शिष्योत्तमास अनेक आशीर्वाद...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2020
Total Views |

rahul gandhi_1  


मी तर जाम भेदरलोय. इटलीला आज्जीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जायची सोय राहिली नाही. माझे आवडते पर्यटन स्थळ, थायलंड, मलेशिया कितीतरी दिवसात तिथे रजा टाकून गेलो नाही. या कोरोनाची भीतीच तशी आहे.



बरे झाले येशू, अल्ला, देवा (मी सेक्युलर असल्याने वेळेनुसार तिघांचीही नावे घेतो.) तर बरे झाले येशू, अल्ला, देवा की आताच्या घडीला मी पंतप्रधान नाही. इतकं मर मर काम कोण करेल? छे! मी तर राजकुमार आहे, हे असली कामं करण्यासाठी माझा जन्म नाहीच मुळी. हं आता मी केवळ सल्ला देऊ शकतो. तर माझा पहिला सल्ला मोदीकाकांना आहे. लोकांच्या खात्यात पैसे टाकायला मोदीकाकांना काय हरकत आहे का? गरिबी हटाओ असा नारा पार माझ्या पणजोबांपासून आम्ही देत आहोत. तो नारा आजही मी देणार... असू दे तर मी काय म्हणत होतो की, हा आजार एक टक्काच भीतिदायक आहे. ९९ टक्के लोकांना केंद्र सरकार म्हणजे मोदीकाकांनी उगीचच घाबरून ठेवलंय. त्यांच्या घाबरवण्याने मी पण घाबरलो ना? मी तर जाम भेदरलोय. इटलीला आज्जीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जायची सोय राहिली नाही. माझे आवडते पर्यटन स्थळ, थायलंड, मलेशिया कितीतरी दिवसात तिथे रजा टाकून गेलो नाही. या कोरोनाची भीतीच तशी आहे.




काय म्हणता माझे ऐकून लोकांनी ठरवले की, कोरोनाची भीती एक टक्का आहे. कोरोनाला काय घाबरायचे? चला न घाबरता पूर्वीसारखेच वागू, तर कोरोनाचा संसर्ग वाढेल. पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू. कारण, निदान तुम्हाला तरी वाटले की लोक माझे ऐकतात. अहो, मला खात्री आहे की, मी कितीही काहीही म्हटले, तरी लोकं माझं अजिबात ऐकत नाहीत, सगळ्या इंडियावाल्यांनी जणू कट रचलाय. मी जे बोलेन त्याच्या विरूद्धच करतात सगळे. असू दे, पण महाराष्ट्रातले राज्यकर्ते माझे ऐकतात. मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. त्यामुळेच महाराष्ट्रात आज अशी परिस्थिती आहे. मी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ करून काहीबाही बोलत असतो. बघा, महाराष्ट्रातही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सेम टू सेम माझ्यासारखे बोलणे सुरू झाले ना. बरं आम्ही काय मूर्ख आहोत, या असल्या कोरोनाच्या काळात जनतेत यायला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दररोज काहीबाही बोलले की झाले. मी तर देश असाच चालवला असता. आमची सत्ता महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रही आम्ही असाच चालवतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून. आमचा शिष्य बरोबर कित्ता गिरवतोय..शिष्योत्तमास अनेक आशीर्वाद...!

भाकरीसाठी मरताना...

भाकरीसाठी जगताना
भाकरीसाठीच मेलास
कामगारा... मजदूरा...
प्रताडणेच्या चक्रात
तूच पहिला नाडला गेलास
१९  मजूर गावाकडे परत जात होते. जाताना ते विसावले. त्यांचा घात झाला आणि मालगाडीच्या डब्याने त्यांचा जीव घेतला. कोण होते ते मजूर? कुठे चालले होते? स्वत:ला आणि कुटुंबाला जगवण्यासाठी ते महाराष्ट्रात आले असतील. महाराष्ट्रात राहताना जगण्यासाठी अतोनात संघर्ष केला असेल. मरमर काम केले असेल. सगळ्या हौसामौजा मारून पैसे साठवून ते गावाला पाठवले असतील. घरात आईबाबा, बायको, पोरंबाळं असतील, त्या पैशावरच या सगळ्यांचे भागत असेल. पण कोरोनाचे संकट आले. होत्याचे नव्हते झाले. हातातले काम सुटले. ना खायला अन्न ना राहायला आसरा. कोण कुठले शंकास्पद नजरा. कुठे राहावे? बाहेर यावे तर ‘लॉकडाऊन.’ पोलीसही त्यांचे काम करणार. मार देणार... काय करावे? जगण्याचे आणि कुटुंबीयांना जगवण्याचे स्वप्न घेऊन गाव सोडून आले हे आणि यांच्यासारखे लाखो मजूर घरापासून दूरच राहतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’ झाले. पण पोटाची भूक ‘लॉकडाऊन’ झाली नाही. भूक भूक करत या कष्टकर्‍यांना भीक मागण्याची पाळी आली. इज्जत लाज बाजूला ठेवली मागितली भीकही जमवली भाकर्‍यांची चवड.
जगण्यासाठी आलो, पण मरणच पाठलाग करतेय म्हटल्यावर सगळ्यांनी परत गावी जायचे ठरवले असेल. कसे जायचे? मोठमोठे मंत्री संत्री दररोज सांगायचे जिथे आहात तिथेच राहा. तुम्हाला सगळ्या सोयी देण्यात येतील. अन्नपाणी, निवारा, सगळे काही. पण यांना तर काहीच मिळाले नव्हते. काही जण म्हणतात, हे मरायला रेल्वेच्या ट्रॅकवर का गेले? ते गेले कारण गावा, शेतात, घर-अंगणात यांना कुणीच थारा दिला नसता. इतरवेळी दिलाही असता पण आता कोरोनाच्या भीतीने सगळेच एकमेकांवर संशय घेतात. सगळ्यांनीच नाकारल्यावर ते इथे ट्रॅकवर आले असतील. त्यांच्या मृत्यूने प्रश्न उभे राहिले आहेत. या मजुरांची जबाबदारी कुणावर होती? ते मेले त्यांच्या घरच्यांना लाख रूपये वाटलेही जातील. पण त्यांचा असा अवेळी जीव गेला, बळी गेला, याची जबाबदारी कोण घेणार?
@@AUTHORINFO_V1@@