मुंबई : सहजरित्या उपलब्ध होणार्या जीवनावश्यक वस्तूंसाठी ‘लॉकडाऊन’च्या काळात रांगा लावाव्या लागत असल्याने कंटाळलेल्या मुंबईकरांनी अखेर अनोखी शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. रांगेत उभे राहण्याऐवजी अनेकांनी दगड, कापड किंवा आपल्या पिशव्या रांगेत ठेवल्याचा अजब प्रकार गुरुवारी उघडकीस आला. माटुंग्यातील ‘सहकारी भांडार’च्या बाहेरील या प्रकाराची चित्रफीत विविध समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाली. याबद्दल दुकानाच्या व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता, दुकान सुरू होताच केवळ रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र अशा प्रकारे दगड ठेवून रांगा लावणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माटुंगा पूर्वेला असलेले सहकारी भंडारचे दुकान सकाळी १० वाजता उघडते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानाच्या शेजारी असलेल्या पदपथावर चौकोन आखण्यात आले आहेत. सामान खरेदी करण्यासाठी येणार्यांनी याच चौकोनात उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र शेजारी राहणारे काही जण सकाळी लवकर येऊन चौकटींमध्ये दगड, रुमाल अशा वस्तू ठेवून जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याबद्दल सहकारी भंडारच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, त्यांनी दुकान उघडल्यावर केवळ रांगेत उपस्थित असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. रांगेत दगड ठेवून गेलेल्या व्यक्तींना दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन व्यवस्थापकांनी दिले.