अन्यथा 'बॅनर्जी' नव्हे, 'बुखारी सीएम'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020   
Total Views |


mamata banerjee_1 &n



केवळ एक-दोन नव्हे, तर कित्येक घटनांवरून प्रश्न पडावा की, खरेच पश्चिम बंगाल भारताचाच अविभाज्य भाग आहे ना? आणि याला सर्वस्वी (बे)जबाबदार आहेत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा धर्मांधपणा. गेल्याच आठवड्यात दीदींनी बंगालमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी लपविल्याबद्दल त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती. इतकेच नाही, तर केंद्र सरकारकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले 'पीपीई' किट्सदेखील ममतादीदी चक्क तृणमूलच्या नेतेमंडळींना, पोलिसांना वाटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. पण, सर्वच स्तरातून दीदींच्या या भेदभावपूर्ण वागणुकीवर कठोर शब्दांत टीका झाल्यानंतरही दीदी त्यांच्या आडमुठ्या स्वभावानुसार सुधारलेल्या नाहीतच. दीदींचा हा धर्मांधपणा तेव्हा समोर आला, जेव्हा एका पत्रकार परिषदेत त्यांना राज्यातील 'तबलिगीं'चा आकडा विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताच दीदींचा पारा एकाएकी चढला आणि त्यांनी “मला असे 'जातीय प्रश्न' विचारू नका,” म्हणून उलट पत्रकारांनाच सुनावले. एवढेच नाही तर फेसबुकवर या पत्रकार परिषदेची व्हिडिओ लिंक शेअर करतानाही त्यातून हा प्रश्न आणि त्याला दीदींना दिलेले उत्तर मात्र सपशेल हटविण्यात आले. दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेले 'तबलिगी जमात'चे हजारो धर्मप्रसारक आपापल्या राज्यात परतले. केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारांना त्या सर्व 'तबलिगीं'ची माहिती देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांची चाचणी करण्याचा, त्यांना 'क्वारंटाईन' करण्याच्या सक्त सूचनाही आहेत. १ मार्च ते १५ मार्च दरम्यान दिल्लीतून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केलेल्या 'तबलिगीं'ची संख्या दहा हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तेव्हा, त्यापैकी काही 'तबलिगी' हे प. बंगालमधील असतीलच. पण, ममतादीदी मात्र ही माहिती सांगायला का तयार नाहीत? त्या का आणि कोणाला पाठीशी घालत आहेत? काहीशे 'तबलिगीं'साठी बंगाली जनतेचे आरोग्य अशाप्रकारे धोक्यात घालून काय साध्य होणार? तेव्हा, मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा हा दिवसेंदिवस खालची पातळी गाठणारा खेळ आता दीदींना थांबवावा. व्होटबँकेसाठी लोकांच्या जीवांशी खेळण्याचे असे अघोरी पाप दीदींनी करू नये, अन्यथा ती वेळ दूर नाही, जेव्हा बंगालही 'मिनी बांगलादेशा'चे हिरवे रुपडे धारण करेल आणि मुख्यमंत्री कोणी 'बॅनर्जी' नाही, तर 'बुखारी' असेल.

 
 

हीच ती वेळ!

 
 

सध्या २१ दिवसांचे 'लॉकडाऊन' १४ एप्रिलला संपणार की त्याची मुदत आणखीन वाढणार, याचीच सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता दिसून येते. सद्यस्थिती पाहता, हा 'लॉकडाऊन' वाढण्याचीच चिन्हे अधिक असली तरी केंद्र आणि राज्य सरकार जनहित लक्षात घेता, योग्य तो निर्णय घेईल आणि वेळीच जाहीरही करेल. तोपर्यंत घरी बसून सरकारला सहकार्य करण्यापलीकडे आपल्या हाती काहीच नाही. पण, कोरोनाच्या या महामारीने उपस्थित केलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या बहुमूल्य वेळेचा वापर प्रत्येकाने करायला हवाच. 'आरोग्यम् धनसंपदा' असे वरकरणी म्हणत असलो तरी धनसंचयाच्या नादात आरोग्याकडे मात्र आपण साफ दुर्लक्षच करतो. मग अचानक एखादी व्याधी उद्भवली की तेवढ्यापुरते पथ्यपाण्याचे सोपस्कारही पार पडतात. परिस्थिती पूर्ववत झाली की जिभेवरचे नियंत्रण सुटते आणि व्यायामाचे आयाम तर दूरच म्हणा! तेव्हा, कोरोनाच्या निमित्ताने का होईना, आपल्याला प्रतिकारशक्तीची खऱ्या अर्थाने किंमत कळली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच आताच्या 'लॉकडाऊन'च्या काळात आपण आपले आरोग्य जितके जपतोय, तेवढीच काळजी कोरोनापश्चातही आपल्याला घ्यावी लागेल, हे मनावर आताच बिंबवणे योग्य. स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या मूलभूत सवयी, ज्यांचा आपण गेल्या काही दिवसांपासून अंगीकार केला आहे, त्यांचा 'ऑल इज वेल' म्हणत चटकन त्याग करून चालणार नाही. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर कौटुंबिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी, त्यासाठीच्या सोयीसुविधा यांचा सांगोपांग विचार करावाच लागेल. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत तर 'चलता है' या आजवर केलेल्या कामचलाऊ विचारानेच आपल्यावर आजची परिस्थिती ओढवली आहे. तेव्हा, 'लॉकडाऊन' संपेल तेव्हा संपेल, पण आपल्या आरोग्याशी निगडित वाईट सवयी संपवण्याची हीच ती वेळ! आपल्या कुटुंबासोबत मनमोकळेपणाने संवाद साधा. आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत आपण काय करतो होतो, सध्या काय करतोय आणि सुखी, समृद्ध आणि सुदृढ राहण्यासाठी काय करायला हवे, यावर विचारविनमय करा आणि निरोगी आयुष्याचा स्वास्थ्यपूर्ण मार्ग निवडा.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@