सशक्त व्हा, उठा चला!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2020
Total Views |


corona morale_1 &nbs


साहजिकच ‘कोविड’च्या विकृत आणि विलक्षण इतिहासाचा आपणही भाग होतो, याचा आपल्यालाही अभिमान वाटेल. कारण, आपण यातून सुखरूप बाहेर पडलो. कारण, आपलीही प्रतिकारशक्ती अचाट आणि पराक्रमी होती, म्हणून आपण ‘कोविड-१९’चा पाडाव केला, याचा पुरावा आपोआप आपल्याबरोबर या जगाला मिळेलच.


‘कोविड-१९’चा सूर्य चांगलाच तापला आहे. त्याच्या तप्त झळांनी जवळजवळ संपूर्ण जगाला चटके बसत आहेत. जवळजवळ २१२ देश या दाहात होरपळत आहेत. अशा परिस्थितीत आपण हतबल होऊन बसलो आहोत. संकटग्रस्त झालो आहोत. हे एक अनर्थावह युग आपण आपल्या प्रत्येकाच्या हयातीत पाहत आहोत. आपण अलीकडेच ‘सार्स’, ‘एचवन एनवन’, ‘फ्लू’, ‘इबोला’ आणि ‘जिका’ सारख्या भयावह साथी पाहिल्या. त्या आल्या, त्या फुग्यासारख्या फुगल्या. आपल्या माथ्यावर चढल्या आणि हळूहळू उतरल्यासुद्धा. प्रत्येक महामारीत असेच होतं. ती वाटचाल तशी नैसर्गिक आणि शास्त्रीय अशीच आहे. फक्त आपण तिच्या त्या वाटचालीत नक्की कुठली भूमिका घेणार आहोत, यावर त्या महामारीचे आयुष्य अवलंबून राहते. तिला दीर्घायुष्य मिळेल का? तिचा अकाली मृत्यू होईल का? हे आपण आपली ‘दो गज दूरी’ किती गंभीरपणे पाळतो, मास्क लावून चेहरा किती सुरक्षित ठेवतो आणि ‘हाथ की सफाई’ खरीखुरी गांभीर्याने कशी करतो, यावर या कोरोना महामारीचे भविष्य आणि तिच्याबरोबर आपले जीवन-मरण अवलंबून आहे. पण, महामारीच्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश निश्चितच आहे. जरी महामारीचा परिपाक खूप त्रासदायक असला तरी प्रत्येक महामारीनंतर जगाला बरंच काही अचाट आणि कल्पनातीत शिकायला मिळालं, हे मात्र खरं. तेव्हा काळ्या ढगांच्या किनार्‍याला चंदेरी कडा असते हे सत्यच आहे. आपण प्लेग किंवा काळ्या आजारांमध्येही ‘क्वारंटाईन’चा आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चा प्रभाव किती महत्त्वाचा आहे, हे खर्‍या अर्थाने १३४८च्या दरम्यानच शिकलो.
 

