राहू मृत्यूपासूनी दूर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020
Total Views |


yagnya_1  H x W


'शरीरशुद्धी', 'आत्मिक पवित्रता' व 'यज्ञमय कर्मशीलता' या तीन साधनांचा श्रद्धेने अवलंब केल्यास आम्ही अमरत्वाला प्राप्त होऊ शकतो. मृत्यूभयापासून आपण मुक्त होऊ शकतो. त्यामुळे 'द्राघीया आयुः।' म्हणजेच दीर्घ आयुष्य मिळवू शकतो. इतके उत्तमोत्तम घडले की, त्या-त्या मानवाला चांगली संस्कारयुक्त प्रजा म्हणजे संतती लाभते व घरकुटुंब हे धनधान्याने परिपूर्ण होऊन सदैव आनंदाचा वर्षाव होत राहतो.



मृत्योः पदं योपयान्तो यदैत

द्राघीयः आयुः प्रतरं दधानाः ।

आप्यायमानाः प्रजया धनेन

शुद्धाः पूता भवत यज्ञियासः ॥

 

अन्वयार्थ

 

हे मानवांनो! (यदा) जेव्हा तुम्ही (मृत्योः) मृत्यूच्या (पदं) पावलास, पायास, (योपयन्तः) दूर सारत, ढकलत (एत) पुढे चालू लागाल, तर तुम्ही (द्राघीय) दीर्घ, सर्वाधिक (आयुः) आयुष्य (प्रतरं दधानाः) उत्तम प्रकारे धारण करणारे होत आणि (प्रजया) उत्तम प्रजा, संततीने व (धनेन) विविध प्रकारच्या धन-धान्याने (आप्यायमानाः) अतिशय तृप्त व्हाल! याकरिता तुम्ही सर्वजण (शुद्धाः) बाह्यदृष्ट्या शुद्ध, स्वच्छ (पूताः) आंतरिकदृष्ट्या पवित्र आणि (यज्ञियासः) यज्ञमय जीवन जगणारे (भवत) व्हा.

 

विवेचन

 

जगातील प्रत्येक प्राणी जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो आपल्यासोबत मृत्यूलाही घेऊन येतो. सर्वांना या जगातून एके दिवशी जायचेदेखील आहे. श्रीमद्भगवद्गीतेत जन्म-मृत्यूच्या अनिवार्यतेविषयी म्हटले आहे-

 

जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्ममृतस्य च ।

तस्मादपरिहायर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥

 

विश्वामध्ये विहार करणाऱ्या सर्वच प्राणिसमूहावर मृत्यूने पाय ठेवलेला आहे. मग तो लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत! सर्वांनाच एके दिवशी या जगाचा निरोप घ्यावयाचा आहे. मृत्यूभयाने प्रत्येकजण पछाडलेला आहे. ज्या दिवशी मृत्यूदेवतेची इच्छा झाली, त्याची हाक आली की, त्या दिवशी तो जीवात्म्याच्या मानगुटीवर पाय ठेवून त्याला अक्षरशः तुडवून, ठेचून टाकण्यास तत्पर झालेला असतो. हे निश्चित मृत्यूची टांगती तलवार आम्हा सर्वांना भयक्रांत करून सोडते. यासाठीच संत तुकाराम म्हणतात-

 

नको नको मना, गुंतू मायाजाळी।

काळ आला जवळी ग्रासावया॥

 

शास्त्रात म्हटले आहे - 'नित्यं सन्निहितो मृत्युः।' मृत्यू आमच्या जवळ उभा आहे. तो कोणाचीही वाट पाहत नाही. तो यत्किंचितही थांबावयास तयार नाही. म्हणूनच महाभारतातील शांतिपर्वात पितामह भीष्म म्हणतात-

 

'न हि प्रतीक्षते मृत्युः

कृतमस्य न वा कृतम्॥

 

'जे काही सत्कर्म करावयाचे आहे, ते आजच करा, अन्यथा मृत्युरुपी काळ हा तुम्हास कधी ग्रास बनवेल याचा नेम नाही. कारण, मृत्यू या गोष्टीची प्रतीक्षाच करीत नाही की तुम्ही आपली कामे पूर्ण केली आहेत की नाहीत!' सांख्यशास्त्राचे आचार्य महामुनी कपिल म्हणतात-

 

'अथ त्रिविध दुःखात्यन्तनिवृत्तिरत्यन्तपुरुषार्थः।'

 

तीन प्रकारच्या दुःखांची आत्यंतिक निवृत्ती करणे, हाच मानवी जीवनाचा पुरुषार्थ म्हणजे उद्देश आहे. जगातील जेवढी काही दुःखे आहेत, सर्व प्राणिसमूहाला मृत्यूकडे घेऊन जातात. त्या दुःखांना तीन प्रकारांमध्ये विभागले आहे.

 

) आध्यात्मिक दुःखे २) आधिदैविक दुःखे आणि ३) आधिभौतिक दुःखे

 

