‘माय ग्रीन सोसायटी’चा अण्णपूर्णेचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020   
Total Views |
my green society _1 




केशवसृष्टी’अंतर्गत ‘माय ग्रीन सोसायटी’ ही संस्था पर्यावरणाशी संबंधित काम करत होती. पण कोरोनाच्या आपत्तीकाळात संस्थेने समाजाच्या ‘रेड’ समस्यांना सोडवून नागरिकांचे आयुष्य ‘ग्रीन झोन’मध्ये कसे आणता येईल, यासाठी अतुलनीय काम केले आहे. ‘माय ग्रीन सोसायटी’ने ‘लॉकडाऊन’च्या काळात समाजासाठी केलेल्या कामाचा हा घेतलेला मागोवा.

 
 
 
 

मुंबई (योगिता साळवी) -  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहराला कचरामुक्त बनवणे, सगळ्या शहरांमध्ये चैतन्ययुक्त जीवन पुन्हा आणणे, प्रत्येक शहरवासीयांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण यासंदर्भात जागृती आणणे, शहरामध्ये पर्यावरणयुक्त वातावरण निर्माण करणे, पर्यावरणशील शहर म्हणून जगभरात शहरांची गणना व्हावी, यासाठी काम करणे यासाठी ‘माय ग्रीन सोसायटी’ काम करायची. पण ‘लॉकडाऊन’ झाले आणि ‘माय ग्रीन सोसायटी’च्या कामाची व्याप्ती वाढली. आज संस्था मुंबई भर दीड लाख अन्नाची पॅकेट्स वितरीत करत आहे. मरिनलाईन्स पासून शीव, घाटकोपर, विक्रोळी ते अंधेरी, गोरेगाव, मालाड वगैरे ठिकाणी ‘माय ग्रीन सोसायटी’च्या अंतर्गत 35 मध्यवर्ती स्वयंपाकगृहे सुरू आहेत. इथे दिवसाला तीन हजार ते 30 हजार अन्नाची पॅकेट्स बनवली जात आहेत. हे अन्न गरजू गरिबांना वितरीत केले जाते. यासाठीही रचना लागली आहे. रा. स्व. संघ, जनकल्याण समिती, श्री राजस्थानी सेवा संघ, रोटरी क्लब, श्री जगदीशजी झाबरमल ट्रस्ट एस्सेल वर्ल्ड, मिनी पंजाब केटरर्स, श्री हरि सत्संग समिती, समस्त महाजन जैन, अग्रवाल, माहेश्वरी समाज भाग वत परिवार, अभिमान, राधा स्वामी सत्संग, पंचायती सेवा ट्रस्ट, मेकिंग द डीफरन्स, विश्व हिंदू परिषद सारख्या संस्था आणि व्यावसायिक यामध्ये जोडले गेले. तसेच ‘माय ग्रीन सोसायटी’ने शेकडो गरजूंना रेशन किटही वितरीत केले. इतकेच नव्हे, तर ‘कोरोना योद्धा’ असलेल्या डॉक्टर्सना ‘पीपीई किट’ वाटप, आयुष मंत्रालयाने सांगितलेले प्रतिकारशक्तीवृद्धी करणार्या गोळ्यांचे वाटपही केले.
 
 
 
