समर्थांचे कर्तृत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Apr-2020
Total Views |


dasbodh_1  H x

 


दासबोधाच्या पहिल्या ओवीत 'श्रोते पुसती कोण ग्रंथ' असा सवाल उपस्थित करून रामदासांनी लगेच पुढे स्पष्ट केले की,

 

ग्रंथा नाम दासबोध।

गुरु शिष्यांचा संवाद।

येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग॥

 

'भक्तिमार्ग' हा जरी या ग्रंथाचा मुख्य विषय असला तरी हा भक्तिमार्ग सर्वांगाने पुढे नेऊन त्याला 'प्रपंच-परमार्थ' जोडणारा आवश्यक घटक करावा आणि राष्ट्रभावनेची जाणीव देऊन राजकारणही त्यात समाविष्ट करावे, असे रामदासांच्या मनात होते. रामदासांनी आरत्या लिहिल्या, स्तोत्रे लिहिली आणि भक्तिपंथाची प्रशंसा केली. यावरून त्यांच्या अनुयायांनी व सामान्यांनी रामदासांना केवळ भक्तिमार्गी ठरवून टाकले, तथापि त्याहून कितीतरी महान कार्य रामदासांनी केले. त्याची दखल पुढील पिढ्यांनी घेतली नाही याचे वाईट वाटते. जुन्या रुढ परंपरा उच्छिभ करून त्यांनी क्रांतिकारक पर्वाची सुरुवातकेली व जनमताचा ओघ वळवला. परंतु, आजही रामदासांच्या भक्तांना असे बोललेले आवडत नाही. समर्थांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांच्या भ्रमंतीच्या काळात त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. समर्थांची बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती असामान्य होती. समर्थांचे चरित्रकार सांगतात की, रामदास बालपणी अत्यंत हुशार होते. गिरीधरस्वामींनी 'श्री समर्थ प्रताप' या ग्रंथात लिहिले आहे की, 'समर्थांनी ११ धड्यांमध्ये सर्व धुळाक्षरे आत्मसात केली. अक्षर सुंदर होण्यासाठी त्यांना ११ प्रहर पुरे झाले. व्यावहारिक जमाखर्च ते ११ दिवसांत शिकले.'

 

समर्थे अक्रा धड्यात केले धुळाक्षर।

अक्रा प्रहरात वळिले अक्षर॥

अक्रा दिवस केला जमाखर्च सुंदर।

ब्रह्मांड कुलकर्ण्य चालवावया॥

 

असा हा प्रखर बुद्धिमान मुलगा आयुष्यात कोणतीही भाषा सहज आत्मसात करेल, यात नवल नाही. रामदासांना मराठी, हिंदी, उर्दू या भाषा अस्खलित येत होत्या. एखादा विषय समजून सांगताना बोलण्याच्या आवेशात ते हिंदी, उर्दू, फारसी, अरबी, तसेच संस्कृत शब्दांचा उपयोग चपखलपणे करत, असे दिसून येते. समर्थ भाषाप्रभू होते. कोणताही विषय मांडताना त्या विषयांची सांगोपांग माहिती बारकाव्यानिशी त्यांच्याजवळ असे. समर्थांचे अनुभवविश्व खूप संपन्न होते. स्वानुभव व बहुश्रुतता याची प्रचिती त्यांच्या ग्रंथलेखनात येते. उदाहरणचद्यायचे झाले, तर दासबोधातील 'आध्यात्मिक ताप' हा समास पाहावा.त्रिविध तापातील या प्रकारात दुःख देहाशी संबंधित असते. इंद्रिये व प्राण यांच्या माध्यमातून ते भोगावे लागते. हे देहदुःख रामदासांनी ४० ओव्यांतून मांडले आहे. त्यात रोगांची व शरीरदुःखांचीइतकी नावे समर्थांनी दिली आहेत की, ती एखाद्या निष्णात वैद्यालाही माहीत असतील की नाही, कुणास ठाऊक. समर्थांच्या ठिकाणी मानवी व्यवहारांचे सूक्ष्म ज्ञान होते. दासबोधातील 'मूर्ख-लक्षण', 'पढतमूर्ख-लक्षण', 'करंटलक्षण', 'यत्ननिरूपण' इत्यादी समास पाहिले, तर समर्थांच्या ठिकाणी मानवी स्वभावाचे व व्यवहारांचे सूक्ष्मज्ञान होते, याचा प्रत्यय येतो. श्री. म. माटे म्हणतात त्याप्रमाणे, "रामदासांच्या समकालीन मानवी मनाचा इतका सूक्ष्म शोध इतर कोणाही ग्रंथकाराने केला नाही.''

