पांडवांचे स्वर्गारोहण (भाग-२)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020
Total Views |


mahabharat_1  H



इंद्र देवाचा रथ आकाशमार्गाने स्वर्गलोकाकडे निघाला. ते अमरावती नगरीत पोहोचले. एका मोठ्या सभागृहात युधिष्ठिरास त्याचे पूर्वज राजे दिसले. परंतु, त्याला त्याचे बंधू व पत्नी द्रौपदी दिसली नाही. म्हणून तो म्हणाला, "जिथे माझे भाऊ आणि द्रौपदी आहे, तिकडे मला घेऊन जा." परंतु, इंद्र त्याला म्हणाले, "युधिष्ठिरा, तू तुझ्या सदाचरणी वागण्यामुळे ही जागा मिळवली आहेस. तेव्हा तू खरे तर इथेच राहून स्वर्गसुख घ्यावेस, हे योग्य नाही काय? तुझ्या भावांवरचे तुझे प्रेम मिथ्या आहे! तू त्यांचा विचारच करू नकोस. इथे सुखात दिवस जातील!" युधिष्ठिर म्हणाला, "देवा, जिथे माझे भाऊ नाहीत, तो स्वर्ग असला तरी मी तो नरकासमान मानतो. मी इथे राहूच शकत नाही. माझी श्यामल द्रौपदी कुठे आहे, तिथे मला घेऊन चला. माझे लाडके बंधू भीम, अर्जुन, नकुल व सहदेव जिथे आहेत व द्रौपदीचे पुत्र जिथे आहेत तिथे मी राहीन."

 

युधिष्ठिराची नजर सर्वांवरून फिरत होती. कारण, तो आपल्या भावांना शोधत होता. एवढ्यात त्याला दुर्योधन तिथे दिसला. तो रत्नजडीत आसनावर ऐटीत बसलेला पाहून युधिष्ठिराला आश्चर्याचा धक्का बसला. "हे मी काय पाहतोय इंद्र देव? जो माणूस पृथ्वीवरच्या इतक्या राजांच्या मृत्यूस कारणीभूत होता, ज्याने इतकी पापं केली त्याला इथे स्वर्गात पाहणं मला सहनच होत नाहीय! मला ताबडतोब दूर घेऊन जा!" त्यावर नारदमुनी म्हणाले, "युधिष्ठिरा, दुर्योधनाने सर्वांना आपल्या प्रेमाने जिंकले आहे. शिवाय युद्धात त्याला वीरमरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्याचा आत्मा शुद्ध झाला आहे. तो क्षत्रिय धर्माला जागला. कुणालाही भ्याला नाही. त्याने न्यायाने राज्य केले. सामंत पंचक यासारख्या पवित्र ठिकाणी त्याला वीरमरण आले. त्याला प्रत्यक्ष बलरामांचा आशीर्वाद होता. शिवाय त्याच्यासाठी गांधारीने, त्याच्या मातेने तप केले होते. मग त्याला स्वर्गाची प्राप्ती का नाही होणार? तू तुझा राग विसरून जा. कारण, स्वर्गात शत्रुत्वाला थारा नसतो." युधिष्ठिर म्हणाला, "मुनिवर्य, मला स्वर्गाचे नियम अजून ठाऊक झालेले नाहीत. मी तर माझ्या भावांचा शोध घेतो आहे. जर या दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती होते, तर त्या माझ्या भावांचे काय? त्यांनी काय अपराध केला आहे? माझा थोरला भाऊ राधेय याला पण मला पाहायचे आहे. दृष्टद्युम्नाला भेटायचं आहे. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्राण वेचले, त्यांना भेटायचं आहे. श्रीकृष्णांना भेटायचं आहे. कुठे आहेत हे सारे? मला त्यांच्याकडे घेऊन जा."

 

इंद्र म्हणाला, "तुला जर त्यांना भेटायचेच असेल, तर मी माझे सेवक तुझ्या दिमतीला देतो. ते तुला सर्व दाखवतील!" इंद्राच्या सेवकांसमवेत युधिष्ठिर निघाला. खूप अंतर त्यांनी पार केले. स्वर्गातला दिव्य प्रकाश आता लोप पावत होता. सभोवती अंधःकार दाटू लागला. सर्वत्र विषारी वायू भरून राहिले होते. घाणेरडे वास येत होते. मृत देहांवरती किडे फिरत होते. युधिष्ठिर म्हणाला, "ही जागा इतकी भयानक कशी? माझे भाऊ कुठे आहेत?" इंद्राचा सेवक म्हणाला, "महाराज, हाच पथ तुमच्या बंधूंकडे जातो. जिथपर्यंत तुम्ही जाल तिथवर. तुम्हाला न्यायचे असा हुकूम आम्हाला दिलेला आहे." परंतु, युधिष्ठिराला सारे असह्य होऊन पुढे पाऊल टाकावेनासे झाले. तो परत मागे वळणार इतक्यात त्याला आवाज ऐकू येऊ लागले. "युधिष्ठिरा, थांब जाऊ नकोस! इथेच उभा राहा! तू सदाचरणी आहेस. आम्हाला तुझी गरज आहे." त्यातील काही आवाज युधिष्ठिराला ओळखीचे वाटत होते. त्याने विचारले, "हे आवाज पूर्वी ऐकल्यासारखे वाटतात. कोण लोक आहेत हे?"