 
अर्थात कोणतेही काम उभे राहते तेव्हा त्याची एक सुरुवात असते. ‘माय ग्रीन सोसायटी’चे ‘लॉकडाऊन’ दरम्यानचे जे काम सुरू झाले, त्यासाठीही एक सुरुवात आहे. पर्यावरणासाठी काम करताना ‘माय ग्रीन सोसायटी’च्या पदाधिकार्यांचे शहरातील वस्तीपातळीवर काम करणार्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला होता. सार्वजनिक शौचालय आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्या अनेक संस्थांशीही संबंध आलेला. पहिले ‘लॉकडाऊन’ व्हायच्या आधी एक दोन दिवसांपूर्वीच शहरांमध्ये अनेक व्यवसाय धंदे बंद झाले होते. तिथे काम करणारे लोकांची रोजीरोटी बंद झाली होती. या लोकांना मदत करायला हवी. ‘माय ग्रीन सोसायटी’ने कार्यकर्त्यांना अशा गरजू व्यक्तींची यादी बनवायला सांगितली. या लोकांना मदत करण्यासाठी आर्थिक मदतही हवी होती. सुशीलजींनी ही मदत मिळवण्यासाठी मोजून काही जणांशी बोलणी केली. काय कमाल! केवळ चार-पाच तासांत हजारो गरजूंना अत्यावश्यक वस्तू वितरीत करता येईल, इतकी रक्कमही उभी राहिली. ‘माय ग्रीन सोसायटी’ने या लोकांची यादी बनवून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरणही केले. सुशीलजी म्हणतात, “नि:स्वार्थी आणि आपल्या समाजबांधवासाठीचे काम होते म्हणून समाजातीलच बांधवांनी तत्काळ आर्थिक मदत केली.”
 
 
 
 
त्यातच सुशील जाजूंना एक अनुभव आला. गोरेेगावच्या एका सिग्नलसमोर एक मेडिकल दुकान होते. त्या मेडिकलवाल्याने त्यांना सांगितले की, “या सिग्नलला 50 ते 60 लोक भीक मागायचे. त्यात महिला पुरुष आणि लहान मुलेही. ‘लॉकडाऊन’च्या पूर्वी सिग्नलवर गाड्या थांबायच्या त्यांना भीकही मिळायची. आता ‘लॉकडाऊन’मुळे गाड्याच नाहीत. यांना भीक कुठून मिळणार?आजूबाजूचे सगळेच बंद. त्यामुळे यांना प्यायला पाणीही मिळत नाही. हे लोक दोन-तीन दिवस असेच उपाशीतापाशी सिग्नलच्या आजूबाजूला बसले आहेत.” सुशीलजींनी पाहिले तर दृश्य होते,आठ-दहा जणांचे घोळके करून लोक बसलेले. कित्येक दिवस अंघोळ नसेलच, पण किमान एक-दोन दिवस अन्नपाण्यावाचून तळमळत असलेले लोक. चेहर्यावर मरणकळाच. हे दृश्य पाहून सुशीलजी हादरून गेले. बापरे, एक-दोन दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मध्ये या बेघर असलेल्या लोकांची ही परिस्थिती आहे. पुढे काय होणार? अन्नपाण्याविना किती दिवस हे तग धरणार? बरं, मुंबईत असे कित्येक लोक असतील की ज्यांना घरदार नसेल, भीक मागून किंवा तत्सम काम करून ते पोट भरत असतील. त्यांचे काय? त्या क्षणापासून ते दृश्य सुशीलजींच्या डोळ्यासमोरून हटायला तयार नव्हते. सुशीलजी आणि ‘माय ग्रीन सोसायटी’ने यावर काम करायचे ठरवले. ‘माय ग्रीन सोसायटी’चे काम करताना महानगरपालिकेशी चांगलाच संपर्क होता. सुशीलजींनी महानगरपालिकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यांना बेघर असलेल्या लोकांच्या समस्या सांगितल्या. ‘लॉकडाऊन’च्या काळात आपण काय करू शकतो, याबद्दल विचारले. अधिकार्यांनी उत्तर दिले, “मुंबईत किमान 50 हजार बेघर असतील.” यावर ‘माय ग्रीन सोसायटी’ने या लोकांना दोन वेळचे अन्न देण्याचे ठरवले. महानगरपालिकेच्या अधिकार्यांनीही चांगले सहकार्य केले. 27 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत महानगरपालिकेला ‘माय ग्रीन सोसायटी ’ अन्नाची 50 हजार पाकिटे वितरीत करत होती. पण त्यानंतर महानगरपालिकेने स्वत:ची स्वतंत्र व्यवस्था सुरू केली.
 
