आमदार साहेब आता तरी सुधारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020   
Total Views |

maulana mufti _1 &nb
 
 
 
 
डाॅक्टरांवर हल्ला व त्यानंतर ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेले मालेगाव येथील ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती हे काही आपल्या वर्तनात सुधारणा करण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेले असताना देखील त्यांनी कार्यकर्ते, नागरिकांसमवेत कार्यक्रमाच्या तयारीसाठी संवाद साधल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना चांगलेच खडसावले आहे.
 
आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना ‘होम क्वारंटाईन’ राहण्याचा सल्ला माहापालिका प्रशासनाने दिला होता. गेल्या आठवड्यात बुधवारी त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. तसेच ते गेल्या महिन्यात दिल्ली, आग्रा येथून परले होते. त्यामुळे त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले होते. नुकताच त्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला होता. आमदार मौलाना यांनी कोरोनाच्या पार्श्वतभूमीवर मदत कार्यक्रम करण्यासाठी निकटचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना घरी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या निवासस्थानी पथक पाठवले. त्यांनी त्यांना चांगलेच खडसावले, तसेच याबाबत सहकार्य न केल्यास अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, असेही त्यांना सुनावले. नुकतेच ‘तबलिगी जमात’चा दिल्लीत कार्यक्रम पार पडला. त्यात मालेगावचे २० ते २२ जण सहभागी झाले होते. ते सर्व जण अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेले नाही. शहरात ‘तबलिगीं’चे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. शहरात नव्याने विविध प्रवासी दाखल झाले आहेत. त्यात केनिया, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिकेतून प्रवासी आलेले आहेत. असे ७८ प्रवासी मालेगावात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्यात काही बेजबाबदार व्यक्तींमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशी सर्व स्थिती असताना देखील सन्माननीय लोकप्रतिनिधी असणारे आमदार जेव्हा असे गैरवर्तन करतात, तेव्हा समजात वेगळाच संदेश जात असतो. याचे भान आमदार महोदयांनी राखणे नक्कीच आवश्यक आहे. मात्र, असे होताना दिसले नाही. त्यामुळे अहोरात झटणार्‍या प्रशासनाचे म्हणणे तरी ऐका आणि आमदार महोदय आता तरी सुधारा असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
 
 
 
दिसून आली खाकीतील माणुसकी
 
 
सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलीस दलाची कर्तव्यकठोरता आणि त्या अनुषंगाने पोलीस दलावर झालेली टीका याची अनेक उदाहरणे आपल्या वाचनात आली. काही पोलीस हे जरी निरंकुश सत्ता हाती आल्यासारखे वागत असले तरी, बहुतांश पोलीस हे आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविण्याचे महत्तम कार्य करीत आहेत. नाशिक शहरातील भारतनगर परिसरातील शिवाजीवाडी भागातील गर्भवती महिलेस प्रसुती कळा येत असल्याची माहिती त्या भागात गस्त घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना मिळताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेत त्या महिलेस शासकीय वाहनाद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. वेळेवर मदत केल्याने या महिलेने पोलिसांचे आभार मानले. या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेत पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्याकडून दोन हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
 
तब्बल १४ दिवसांपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांची विनाकारण गर्दी होऊ नये. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका गर्भवती महिलेस प्रसूती वेदना होत होत्या. या महिलेच्या नातेवाईकांनी ‘१०८’ नंबरच्या रुग्णवाहिकेस फोन केला होता. याचवेळी पेट्रोलिंगसाठी आलेले पोलीस कर्मचारी संजय लोंढे, शिवाजी मुंजाल व त्यांचे सहकारी पी. एस. अत्तार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मुंबईनाका येथे गस्तीवर असलेल्या डीबी व्हॅनला बोलावले व या महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेस वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने तिने एका गोंडस बाळास जन्म दिला असून सदर माता व बाळाचे आरोग्य चांगले आहे. खाकीतील या माणुसकीच्या दर्शनाची चर्चा शहरात होत आहे. नेहमीच कठोर भाषेचा करणारे पोलीस जेव्हा वर्दीआड असणार्‍या माणुसकीचे दर्शन घडवितात, तेव्हा नक्कीच सामाजिक भान जपले जाण्यास मदत होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@