महाराष्ट्राचा ‘बॅट मॅन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2020   
Total Views |


mahesh gaikwad_1 &nb 


वटवाघूळ म्हटले की, आजही आपल्यासमोर एका विचित्र प्राण्याचा चेहरा उभा राहतो. त्याविषयीच्या अनेक गैरसमजुतींना चेव फुटतो. मात्र, या वटवाघळांना आपलेसे करुन त्यांच्यावर संशोधन करणार्‍या महेश गायकवाड यांच्याविषयी...
 
वटवाघूळ या एकमेव उडणार्‍या सस्तन प्राण्याविषयी आजही समाजात अनेक मिथकं कायम आहेत. कोरोना व्हायरस संक्रमणाच्या निमित्ताने जनसामान्यांमध्ये वटवाघूळांविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. मात्र, या माणसाने मात्र समाजाने चार हात लांब ठेवलेल्या वटवाघळांना आपलेसे केले. वटवाघळांचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी सात वर्ष सह्याद्रीत पायपीट केली. अंधारलेल्या गुहा पालथ्या घातल्या. या काळात ते मृत्यूच्या दारातूनही परत आले. वटवाघळांमध्येच त्यांनी पीएच.डी केली आणि सध्या ते वटवाघळांविषयी समाजात जनजागृतीचे काम करत आहेत. महाराष्ट्राचा हा ‘बॅट मॅन’ म्हणजे, डॉ. महेश गायकवाड. 
 

फलटण तालुक्यातील निबंलक या छोट्याशा खेडेगावात दि. २५ फेब्रुवारी, १९७९ रोजी महेश गायकवाड यांचा जन्म झाला. खेड्यातच बालपण गेल्याने निसर्गाची तोंडओळख होणे साहजिकच होते. त्यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. आपल्या मामांसोबत ते लहानपणापासूनच शिकारीला जायचे. त्यामुळे वन्यजीवांची प्राथमिक माहिती आणि त्यांची आवड गायकवाडांना जडली. ‘पर्यावरण’ विषयाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांचे वडील व खासकरून आजोबा कारणीभूत ठरले. त्यांचे आजोबा अनेक आजारांवर माणसांना व पाळीव जनावरांना औषधे देण्याचे काम करतात. लहानपणापासून ते आजोबांच्या या कामी मदत करत होते. त्यामुळे अनेक दुर्मीळ वनस्पतींची त्यांना तोंडओळख झाली. निसर्गाच्या आवडीपोटी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणातही ‘पर्यावरणशास्त्र’ विषयाचे शिक्षण घेतले. बी.एस्सीपर्यंतचे शिक्षण तालुक्यात घेतल्यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पदव्युत्तर शिक्षणाच्या संशोधनासाठी त्यांनी ‘चिंकारा’ प्राण्याच्या अधिवासाचा विषय निवडला. २००१ साली पदव्युत्तर शिक्षण मिळाल्यावर गायकवाडांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वर्षभर पर्यावरण शिक्षक म्हणून नोकरी केली. परंतु, नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. वन्यजीव संशोधनाचे क्षेत्र त्यांंना खुणावत होते. याच काळात केंद्र सरकारच्या वटवाघूळ संशोधनाचे काम पु्ण्यातील संशोधिका डॉ. विशाखा कोराड यांना मिळाले होते. पुणे जिल्हा आणि सह्याद्रीमधील वटवाघळांच्या अधिवासाचा मागोवा घेऊन त्याविषयी संशोधन त्यांना करायचे होते. कोराड यांना साहाय्यक संशोधकांची गरज होती. गायकवाडांनी लागलीच या संधीचा फायदा उचलला. परंतु, कोराड प्रात्याक्षिक घेऊनच साहाय्यकांची निवड करणार होत्या. प्रात्यक्षिक होते, पुण्यातील भुलेश्वरच्या डोंगरातील गुहांमध्ये शिरून वटवाघळांना पकडणे.
 
 
मामांसोबत शिकारीसाठी फिरताना मिळालेले कौशल्य गायकवाडांच्या अंगी होतेच. त्यांचे कौशल्य पाहून कोराड यांनी प्रकल्पासाठी ‘साहाय्यक संशोधक’ म्हणून गायकवाडांची निवड केली. या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी सहा वर्ष पुणे जिल्हा आणि सह्याद्रीच्या कुशीतल्या गूढ गुहांचा मागोवा घेतला. त्या गुहांमध्ये अधिवास करणार्‍या वटवाघळांना पकडून त्यावर सखोल अभ्यास केला. याच कार्यादरम्यान कोराड यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी पीएच.डी पूर्ण केली. विषय अर्थातच होता वटवाघूळ. मात्र, हे काम त्यांच्या जीवावरही बेतले. काही वेळा वन्यजीवांच्या हल्ल्यामधून ते थोडक्यात बचावले. या संशोधनादरम्यान त्यांनी २००१ पासून जवळपास एक हजारांहून अधिक वटवाघळे पकडली असून त्यांना पुन्हा निसर्गात सोडले आहे. त्यांचे विच्छेदन करून प्रजातींचाही उलगडा केला आहे. एकदा ते महाबळेश्वरच्या ‘राबर्स केव्ह’ या गुहेत वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. एवढी मोठी गुहा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या या गुहेत दीड-दोन लाख वटवाघळे असतील, याची कल्पनाही त्यांना नव्हती. त्यावेळी ते गुहेसमोर मास्क न वापरता थांबल्यामुळे दहा दिवस आजारी पडले. त्यांना न्यूमोनिया झाला. त्यांचे वजन ६५ किलोहून ३५ किलो झाले. मात्र, रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्यामुळे ते वाचले. आजारातून उठल्यानंतर त्यांनी सावधगिरी बाळगून संशोधनाच्या कामाला सुरुवात केली. शास्त्रीय पद्धतीने वटवाघळे पकडणे, त्यांना निसर्गात सोडणे, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्यापासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देऊन कामाला सुरुवात केली. त्यानंतर सावधगिरी बाळगल्याने ते फार कमी वेळा आजारी पडले. या संशोधनाच्या कामादरम्यानच गायकवाडांनी नोकरी करायची नाही, असे ठरवले होते. त्यामुळे २००४ साली त्यांनी ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मदतीने वटवाघूळ संशोधनाचे सखोल काम केले. गायकवाडांनी लिहिलेली आजवर पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या ते आपल्या संस्थेअंतर्गत पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती क्षेत्रात कार्यरत आहेत. वटवाघळांमुळे कोरोना होण्याच्या अफवेविषयी ते सांगतात की, “भारतीय वटवाघळांमुळे कोरोना झाल्याचे अजूनही सिद्ध झालेले नाही. त्यामुळे भारतात कोरोनाच्या संक्रमणाला वटवाघळांना दोषी ठरविणे चुकीचे आहे.” अशा या महाराष्ट्राच्या ‘बॅट मॅन’ला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!

 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@