 

रामदासांनी दासबोध ग्रंथ ओवीबद्ध लिहिला असला तरी त्यात स्वामींच्या अंगचे वक्तृत्वाचे गुण स्पष्ट दिसतात. त्यांच्या चारित्र्यामुळे व वक्तृत्वामुळे त्यांची तत्कालीन समाजावर छाप होती. सतराव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या क्रांतिकारी विचारात समर्थांचा लक्षणीय सहभाग होता. सामाजिक क्रांतीसाठी क्रांतिपूर्व काळात जनजागृती घडवून आणावी लागते. कुठल्याही क्रांतीला संघटित सामर्थ्याची आवश्यकता असते. ते संघटित सामर्थ्य राष्ट्रीय ध्येय डोळ्यांसमोर ठेवून निःस्वार्थपणे कार्य करणारे रामदास होते. रामदासांनी व त्यांच्या शिष्यमहंतांनी भारतभर शेकडो मठ स्थापून आपल्या नियोजित राष्ट्रीय कार्याची पायाभरणी फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर जेथे मुस्लीम सत्तेचे आधिक्य होते, अशा ठिकाणी केली. 'महाराष्ट्रधर्म करावा जिकडे तिकडे।' या उक्तीतील रहस्य हेच आहे. समर्थांनी संघटना निर्माण केल्या. लोकसंग्रह कसा करावा, याची तत्त्वे समजावून सांगितली. स्वतः ती आचरणात आणून लोकसंग्रह केला. तो लोकसंग्रह मानसन्मान मिळावा किंवा कोणत्याही स्वार्थी हेतूने नसून एका सात्त्विक पातळीवर समाज एकत्रित आणून हिंदवी स्वराज्याला साहाय्यभूत होण्यासाठी व हिंदू संस्कृती रक्षणार्थ केला होता.

 

तत्कालीन हिंदू समाजावर निवृत्तीवादाचा पगडा गेल्या ३०० वर्षांपासून होता. संसार करणे हे पाप समजले जायचे. बायको, मुले, त्यांच्यावरील माया-प्रेम हा परमार्थमार्गातील मोठा अडथळा आहे, असा समज दृढ झाला होता. एकंदरीत या विचाराने समाजात संसाराची अवहेलना होत होती. अशावेळी लोकांना संसाराची महती सांगून त्यांच्या मनातील विचारप्रवाह वळवणे आणि त्याला तर्कनिष्ठा, बुद्धिनिष्ठा व विवेक याकडे नेणे हे काम साधेसुधे नव्हते. ते काम यशस्वी करण्यासाठी चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व, प्रयत्नांची पराकाष्ठा, उत्तम वक्तृत्व व विचार पटवून देण्याचे चातुर्य यांची आवश्यकता होती. ते सर्व गुण समर्थांच्या ठिकाणी होते. म्हणून ते संघटना उभारू शकले. दैववादाच्या पगड्याने हतबल झालेल्या समाजाला 'यत्न तो देव जाणावा' असा मंत्र रामदासांनी दिला. क्षत्रियांना त्यांनी 'शर्थीची तलवार करावी' असा उपदेश केला. रामदासांच्या काळी मुसलमानी सत्तेच्या आक्रमणाने उग्र रूप धारण केले होते. अशावेळी लोकांमध्ये जागृती करून राष्ट्रवादाचे विचार पेरण्याचे कार्य रामदासांनी गुप्तपणे केले. त्यासाठी त्यांनी अनेक शिष्यांसमोर अनुयायांसमोर कीर्तने-प्रवचने केली असतील, व्याख्याने दिली असतील. रामदासांच्या त्याकाळच्या वक्तृत्वाचे नमुने ग्रंथबद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वशैलीला आपण मुकलो. मराठे मुळात शूर व लढवय्ये, पण ते इतरांसाठी लढत. ती विचारधारा बदलून रामदासांनी लोकांना जाणीव करून दिली की, 'म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।' इतरांसाठी लढण्यापेक्षा हिंदवी स्वराज्य स्थापण्याला साहाय्य करा, असा राष्ट्रीय संदेश स्वामींनी दिला. समर्थांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण केली. रामदासांनी हे कार्य इतक्या गुप्तपणे केले की, औरंगजेबासारख्या द्वेष्ट्या, कपटी व कारस्थानी बादशहालाही त्याचा थांगपत्ता लागला नाही. राजकारणाचा मंत्र सांगताना रामदास म्हणतात,

