वात्सल्यमूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020
Total Views |
mother day _1  

प्रत्येक भारतीय आपले राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आपल्या देशाचं नाव ‘भारतमाता’ म्हणून आदराने घेऊन व्यक्त करतो.

डॉ. स्मिता माळवदे - सर्व प्रथम सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या जगातील सर्वच मातांना माझा आदरपूर्वक नमस्कार. भारत देशात आपण मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी ‘मातृदिन’ नुकताच साजरा केला. प्रत्येक भारतीय आपले राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आपल्या देशाचं नाव ‘भारतमाता’ म्हणून आदराने घेऊन व्यक्त करतो. ही आपली संस्कृती. महाराष्ट्राच्या हृदयावर अधिराज्य गाजवणार्‍या शिवबाच्या हृदयात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी एक माताच तर होती म्हणूनच राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचे, समतेचे संस्कार करणारी सावरकरांची आई राधाबाई आणि आजच्या काळातील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या सर्व आदरणीय आहेतच, पण आत्ताच्या काळातील कुटुंबाच्या भवितव्यासाठी आपल्या बाळाला बेबी सिटिंगमध्ये ठेवून घराबाहेर पडणारी स्त्री हीसुद्धा माझ्यासाठी तितकीच आदरणीय माता आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा यांनी आईवडिलांना फेरी मारुन संपूर्ण विश्वाला फेरी मारण्याचे पुण्य प्राप्त केले आणि मातापित्यांच्या पायाशी स्वर्ग असतो हा मोलाचा संदेश जगाला दिला. पण आपलं हे दुर्दैव म्हणावे लागेल की, आज भारतात सर्वात जास्त वृद्धाश्रम जर कुठे असतील तर ते महाराष्ट्रात. म्हणूनच मला वाटतं,
 
एक दिवसाचा दिखाव्याचा
नसावा मातृदिन - पितृदिन
तो असावा हृदयात वसलेला
जीवनभरासाठीचा मातृपितृदिन
आज मी यानिमित्ताने माझ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करत आहे.
आई माझी गुरु, आई कल्पतरु
प्रेमाचे माहेर, अमृताची धार
आईच माझी.
 
 
 
देवगुरु व्यास म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. सर्व गोष्टी माणूस पैशाने विकत घेऊ शकतो, पण आपल्याला मिळत नाही ती एकच गोष्ट ती म्हणजे आईचे प्रेम. म्हणूनच तर कवी माधव ज्युलियन यांच्या कवितेतील पोरका तरुण म्हणतो, ‘विद्याधन प्रतिष्ठा लाभे आता मलाही, आईविना परी मी पोरकाच राही’. खरंच विद्या, धन, प्रतिष्ठा सर्व मिळवता येत पण आई मात्र नाही. जशी फुलांशिवाय बागेला शोभा नाही तशी आईशिवाय घराला शोभा नाही.”
‘आई’ या शब्दातील ‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ व ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर.’ यावरुनच आईची पवित्रता व महानता लक्षात येते. या मर्त्य जगात चिरंतन सत्य एकच आहे ते म्हणजे आपली आई. mother is only truth. आई हिच परमगुरु आहे. आईची तुलना दुसर्‍या कोणत्याही गुरुशी होऊ शकत नाही.
 
 
गुरुकडे जाऊन अनेक विद्या शिकता येतात. शालेय जीवनाचा अभ्यास कसा करावा, व्यायाम कसा करावा, विविध कला सर्व गोष्टी शिकता येतात. परंतु प्रत्यक्ष जीवन कसे जगावे आणि यशस्वी कसे व्हायचे हे आईच शिकवते. स्त्रीची जी अनेक रुपे आहेत त्यात जगत् जननी किंवा माता हे सर्वात मोठे आणि अतिशय महत्त्वाचे आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते, माँ तुझे सलाम. खरोखरच आईशिवाय मला माझे अस्तित्वच शून्य आहे असे वाटते. आई नसती तर आपण हे सुंदर जग पाहूच शकलो नसतो. आईचे प्रेम आपल्याला जन्मतः प्राप्त झालेले असते, म्हणूनच आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. बाळाची चाहूल लागल्यापासून आई त्याची काळजी घेऊ लागते. आपल्या बाळाची भूक, झोप त्याच्या सार्‍या सवयी तिला ज्ञात असतात. म्हणूनच बाळाच्या ओढीने हिरकणी गवळण अवघड कडा उतरुन खाली आली. आईचं प्रेम आणि त्या प्रेमाची ताकद असाध्य गोष्टीही साध्य करुन दाखवते हेच यावरून लक्षात येत. आईमध्ये दूरदर्शीपणा संस्कार देणार्‍या गुरुची ताकद असते. आई म्हणजे चैतन्य. ज्याचे विचार सुंदर तोच सुंदर. देह सजवला म्हणजे आपण सुंदर झालो असे नाही. विचारांचे, कृतींचे, गुणांचे सौंदर्य आपणास आपल्या आईकडूनच मिळते. आई या दोन अक्षरी शब्दांत सारे विश्व सामावले आहे. माया, ममता, वेळ पडता कठोरता, वात्सल्य, आनंद, समाधान या सर्व भावभावनांचे मिश्रण म्हणजे आई.
 