 

एक आवाज म्हणाला, "मी राधेय आहे." दुसरा म्हणाला, "मी भीम!" एकामागून एक सर्वांनी त्याला आपली ओळख दिली. द्रौपदी, धृष्टद्युम्न यांचेही आवाज त्याने ऐकले. त्याला संताप आला, तो चिडला व म्हणाला, "हे सारे इथे कसे? त्यांनी तर कोणतेही पाप केलेले नाही! काय अर्थ आहे या स्वर्गातल्या नियमांचा? दुर्योधनासारखा महापापी सुखोपभोग घेतो व माझी सारी प्रिय मंडळी नरकात खितपत पडली आहेत?" युधिष्ठिराने इंद्राच्या सेवकांना सांगितले, "तुम्ही इंद्राकडे परत जा व त्याला सांगा मी पण इथेच राहीन, मला माझी जागा सापडली आहे. मला स्वर्ग दिसला आहे!" थोड्याच क्षणात इंद्रासह सारे देव युधिष्ठिराला भेटायला आले. त्याक्षणी तिथला अंधःकार दूर होऊन उज्ज्वल प्रकाश पसरला, हवा पण सुगंधित झाली. इंद्र हसून म्हणाला, "युधिष्ठिरा, सर्व देव तुझ्यावरती प्रसन्न झाले आहेत. आज तुझे बंधुप्रेम सर्वांना भावले. प्रत्येकाला नरकवास बघावाच लागतो. प्रत्येकाने नरक ओलांडून जावे असा येथील नियम आहे. शिवाय तूसुद्धा द्रोणाचार्यांच्या वधाच्यावेळी ‘नरो वा कुंजरो वा’ असे असत्य भाषण केले होते. त्याची तुला थोडी तरी शिक्षा मिळायला हवी होती. तू तुझ्या पापातून आता मुक्त होत आहेस. ज्यांची पापे पुण्यकृत्याहून अधिक झालेली असतात, त्यांना इथे प्रथम स्वर्गवास भोगावा लागतो व मुदत संपली की ते नरकात जातात. पण, ज्यांची पुण्यकृत्ये पापाहून अधिक असतात, त्यांना आधी नरकात पाठवतात व मुदत संपताच ते स्वर्गात प्रवेश करतात, असा इथला नियम आहे. तू खोटे बोललास हे एक पाप तुझ्या वाट्याला आले. तुझ्या बंधूंना व पत्नीला का नरकात जावे लागले, हे तर तूच भीमाला कथन केले आहे. परंतु, ते सर्व आता पापातून मुक्त झाले आहेत. आता त्यांना स्वर्गवास मिळाला आहे."

 

इतक्यात तिथे यमधर्मराज आले व म्हणाले, "युधिष्ठिरा, ही तुझी तिसरी व अखेरची परीक्षा मी घेतली. तू तर माझीच प्रतिमा आहेस. तू त्यात खरा उतरलास. जरा माझ्या बरोबर चल. मी तुला तुझे प्रियजन कुठे आहेत ते दाखवतो." स्वर्गात वाहणार्‍या गंगा नदीकडे ते गेले. त्यांनी गंगेचे स्नान केले. आता त्यांना मानवी शरीर व भावना यापासून मुक्ती मिळाली. दिव्य रुप लाभले. मोठ्या आनंदाने युधिष्ठिर देवांबरोबर स्वर्गात आले. सर्वांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विराजमान झाले होते. त्याच्या बाजूलाच अर्जुनही होता. राधेय होता. बारा सूर्य होते. मारुत भीम होता. जुळे बंधू नकुल व सहदेव पण होते. सर्वांनी युधिष्ठिराचे स्वागत केले. सतेज ज्वालेसारखी द्रौपदी तिथे होती. तिचे पुत्र होते. सात्यकी व वृष्णी घराण्यातील सारे वीर तिथे होते. अभिमन्यू, धृष्टद्युम्न हेही बसले होते. बृहस्पतीच्या बाजूला वसु व द्रोण यांच्यासमवेत भीष्मदेखील होते. विदूर पण धर्माबरोबर होते, अशा रितीने युधिष्ठिराचे सर्वांनी स्वागतच केले. (समाप्त) इति महाभारत कथा

 
 

- सुरेश कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@