जशी जशी आपली ‘कोविड-१९’बद्दलची माहिती वृद्धिंगत होत जाते, आपला त्या विषाणूबरोबरचा जगण्याचा प्रत्यय विकसित होत जातो, तसतसे आपले अवसानही वाढायला लागते. आपली ‘लॉकडाऊन’बरोबर विफलता वाढायला लागते. आर्थिक व्यवस्था जसजशी ढासळायला लागते आणि ‘कोविड-१९’ची उंचीही कमी व्हायला लागते, तेव्हा आपलं ते पूर्वीचं सामान्य आयुष्य पुन्हा मिळवायची आपली धडपडही सुरू होते. आपल्याला प्रेशर कुकरची शिटी लागतेच. वाफ जर शीळ घालत निघाली नाही, तर प्रेशर कुकरचा स्फोट होऊ शकतो. तसेच काहीसे मनाला ‘लॉकडाऊन’च्या प्रेशरमध्ये सांभाळायला लागतं. हळूहळू फुलणार्‍या कळीसारखे मन फुलायला लागतं. एक मोठा धोका टळला, आपण बालंबाल वाचलो, याचा आनंद केवळ वैयक्तिक नसतो. तो घरीदारी जाणवतो. तो आनंद सामाजिक असतो, राष्ट्रीय असतो आणि जागतिकही असतो. आपल्याला झटपट आपल्या सुंदर दैनंदिन आयुष्याकडे परतायचे असते आणि कोरोनाला आपल्या सावध जाणिवेतून हद्दपार करायचे असते. दुरुनसुद्धा कोरोना आपल्याला दिसू नये म्हणून आपण त्या जगन्नियंत्याची मनापासून आणि पूर्ण शरणागती पत्करून आळवणी करत असतो. आपल्या शरीरात प्रतिद्रव्य किंवा अ‍ॅण्टिबॉडीजच्या स्वरुपात आपण कोरोनाला कोरून ठेवतो. कारण का? तर आपले संरक्षण व्हावे म्हणून. तथापि, ती प्रक्रिया शरीरात चालू असतानाच आपल्या मनातून कोरोनाशी निगडित असे विचार मात्र आपण खोडून काढत असतो. या दोन्हीही कार्यपद्धती परस्परांविरोधी जरी असल्या तरी त्या आपल्या जगण्यासाठी मात्र आवश्यक आहेत हे खरे.
 
अर्थात, कोरोना हा जगाला भयभीत करणारा सक्षम विषाणू आहे. त्यामुळे पृथ्वीतलावरील काही जीवांच्या त्रासदायक कहाण्या काळजाला भिडणार्‍या आहेत, गंभीर भोगिताच्या आहेत. आपण या विषाणूच्या मगरमिठीत सापडलो होतो की, जो केवळ आपल्याला नुसता मृत्युदंडच देत नाही, तर त्यानंतरही आपल्या शरीराचे शत्रूचेही होऊ नयेत, इतके हाल करतो. कणकणाने संपवतो, खिन्न, विचलित करू शकतो. आपण आपल्याच आत्म्याला ओळखू शकणार नाही. इतक्या प्रमाणात त्या आत्म्याचे रूप कुरूप करून टाकण्याचे धाडस या कोरोना विषाणूंतच आहे. अशा पद्धतीचा हा भ्रम आणखी बिघडतो. तो आपल्याच भावंडांनी, मित्रमैत्रिणींनी, शेजार्‍यापाजार्‍यांनी आपल्यावर आणि कळत-नकळत आपण त्यांच्यावर ‘कोविड’ची संसर्गजन्यता हस्तांतरित केल्याचा निरागस संशय होत असतो. इतकेच काय, एका पित्याने याच विषजन्य संशयातून आपल्या पोटच्या पोराची हत्या केल्याची बातमी ऐकून मन खिन्न-सुन्न पडते.
 
 
आपल्यापैकी कुणालाच अशी आठवण नसावी की, असे काही भयानक आणि विलक्षण आपल्याला आधी कुणी कधी सांगितलेले आहे. या ‘कोविड’च्या व्यथेला तसा भयंकर इतिहास आधी नव्हता. पण, येणार्‍या पुढच्या पिढ्यांना मात्र आपण या ‘कोविड’च्या काळात जगलो, त्याच्या जादूच्या विळख्यात सापडलो, त्याच्या क्रूरतेपासून वाचलो, असा इतिहास वाचण्याचे महतभाग्य मिळेल. साहजिकच ‘कोविड’च्या विकृत आणि विलक्षण इतिहासाचा आपणही भाग होतो, याचा आपल्यालाही अभिमान वाटेल. कारण आपण यातून सुखरूप बाहेर पडलो. कारण, आपलीही प्रतिकारशक्ती अचाट आणि पराक्रमी होती म्हणून आपण ‘कोविड-१९’चा पाडाव केला, याचा पुरावा आपोआप आपल्याबरोबर या जगाला मिळेलच. तर मित्रहो, सज्ज व्हा, उठा चला, सशक्त व्हा, उठा चला!!! (क्रमशः)
 
 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@