार्‍या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. सौम्या या ’भारतीय हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन आणि शिक्षणतज्ज्ञ मीना स्वामीनाथन यांच्या कन्या. डॉ. सौम्या यांनी सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि नवी दिल्लीच्या ’अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाना’तून म्हणजे ‘एम्स’मधून एमडीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर त्यांनी ’नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन बोर्डा’चा डिप्लोमादेखील पूर्ण केला आहे. डॉ. सौम्या या ‘एचआयव्ही’ आणि क्षयरोगाच्या नावाजलेल्या संशोधक आहेत. डॉ. सौम्या यांना दोन भावंडे असून त्यापैकी मधुरा स्वामीनाथन या कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्था येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत, तर निथ्या स्वामीनाथन हे ’युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लिया’मध्ये ’लिंग विश्लेषण व विकास’ या विषयातील वरिष्ठ व्याख्याता आहेत.
डॉ. सौम्या यांनी यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. डॉ. सौम्या यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘डेप्युटी जनरल’ म्हणून ३ ऑक्टोबर २०१७ रोजी नियुक्ती करण्यात आली. डॉ. सौम्या या जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसर्‍या क्रमांकावरील प्रमुख संशोधक असणार्‍या पहिल्या भारतीय आहेत. त्यांनी ‘केडी स्कूल ऑफ मेडिसीन’, ‘दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठा’तील ‘चिल्ड्रन्स हॉस्पिटल लॉस एंजेलिस’ येथून ’बालरोग पल्मोनोलॉजी’मध्ये पोस्ट डॉक्टरेट मेडिकल फेलोशिपही घेतली आहे. चेन्नई येथील क्षयरोगावरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले ‘राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थे’चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘डेप्युटी जनरल’ पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक सल्लागार संस्था यांसारख्या संस्थेच्या समित्यांमध्येही काम केले आहे. डॉ. सौम्या यांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या विशेष कार्यक्रमात २००९ ते २०११ दरम्यान ‘युनिसेफ’, ‘युएनडीपी’, जागतिक बँकेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. २००९मध्ये त्यांची टीबी आणि फुप्फुसाच्या आजाराविरूद्ध संशोधन करणार्‍या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ’डब्ल्यूएचओ’ने डॉ. सौम्या यांची नियुक्ती करताना आपल्या घोषणेत म्हटले होते की, डॉ. सौम्या या क्षयरोग आणि एचआयव्हीवरील जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधक आहेत. त्यांच्या पाठीशी ‘क्लिनिकल केअर आणि संशोधन’ याचा तब्बल ३० वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विशेष कार्यक्रमांमध्ये संशोधनाचे भाषांतर करण्याचे काम प्रभावीपणे पार पडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग आणि आजारामुळे होणारे मृत्यू यावर नियंत्रण ठेवल्याबद्दल भारताचे म्हणजे आपल्या मायभूमीचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी ऑनलाईन संबोधनात डॉ. सौम्या म्हणाल्या, ’‘हा संसर्ग रोखण्यासाठी यापुढील अनेक महिने किंवा कदाचित अनेक वर्षे जगाने सज्ज असले पाहिजे. हा आजार ’लसीकरण व चाचणीपुरता’ मर्यादित असू शकत नाही. मुख्य म्हणजे लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तसेच आरोग्य यंत्रणेद्वारे मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे, ही यात महत्त्वाची बाब आहे. आज बर्‍याच शहरी भागात जास्त लोकसंख्या, जास्त गर्दी आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवांचा अभाव यांसारख्या समस्यांचा भारताला सामना करावा लागत आहे. अशावेळी आपणास सार्वजनिक आरोग्य, देखभाल, प्राथमिक आरोग्य सेवा आणि आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.”
आतापर्यंत विविध क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सौम्या यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी १९९९मध्ये ‘इलेव्हन नॅशनल पेडियाट्रिक लंग कॉन्फरन्स’मध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सादर केल्याबद्दल डॉ. के. लाहिरी सुवर्णपदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’, २००८मध्ये ’कनिष्क एक्सेंट पुरस्कार’ आदी अनेक महत्त्वपूर्ण पुरस्काराने त्यांता सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या संकटात जागतिक आरोग्य संघटनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आणि भारताने कोरोना नियंत्रणात बजावलेल्या भूमिकेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली दखल ही डॉ. सौम्या यांच्यासाठी खरी कौतुकाची पावती. वडिलांप्रमाणेच जागतिक पटलावर आपल्या संशोधन कार्याने भारताची मान अभिमानाने उंचावणार्‍या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा...!
@@AUTHORINFO_V1@@