ईश्वराचे व्यापकत्व आणि त्यागपूर्वक उपभोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020
Total Views |


adya aradhya_1  


ईश्वर हा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेष या पाच क्लेशांपासून, पुण्य व पाप कर्मांपासून, सुखात्मक व दुःखात्मक कर्मफळां (विपाकां) पासून आणि त्यापासून निर्माण झालेल्या, आशयां (वासनां) पासून पूर्णपणे रहित (वेगळा) असलेला चेतनतत्त्वस्वरुपी असा विशेष शक्तियुक्त परमश्रेष्ठ आहे. जगातील प्रत्येक जागा भगवंताने व्यापलेली आहे. असे कोणतेही स्थान नाही की, जिथे तो ईश्वर नाही.



ईशा वास्यमिद्ँ सर्वं यत् किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥

(यजुर्वेद - ४०/)



अन्वयार्थ


हे मानवा! (जगत्याम्) या गतिमान सृष्टीत
, ब्रह्मांडामध्ये (यत्) जे (किञ्च) काही (जगत्) जड व चैतन्यदायी जग किंवा गतिशीलता दृष्टीस पडते. (इदं सर्वम्) हे, ते सर्व काही (ईशा) परमेश्वराद्वारे (वास्यम्) व्यापलेले, आच्छादलेले, परिपूर्ण आहे. (तेन) म्हणून त्या जगाच्या साहाय्याने तू (त्यक्तेन) त्यागपूर्वक, अपरिग्रहवृत्तीने सर्व सुखांचा (भुञ्जीथाः) उपभोग घे. (मा गृधः) लोभ धरू नकोस. कारण, (धनं) हे धन (कस्य स्वित्) कोणाचे आहे? म्हणजे कोणाचेच नाही किंवा कोण्या एकाचे नाही!


विवेचन


यजुर्वेदाचा शेवटचा चाळीसावा अध्याय हा
ईशोपनिषद्म्हणून ओळखला जातो. ११ उपनिषदांमध्ये सर्वात प्रथम असलेले हे उपनिषद आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. यातील वरील पहिला मंत्र सर्वांना सुपरिचित असा आहे. यात परमेश्वराचे व्यापक स्वरूप रेखाटले असून मानवाने त्याला साक्षी मानून कसे जगावे, याचेही सुंदर विवेचन या मंत्रात दृष्टीस पडते.


पहिल्या चरणात ईश्वर हा जगातील अणुरेणूत सामावलेला असून त्याच्या दिव्यत्वाने ही सृष्टी आच्छादलेली आहे. एकही अशी जागा किंवा स्थलविशेष नाही की
, जिथे भगवंताचा वास नाही. तो जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, आकाशी व ब्रह्मांडी विद्यमान आहे. वस्तू कोणतीही घ्या. ती जड असो की चेतन, तिथे भगवंताचे अस्तित्व विद्यमान आहे. जगत्यां जगत्म्हणजे या समग्र निसर्गशक्तीमध्ये अथवा सृष्टीमध्ये दृष्टीस पडणारे व अनुभवास येणारे सजीव व निर्जीव विश्व! असे हे दोन्ही प्रकारचे विश्व गतिशील आहे. म्हणूनच आपण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहेअसे म्हणतो. पंचमहाभूतांपासून बनलेली ही सृष्टी उत्पत्ती, स्थिती व प्रलय या तीन अवस्थेतून जाते. अगदी अनादी काळापासूनचा हा प्रगती व र्‍हासाचा नियम आहे. गच्छति इति जगत् ।म्हणजेच जे गमनशील असते, ते जग होय. यामध्ये वृद्धी व विनाश या गोष्टी आल्याच. आचार्य यास्क यांनी वार्ष्यायणींचे मत व्यक्त करताना जगाच्या परिवर्तनाचे पुढीलप्रमाणे सहा भावविकार व्यक्त केले आहेत-