 
कुपुत्रो जायते क्वचिदपि
कुमाता न भवति।
पुत्र म्हणजे मुलगा एकवेळ कुपुत्र निपजणे शक्य आहे पण माता ही कधीच कुमाता नसते. जन्मानुजन्म माझा प्रत्येक श्वास फक्त आईमुळेच आहे. मातृत्व आईपण यातील ‘आई’ या शब्दात प्रचंड ताकद असते.
आई! दोन अक्षरांनी बनणारा हा शब्द बाळासाठी खर्‍याखुर्‍या प्रेमाचा महासागर. प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमच दर्शवणारा शब्द म्हणजे आई. तेही नि:स्वार्थ प्रेम. ज्या प्रेमात कशाचीही अपेक्षा नाही. कोणतेही मागणे नाही. आपण प्रत्येकजण आईच प्रेम अनुभवतो. गर्भात बाळ राहिल्यापासून आई आपल्या बाळावर ते बाळ मुलगा आहे की मुलगी हे न पाहता निरागसपणे प्रेम करते. आईचं प्रेम पाठीशी असल्यावर इतर कशाचीही आवश्यकता नसते, आईच्या प्रेमात एवढी जबरदस्त ताकद असते. चंदनाला कितीही घासा ते सुवासच देते, ऊसाला कितीही तोडा तो गोडवाच देतो, आईचेही अगदी तसेच असते, तिच्याशी कसेही वागा ती फक्त प्रेमच करते.
 
 
 
आईचं हे प्रेम केवळ मानवातच आढळतं असं नाही तर पशू, पक्षी, सारे प्राणी यांतील माता एकाच भावनेने ओथंबलेल्या असतात.
घार उडते आकाशी
चित्त तिचे बाळापाशी
घार आकाशात उंच उडत असते पण तिचे चित्त आपल्या बाळापाशी असते. पाण्यात कासवी आपल्या बाळापासून दूर असते पण आपल्या दृष्टीने ती आपल्या बाळांवर प्रेम करते. त्यांना मोठे करते. कोंबडी दाणे टिपत असते पण काही धोका आहे असे वाटले तर धावत जाऊन पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते. आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी मांजरी त्यांच्या जागा दहा वेळा बदलते. घरातील पाळलेली कुत्री रोज सर्वांच्या अंगावर उड्या मारणारी पण तिची पिल्ले लहान असताना ती कोणाला जवळ फिरकूही देत नाही. स्वतःच्या पिल्लांना धोका आहे असे वाटताच सर्पिण आपली पिल्ले गिळते आणि धोका टळला अशी खात्री झाली की ती पिल्ले तोंडातून बाहेर सोडते.
 
 
असे हे मातृप्रेम. कवींनी त्याचे वर्णन वात्सल्य या शब्दात केले आहे. पण प्रसंगी ती माता एखाद्या सौदामिनी सारखी संतप्त होते आपल्या बाळाला ती कठोरातील कठोर शिक्षा देते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मदर इंडिया चित्रपट. यात आपल्याला कर्तव्य कठोर मातेचे दर्शन घडते. जेव्हा माता आपल्या बाळाला शिक्षा करते तेव्हा ती अप्रत्यक्षपणे स्वतःला ही शिक्षा करत असते. आपल्या बाळाला उपाशी ठेवले तर मातेच्याही घशाखाली घास उतरत नाही.
आई म्हणजे संततीची सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक होय. संततीच्या चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहित करण्यासोबत तिच्या अवखळ बुद्धीवर, उच्छृंखल मानसिकतेवर विवेकाचा लगाम लावणे हेही आईचे कर्तव्य असते. आपल्या संततीच्या सुकोमल मनात उत्तम संस्कारांचे बियाणे रुजवणे आपल्या नेटक्या संगोपनाने मुलांची जोपासना करणे व समाज निर्मितीस मदत करणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य असते आणि ते ती पारही पाडत असते.
 
 
मातेचे हे आपल्या मुलांवरील प्रेम कधीच आटत नाही ते परतफेडीची अपेक्षा करत नाही. भेदभाव बाळगत नाही. उलट आपल्या चार मुलांत एखादे मुल अपंग, दुबळे असले तर आईला त्याची विशेष काळजी वाटते, म्हणूनच तर मतिमंद मुलाचे आपल्या मागे कसे होणार या विचाराने त्याची माता अस्वस्थ होते. कवी मोरोपंतांनी मातेच्या प्रेमाची महती जाणली होती म्हणूनच ते म्हणतात,
प्रसादपट झाकिती परी
परा गुरुंचे थिटे
म्हणून म्हणती भले न
ऋण जन्मदेचे फिटे॥
परमप्रिय गोष्टींची बरोबरी माणूस आईशी करतो. शेतकरी आपल्या जमिनीला काळी आई म्हणतो तर वारकरी विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साद घालतात आणि ज्ञानेश्वरांसारख्या बालयोग्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर माऊली दिसते.
शेवटी मला एवढंच सांगावसं वाटत, आईच्या पायाशी स्वर्ग असतो. माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका निरंतर माझ्या आईला प्रणाम करतो. आई तुला कोटी कोटी प्रणाम.
 
 
डॉ. स्मिता माळवदे- 9270217301
@@AUTHORINFO_V1@@