 

इशारतीचे बोलता नये ।

बोलायचे ते लिहू नये ।

लिहायचे ते सांगू नये । जबानीने ॥

 

अशी समर्थांची राजकारण करण्याची पद्धत होती. महंतांनाही त्यांनी राजकारण आवश्यक आहे, असे सांगितले. परंतु, ते गुप्तपणे करावे, असा सल्ला दिला आहे. 'राजकारण बहुत करावे । परंतु कळोचि नेदावे।' रामदासांच्या महंतांची हे राष्ट्रीय कार्य करण्याची पद्धत कशी होती, हे सांगताना समर्थ म्हणतात,

 

उदंड करी गुप्तरुपे ।

भिकाऱ्यासारिखा स्वरूपे ।

तेथे यशकीर्तिप्रतापे ।

सीमा सांडिली ॥

 

राजकारणातील या गुप्ततेमुळे रामदास किंवा त्यांचे महंत कुठेही औरंगजेबाच्या हेरखात्याच्या तावडीत सापडले नाहीत. पण, त्यांनी काम उदंड करून तत्कालीन लोकात, यश, कीर्ती संपादन केली होती. असे असताना रामदासांनी कोणते राजकीय कार्य केले त्याचे कागदोपत्री पुरावे दाखवा, असे जेव्हा काही विद्वान विचारतात, तेव्हा त्यांना हेच सांगावेसे वाटते की, मूर्खांच्या लक्षणात हे लक्षण सांगायचे राहून गेले! रामदासांनी संघटना निर्माण केल्या. संघटनेचे शास्त्र लोकांना समजावून सांगितले. संसाराची होणारी अवहेलना थांबवून संसाराची महती सांगितली. प्रपंचविज्ञानासाठी लोकांना तयार केले. नैराश्याने ग्रासलेल्यांना राष्ट्रधर्म शिकवला. क्षात्रधर्माची ज्योत प्रज्वलित केली. एवढे अफाट कार्य करूनही कर्तृत्व स्वतःकडे न घेता 'कर्ता राम' ही भावना मनापासून जोपासली. 'मा फलेषु कदाचन' हा गीतेतील कर्मयोग आचरून दाखवला. 'दासबोधा'सारखा एवढा महान ग्रंथ लिहून झाल्यावर त्याच्या निर्मितीची मीमांसा करताना 'समर्थकृपेची वचने तो हा दासबोध' असे सांगून ग्रंथाचे सर्व श्रेय समर्थकृपेला म्हणजे रामकृपेला दिले. तरीही ग्रंथलेखन तुमच्या हातून घडले, असे शिष्यांपैकी कोणीतरी म्हटले असावे. म्हणून समर्थांनी नम्रपणे अधिक स्पष्ट केले की,

 

सकळ करणे जगदिशाचे । आणि कवित्वचि काय मानुषाचे ।

ऐंशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ (दास. २०.१०.३५)

आपण ज्याला भक्तिमार्ग म्हणतो, त्या पलीकडील रामदासांचे हे कर्तृत्व आपण अभ्यासले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, तरच रामदासांचे कार्य समजेल.

 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@