‘दीप’स्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |


deepa malik_1  


आजघडीला एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रसिद्ध असल्या तरी येथपर्यंत पोहोचण्यात दीपा मलिक यांनी आपल्या जीवनात जीवापाड मेहनत केली आहे. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


जगात विविध क्रीडा प्रकार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाचे राष्ट्रीय खेळ वेगळे असले तरी या विविध क्रीडा प्रकारांना सर्वत्र प्रसिद्धी आहे. भारतातही या क्रीडा प्रकारांना काही प्रमाणात प्रसिद्धी असून या खेळांतील भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करत जगभरात आपले नाव कमावले आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारांतील सर्वोच्च अशा
खेलरत्नपुरस्कारासाठी केवळ क्रिकेटमधील खेळाडूंचीच नव्हे, तर अन्य खेळांमधील खेळाडूंनाही भारत सरकारकडून प्राधान्य दिले जाते. खेलरत्नपुरस्कृत क्रीडापटू म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब असून या खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच. असे खेळाडू उत्तम प्रदर्शन करत देशाचे नाव तर उज्ज्वल करतातच. मात्र, आपल्यानंतरही या खेळातील कनिष्ठ खेळाडूंचे भवितव्य घडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.


खेलरत्नपुरस्कृत पॅरालिम्पिकअ‍ॅथलिट दीपा मलिक या त्यांपैकीच एक. पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिक यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. भारताच्या पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी दीपा मलिक यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचे असेल, तर त्याला आधी निवृत्ती स्वीकारणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन करत दीपा यांनी हा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट ते खेलरत्न पुरस्कारअशा प्रवास करणार्‍या दीपा मलिक यांनी आपल्या जीवनात फार संघर्ष केला आहे. आजघडीला एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून त्या प्रसिद्ध असल्या तरी येथपर्यंत पोहोचण्यात त्यांनी जीवापाड मेहनत केली आहे.



दीपा यांचा जन्म ३० सप्टेंबर
, १९७० साली हरियाणातील सोनीपत शहरात झाला. त्यांना लहानपणापासूनच विविध खेळांची आवड होती. दीपा यांचे वडील बाळकृष्ण नागपाल हे भारतीय सैन्यदलात होते. वडिलांप्रमाणेच देशासाठी काहीतरी विशेष करण्याची इच्छा त्यांना बालपणापासूनच होती. त्यामुळे बालवयातच क्रीडा प्रकारांमध्ये करिअर करण्याचे ध्येय दीपा यांनी बाळगले होते. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना विशेष रस होता. यासाठी त्या कसून सराव करत असत. शालेय जीवनादरम्यान आपला अभ्यास सांभाळून दीपा या गोळाफेक, बांबूफेक, थाळीफेक, भालाफेक, जलतरण आणि एअर रायफल्स अशा विविध क्रीडा प्रकारांचा सराव करायचे. वडील सैन्यात असल्याकारणाने विविध शहरांत त्यांना स्थलांतरित व्हावे लागायचे. सोनीपतमधून काही काळ कोलकात्यात येत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र, यादरम्यानही त्यांनी आपली जिद्द, चिकाटी कायम ठेवत आपला सराव कायम ठेवला. आपल्या सरावादरम्यान त्यांनी या क्रीडा प्रकारांतील जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत आपले अस्तित्व सिद्ध केले. या स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतर भारताच्या पॅरालिम्पिक समितीतर्फे दीपा यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सर्व काही सुरळीत सुरु होते.



मात्र
, का कुणास ठाऊक नियतीच्या मनात काय होते ते? वयाच्या ३०व्या वर्षी दीपा मलिक यांना एका मोठ्या शारीरिक शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. पाठीच्या मणक्यात ट्युमर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. केवळ एक नाही तर तब्बल ३१ शस्त्रक्रिया त्यांना कराव्या लागल्या. कंबर आणि पायादरम्यान त्यांना १८३ टाके लागले. यादरम्यान त्यांना अर्धांगवायूचाही झटका आला. ज्यामुळे गेल्या १९ वर्षे दीपा मलिक आपले आयुष्य व्हिलचेअरवरच आहेत. डॉक्टरांनी दीपा मलिक यांना तू कधीही चालू शकणार नाहीस,” असं सांगितले होते. मात्र, मेहनत आणि जिद्द या जोरावर दीपा मलिकने क्रीडाक्षेत्रात आपले नाव कमावले. शारीरिक समस्यांवर मात करत दीपा मलिक यांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दीपा यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होत भारताला पदकही मिळवून दिले. या स्पर्धेत पहिले पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिक यांच्याच नावावर जमा आहे.



२०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या
शॉटपुटप्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरिक्त २०१६ साली झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये दीपा यांनी पदकांची कमाई केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपा मलिक यांचा भारतीय क्रीडाक्षेत्रातील मानाचा समजल्या जाणार्‍या खेलरत्नपुरस्काराने गौरव करण्यात आला होता. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सचिन तेंडुलकर व अभिनव बिंद्रासारख्या दिग्गज खेळाडूंनी दीपाच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. व्हीलचेअरवर असतानाही दीपा यांनी विविध विक्रम रचत देशाची मान जगभरात उंचावली. खेलरत्नपुरस्कृत या दीपस्तंभाला दै. मुंबई तरुण भारतचा सलाम.

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@