) जायते - जन्माला येणे २) अस्ति - स्थितीरूप होणे (अस्तित्व) ३) विपरिणमते - परिणाम पावणे (बदल होणे) ४) वर्धते - वाढ (विकास) होणे ५) अपक्षीयते - क्षीण (र्‍हास) होणे ६) विनश्यति - नाश पावणे. या जगातील सर्वच जड व चेतन वस्तूंना या सहा विकारांतून मार्गक्रमण करावेच लागते. अशा या जगाचे संचालन आपोआप कसे काय होते? कोणीतरी एक महाचैतन्य व दिव्य शक्ती या ब्रह्मांडाला संचालित करणारच! पण, ती काय लहानसहान थोडीच असणार? तिचे नाव आहे - ईश! जो सर्वदृष्टीने ऐश्वर्यसंपन्न असतो, तो ईश! त्यालाच ईश्वरअसे म्हणतात. अशा ईशाने हे सारे जग व्यापलेले आहे. तो एकदेशी किंवा एकस्थानी नव्हे, तर चहुकडे भरून उरलेला आहे. त्याविषयी म्हटले आहे- सर्वः सऽओतः प्रोतश्च विभुः प्रजासु ।’ (यजु. ३२/अथर्व ८)



तो सर्वव्यापक परमेश्वर समग्र प्राणिसमूहामध्ये ओतप्रोत आहे. तो
अणोरणीयान् महतो महीयान्।म्हणजेच अणूपेक्षाही सूक्ष्म आणि मोठ्यात मोठा आहे. योगदर्शन ग्रंथात महर्षी व्यास ईश्वराविषयीचे स्वरूप विशद करताना म्हणतात-


क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः ।

अर्थात ईश्वर हा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेष या पाच क्लेशांपासून, पुण्य व पाप कर्मांपासून, सुखात्मक व दुःखात्मक कर्मफळां (विपाकां) पासून आणि त्यापासून निर्माण झालेल्या, आशयां (वासनां)पासून पूर्णपणे रहित (वेगळा) असलेला चेतनतत्त्वस्वरुपी असा विशेष शक्तियुक्त परमश्रेष्ठ आहे. जगातील प्रत्येक जागा भगवंताने व्यापलेली आहे. असे कोणतेही स्थान नाही की, जिथे तो ईश्वर नाही. संत तुलसीदास म्हणतात-



हरि व्यापक सर्वत्र समाना । प्रेम से प्रकट हो मैं जाना ॥


तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणतात-
सबाह्य अभ्यंतरी, अवघा व्यापक मुरारी।संत तुकारामांनी याच ईश्वरीय व्यापकतेविषयी म्हटले- अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा।अशा कणांकणांमध्ये व्यापक अस्तित्व असलेल्या प्रभू परमेश्वराला सोडून किंवा त्याचेपासून लपवून कोणतेही इष्ट व अनिष्ट कार्य होऊच शकत नाही. सारे चराचर विश्व त्या महान परमशक्तीशिवाय शून्य आहे. निसर्गातील प्रत्येक तत्त्वामधील ईश्वराचे अधिष्ठान हे त्याच्या दिव्यत्वाचे दर्शन घडविणारे आहे. म्हणून कविवर्य मंगेश पाडगावकरांची काव्यप्रतिभादेखील तोच वैदिक ईश्वरीय व्यापकभाव व्यक्त करते-

झाडफुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून,

वर्षाकाळी पाऊसधारा, तुला न दिसला त्यात इशारा!