माणसाच्या शरीर, मनात व इंद्रियांमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, भ्रम, शंका, भीती या नानाविध दोषांपासून जी दुःखे उत्पन्न होतात, त्यांना 'आध्यात्मिक दुःखे' म्हणतात. ही सर्व आपल्या आत्म्याशी संबंधित अंतःकरणातून, आतून निर्माण होणारी असतात. त्यांना जबाबदार बाहेरचा कोणीही नसतो. दुसऱ्या प्रकारची दुःखे ही जगातील जड तत्त्वांपासून म्हणजेच निसर्गातील दैवी तत्त्वांपासून प्राप्त होतात. उदा. अतिवृष्टी, अनावृष्टी, थंडी, ऊन, पाऊस, भूकंप, दुष्काळ, आग, साथीचे आजार इत्यादी! हे मानवाच्या हाती नसते. निसर्गाची अवकृपा झाली की, अशी दुःखे कोसळतात. यालाच 'दैवीप्रकोप' असेही म्हणतात, तर तिसऱ्या प्रकारची दुःखे म्हणजे 'आधिभौतिक' होत. आपल्याच परिसरातील प्राणिसमूह, चोर किंवा अनिष्ट प्रवृत्तीच्या माणसांकडून होणारा त्रास, मारहाण किंवा हिंसक घटना! या त्रिविध दुःखांचा परिणाम म्हणजे मृत्यू! या मृत्यूमुळे माणूसच नव्हे, तर सर्व प्राणिसमूह वैतागून जातात. मृत्यूभयाने जीवन जगणे असह्य होते. म्हणूनच वैदिक शांतिपाठात या त्रिविध तापांपासून परावृत्त होण्याकरीता 'ओम् शान्तिः शान्तिः शान्तिः।' असे तीन वेळा उच्चारले जाते. सदरील वेदमंत्रात मृत्यूला दूर सारण्याकरिता उपाय वर्णिले आहेत. त्याकरिता प्रथमतः शरीराने म्हणजेच बाह्यदृष्ट्या शुद्ध व्हावे लागेल. शरीरात प्रतिकारक्षमता उत्तम प्रकारची असेल, तर कोणताही आजार जवळ येणार नाही.

 

आपले शरीर निरोगी, स्वस्थ व सुदृढ ठेवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, सुयोग्य उत्तम आहार, व्यस्त जीवनचर्या या बाबींची आवश्यकता आहे. केवळ शरीराला सुंदर वस्त्रांनी व आभूषणांनी शोभिवंत ठेवणे याला शुद्धता म्हणता येत नाही. शारीरिकदृष्ट्या नेहमी बलवंत होण्यासाठी व्यायामादी वरील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. 'तपो द्वंद्वंसहनम्।' या सूत्रानुसार सुख-दुःख, हानी-लाभ, हर्ष-शोक, गरिबी-श्रीमंती या द्वंद्वांना समानतेेने तोंड देत शारीरिक बळाने रोगमुक्त राहणे म्हणजे शुद्ध होणे. मानसिक व आत्मिकदृष्ट्या नेहमी विवेकशील, ज्ञानयुक्त, प्रसन्न, समाधानी राहत सर्वांशी मित्रत्वाने स्नेहशील व्यवहार ठेवणे म्हणजेच 'आंतरिक पवित्रता' होय. यालाच मंत्रोक्त व्याख्येनुसार 'पूताः' असे म्हणतात. बाह्यदृष्ट्या माणूस शुद्ध असला, तरी तो आंतरिकदृष्ट्या 'पूत' असेलच, हे सांगता येत नाही. म्हणूनच 'अंतःशौच' ही प्रक्रिया अतिशय कठीण आहे. यासाठी माणसाला ज्ञान, कर्म, साधना व तपश्चर्येचीगरज असते. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या (मत्सर), अहंकार हे षड्रिपू म्हणजे आतील शत्रू आहेत. यावर विजय मिळवला की, बाह्य शत्रू आपोआपच परास्त होतात. म्हणून माणसाने आंतरिक पावित्र्य जपले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे मृत्यूला दूर सारण्याकरिता मानवाने 'यज्ञियासः ।' म्हणजे 'यज्ञमय' जीवन जगले पाहिजे. यज्ञाचे अनेक अर्थ होतात. शतपथ ब्राह्मण ग्रंथात यज्ञाची व्याख्या करताना म्हटले आहे-

 

"यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम् ।"

 

जी सर्वाधिक श्रेष्ठ व पवित्र कामे आहेत, त्यांना 'यज्ञ' असे म्हणतात. मानवाला शताधिक्य आयुष्याचे वरदान मिळाले आहे, ते सत्कर्म करण्यासाठी! अनिष्ट कामे करून या नरदेहाला पापमार्गी बनविणे म्हणजे ईश्वराकडून मिळालेल्या या सर्वोत्तम साधनाचा अवमान नव्हे का? याकरिता जीवनभर विद्या, ज्ञान, सेवा, सत्कर्म, परोपकार, भूतदया, तपश्चर्या इत्यादी सद्गुणांचा अंगिकार करीत जगणे म्हणजेच 'यज्ञमय' बनणे होय. अशा प्रकारे वरील 'शरीरशुद्धी', 'आत्मिक पवित्रता' व 'यज्ञमय कर्मशीलता' या तीन साधनांचा श्रद्धेने अवलंब केल्यास आम्ही अमरत्वाला प्राप्त होऊ शकतो. मृत्यूभयापासून आपण मुक्त होऊ शकतो. त्यामुळे 'द्राघीया आयुः।' म्हणजेच दीर्घ आयुष्य मिळवू शकतो. इतके उत्तमोत्तम घडले की, त्या-त्या मानवाला चांगली संस्कारयुक्त प्रजा म्हणजे संतती लाभते व घरकुटुंब हे धनधान्याने परिपूर्ण होऊन सदैव आनंदाचा वर्षाव होत राहतो. मंत्राचा वरील प्रेरक आशय सांप्रतयुगी अतिशय उद्बोधक आहे. आज प्राण्यांपेक्षाही जगातील मानव मृत्यूच्या आक्रमणाने भयाक्रांत झाला आहे. सारे विश्व महाभयंकर अशा 'कोरोना' विषाणुजन्य आजाराने त्रस्त झाले आहे. मृत्यूचे तांडव घरीदारी, रस्तोरस्ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा प्रसंगी हा मंत्र मानवमात्राकरिता संजीवनी ठरेल.

 
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 
@@AUTHORINFO_V1@@