 
 
 
मुंबईतल्या गरजू आणि गरीब लोकांना किमान दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी हजारो लोक स्वयंप्रेरणेने जोडले गेले आहेत. अन्न बनवून त्या त्या बांधवांपर्यंत पोहोचवावे, ही संकल्पना आहे. यासाठी विशाल टिबे्रवाल यांनीही पुढाकार घेतला. टिब्रेवाल कुटूंबीयांचा ट्रस्ट आहे आणि महाविद्यालयही. त्या महाविद्यालयात एक मुख्य किचन सुरू झाले. तिथे हजारो लोकांचे अन्न बनते, तर एस्सेल वर्ल्डच्या यांनीही समाजकार्यांसाठी अमूल्य मदत केली. ‘लॉकडाऊन’मुळे एस्सेल वर्ल्ड बंद आहे. तिथे मोठे स्वयंपाकघर आणि व्यवस्थाही आहे. सुशीलजी एस्सेल वर्ल्डच्या संबंधितांशी या अन्नवितरण संकल्पनेविषयी बोलले. आज तेथून हजारो लोकांसाठी अन्न बनवले जाते आणि वितरणही केले जाते. जैन समाज, समस्त महाजन संस्थेनेही वेगळाच उपक्रम करत अन्नदानात सहयोग केले. या संस्थेने परिसरातील लोकांना दररोज पाच पोळ्या द्यायला सांगितल्या. दररोज 30 हजार पोळ्या यातून त्यांना मिळतात. त्या पोळ्या ते ‘माय ग्रीन सोसायटी’च्या अन्नदान संकल्पनेस देतात. 27 मार्चपासून सुरू झालेला अन्नदान यज्ञ द्रौपदीची थाळीच आहे. आजपर्यंत एकदाही या सत्कार्यात खंड किंवा अडचण आली नाही. दिवसाला दीड लाख अन्नाची पाकिटे बनवणे, शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या,सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते हजारो लाखो गरजूंना पोहोचवणे हे सोपे काम मुळीच नाही. पण हे काम सुरळीत सुरू आहे. स्वयंपाक बनवताना या 35 स्वयंपाकगृहांना अडचणी आल्याच नाहीत आणि आल्या तरी चुटकीसरशी सुटल्या. हे सगळे करण्याचा एक मिनी पंजाब केटरर्स सोडले तर कुणालाही अनुभव नव्हता. पण हे अन्नदान सुरू आहे. तेही घरच्या स्नेहाने आपलेपणाने. याचे रहस्य काय? तर ‘माय ग्रीन सोसायटी’चे कार्यकर्ते सांगतात की, “पहिल्या दिवशी आम्ही अंधेरीला 20 हजार लोकांसाठीच अन्न बनवत होतो. काही अनुभव नाही. कसे आणि कुठपर्यंत हे अन्नदान सुरू राहणार, असे काही निश्चित नव्हते. साधारण दिवे लागणीची वेळ. लक्ष्मीचीच वेळ. अन्न बनवायला सुरुवात करणार होतो. इतक्यात एक महिला तिथे आली. अतिशय साधी गृहिणी. तिच्या हातात एक पिशवी होती. ती म्हणाली, तुम्ही गरजूंसाठी स्वयंपाक बनवता. मलाही त्यात धान्य द्यायचे आहे. तुम्ही खूप चांगले काम करणार आहात. असे म्हणत तिने किलोभर तांदूळ आम्हाला दिले. एकही शब्द न बोलता ती निघून गेली. त्या महिलेने दिलेले धान्य म्हणजे सत्कार्याची भावना होती. तिचा आमच्या कार्याला आशीर्वादच होता. ती अन्नपूर्णादेवीच असावी. तिच्या आणि लाखो लोकांच्या आशीवार्दाने आज हे सेवाकार्य सुरू आहे.” ‘माय ग्रीन सोसायटी’चे हे सेवाकार्य ‘लॉकडाऊन’च्या काळातले अत्यंत संवेदनशील कार्य आहे. समाजाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर ‘तमसोमा ज्योतिर्गमय’ म्हणत ‘माय ग्रीन सोसायटी’ने स्वत:च शोधली आहेत. ‘माय ग्रीन सोसायटी’च्या कार्याला अभिवादन..!
संपर्क :- सुशील जाजू , 9821092326
@@AUTHORINFO_V1@@