लाॅकडाऊनचा फायदा उचलून काझिरंग्यात गेंड्याची शिकार; शिंग गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2020
Total Views |

raion _1  H x W

 

 
उद्यानाच्या पूर्वेकडील भागात शिंग काढलेल्या गेंड्याचा मृतदेह सापडला
 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - लाॅकडाऊनचा फायदा उचलून शिकाऱ्यांनी आसामच्या 'काझिरंगा राष्ट्रीय उद्याना'तील एक शिंगी गेंड्याचा जीव घेतला आहे. काल सायंकाळी उद्यानातील पूर्वेकडील वनक्षेत्रात गेंड्याचा मृतदेह आढळला. मृत गेंड्याचे शिंग गायब असल्याने त्याची शिकार झाल्याचे उद्यान प्रशासनाने जाहीर केले आहे. मृतदेहाच्या शेजारी बंदुकीची रिकामी काडतुसे देखील सापडली आहेत. 
 
 
 
 
 
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लाॅगडाऊन लागू आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. याचाच फायदा शिकारी घेत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. 'काझिरंगा राष्ट्रीय उद्यान' हे एकशिंगी गेंड्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. काल सायंंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास उद्यानातील अग्रतोली वनपरिक्षेत्रात नर गेड्याचा मृतदेह सापडला. हा परिसरात घनदाट जंगल आहे. मृत गेंड्याचे शिंग गायब असल्याने हे प्रकरण शिकारीचे असल्याचे 'काझिरंगा राष्ट्रीय उद्याना'चे संचालक पी. शिवकुमार यांनी सांगितले आहे. तसेच मृतदेहाच्या शेजारी 'एके-47' बंदुकीची आठ रिकामी काडतुसे सापडली असल्याने या गेंड्याची शिकारच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काझिरंग्यात गेंड्याच्या शिकारीची शेवटची घटना १ एप्रिल, २०१९ मध्ये घडली होती. 
 
 
 
 
गेल्या काही दिवसांपासून काझिरंग्यामध्ये शिकाऱ्यांकडून गेंड्यांची शिकार करण्याचे प्रयत्न सुरू होते. ११ एप्रिल रोजी, गेंड्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दलातील सदस्यावर विश्वनाथ वनक्षेत्रात गोळीबार झाला होता. शिकारीसाठी आलेल्या शिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. यामध्ये तो सदस्य जखमी झाला. या घटनेच्या दोन दिवसांनी पोलिसांनी शिकारीचा प्रयत्न करणाऱ्या ६ शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १३ एप्रिल रोजी पोलिसांनी सोनितपूर जिल्ह्यातील नामेरी राष्ट्रीय उद्यानात शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना अटक केली होती. 'डब्लूडब्लूएफ' या संस्थेच्या मते, ईशान्य भारतात साधारण ३ हजार ५०० एकशिंगी गेंडे शिल्लक राहिले असून त्यापैकी २ हजार ४०० गेंडे काझिरंग्यामध्ये आहेत. 
 
 
 
गेंड्यांच्या शिंगांना आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करीच्या बाजारात मोठी मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे वेळ मिळाल्याने शिकारी पुन्हा एकदा गटबद्ध होऊन काझिरंगामध्ये शिकारीचा प्रयत्न करत आहेत. कारण, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीनसह इतर आशिया देशांमध्ये गेंड्यांच्या शिंगांच्या अवैध मागणीत वाढ होणार आहे. गेंड्याच्या शिंगामध्ये कामोत्तेजक वाढण्याची शक्ती असल्याचा गैरसमजूतीने त्याची तस्करी केली जाते. परंतु, मानवी नख आणि केस ज्या केराटिनपासून पेशींपासून तयार झालेले आहे, त्याच पेशीपासून हे शिंग तयार होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@