गायब तब्लीगींमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली
मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे १०१८ रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथील तब्लीगी जमातच्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढली आहे.
त्यामुळे राज्य सरकारने या तब्लीगींना पोलिसांकडे संपर्क करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तब्लीगींच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेल्या ६० जणांनी आपला फोन स्विच ऑफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
“निजामुद्दीन येथील मरकज येथून परतेल्या तब्लिगी जमातच्या जवळपास ६० जणांनी सरकारशी संपर्क केलेला नाही. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे”, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
“ज्या तब्लिगींनी अद्याप संपर्क केलेला नाही, त्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन संपर्क करावा आणि तपासणी नंतर क्वारंटाईनमध्ये राहावे. जर त्यांनी असे केले नाही, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवोई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत”, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात सध्या १०१८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी ५२ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यापैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे १५० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.