काय तुझा उपयोग आंधळ्या, दीव असून उशाशी,

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी


परमेश्वराने जगातील प्रत्येक मानवाला आनंदाने जगण्याचा व उपभोगण्याचा अधिकार प्रदान केला आहे. त्याबरोबरच त्याकरिता स्वातंत्र्यदेखील बहाल केलेय. पण
, यासाठी काही सीमारेषाही ओढून ठेवल्या आहेत. मंत्राच्या दुसर्‍या चरणातील मोलाचा अंश आहे- तेन व्यक्तेन भुञ्जीथाः।अरे माणसा! त्या जगातील गतिशीलतेच्या त्यागाच्या साहाय्याने सर्व पदार्थांचा व सुखांचा उपभोग घे, पण तोदेखील त्यागपूर्वकच! ज्या ज्या वस्तू किंवा पदार्थ आहेत, त्यात त्यागाची भावना दिसून येते. सृष्टीतील तत्त्वे समर्पण, त्याग व परोपकाराच्या कार्यात मग्न आहेत. पृथ्वी, सूर्य, चंद्र, समुद्र, पर्वत, नद्या-नाले, झाडे, लता-वेली हे सर्व त्यागाची ज्वलंत प्रतीके! यांनी स्वतःसाठी कधी काहीच केले नाही. म्हणून मानवानेदेखील भोगताना त्यागाची उदात्त भावना अंगिकारली पाहिजे. सार्‍या गोष्टींना उपभोग घ्यायचा, पण तो मर्यादेत राहून! मर्यादेला बांध फुटला की, धरणे ही गावांना, शेतीला उद्ध्वस्त करतात. तद्वतच विविध भोग्यपदार्थांचा उपभोग घेताना मानवाने कधीही अगतिकता करता नये, अन्यथा हानी अटळ! शारीरिक, वैयक्तिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय आरोग्याची काळजी घेण्याकरिता त्यागपूर्वक उपभोगाचे तत्त्व अवलंबणे ही काळाची गरज आहे. कारण, केवळ भोग हा दुःख व विनाशाला आमंत्रित करणारा ठरतो. त्यासोबत गरज असते त्यागाची! कारण भोगे रोगभयम्।भोगांमध्ये विविध रोगांची भीती दडलेली असते. म्हणून त्यागातील सर्वोच्च आनंद महान असतो.



मंत्रातील अंतिम संदेश आहे मा गृधः कवण विवद धनम।अर्थात, हे मानवा ! तू लोभ धरू नकोस. कारण, ते प्रश्न कोणाचे आहे? ते तर सर्वांचेच आहे. धन किंवा पदार्थांचा त्यागाच्या भावनेतून उपभोग होत असताना त्याच्या लोभात पडू नये. एखाद्या गोड पदार्थाचा आस्वाद घेताना आपल्या आरोग्याचा विचार करून आवश्यक तितकाच तो भोगावा. पण, त्याचबरोबर ते पुन्हापुन्हा आपणासच मिळत राहावे, असा लोभ असता कामा नये. लोभाचे प्रकार वेगवेगळे असतात. धनलोभ, अन्नलोभ, सत्तालोभ, परिवारलोभ, विषयलोभ इत्यादी. लोभी माणूस विवेकभ्रष्ट बनतो. त्याला मागचे-पुढचे, चांगले-वाईट, लाभ-हानी आदींचे भान राहात नाही. सर्व काही आपल्यालाच मिळत राहावे. दुसर्‍यांना ते कदापि मिळूच नये, ही लोभीवृत्ती त्याला तर नेस्तनाबूत करतेच, पण त्याबरोबरच इतर मानवसमूहासदेखील विनाशाच्या दरीत ढकलून देते. यासाठी नीतिकाराने म्हटले आहे- अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके।अतिलोभी माणसाच्या डोक्यावर दुःख व चिंतेचे चक्र फिरत असते. ते त्याला शांततेने जगू देत नाही. या लोभामुळेच समाजात गरीब व श्रीमंतीचे भेद उद्भवतात आणि व्यवस्था दुभंगते.

खरेतर पृथ्वीवरील धन हे सर्वांचेच आहे. कोण्या एकाचा मालकीहक्क हा धनसंपत्तीवर कदापि नाही. ईश्वराने प्रत्येक माणसाला ऐश्वर्य कमावण्याचा अधिकार दिला आहे. म्हणूनच धनावर किंवा सृष्टीतील इतर वस्तूंवर कोणीही आपली सत्ता गाजविण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नये. अपरिग्रहवृत्तीचा हा सिद्धांत जगातील समग्र मानवसमूहाने अंगिकारल्यास निश्चितच आपली पृथ्वी स्वर्गासमान होईल.

- प्रा. डाॅ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@