
आवाहन करूनही कोरोना चाचणीसाठी प्रतिसाद न दिल्याने प्रविणसिंह परदेशी यांची रोखठोक कारवाई
मुंबई : मुंबई महापालिकेने वारंवार आवाहन करून आणि इशारा देऊनही स्वतःहून चाचणीसाठी हजर न राहिल्याने किंवा क्वारंटाईन न झाल्याने अखेर मुंबई महापालिकेने १५० तबलिगींविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
अखिल जगताला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईत शिरकाव करताच मुंबई महापालिकेने प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केली. त्यामुळे कोरोनाचा योग्य पद्धतीने प्रतिकार होत होता. महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना करूनही दररोज १० ते १५ रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते. मात्र ३१ मार्चला एकदम ५९ रुग्ण आढळले. त्यानंतर दररोज ५० ते ८० दरम्यान कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे पालिकेचे अरोग्य खाते अधिक सतर्क झाले. त्याआधीच निजामुद्दीनहून आलेले तबलिगी देशभर विखुरल्याचे आणि त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार जोरात होत असल्याचे निदर्शनास येत होते.
त्यामुळे राज्य शासनाने केंद्र सरकारकडून माहिती घेऊन तबलिगींच्या बंदोबस्तासाठी पावले उचलली होती. मात्र तबलिगी स्वतःहून पुढे येत नव्हते. मुंबईत १२७ तबलिगी आल्याची खात्रीशीर माहिती महापालिकेला मिळाली होती. आवाहन करून ते चाचणीसाठी पुढे येत नव्हते वा स्वतःहून क्वारंटाईन होत नव्हते. अखेर जीपीएस प्रणालीचा वापर करून गुरुवार २ एप्रिल रोजी १०५ जणांना ताब्यात घेण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मिळालेल्या आकडेवारीनुसार १० जण बेपत्ता असल्याचे आढळत होते.
मुंबईत कोरोनाचा जोरदार फैलाव होत असतानाच आशिया खंडातल्या मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण सापडला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर आजपर्यंत धारावीतच कोरोनाबाधितांची संख्या ७ वर जाऊन पोहोचली आहे. त्या दरम्यान धारावीत सापडलेल्या पहिल्या रुग्णाच्या घरी तबलिगींनी पाहुणचार झोडल्याचे उघड झाले. १८ मार्च रोजी रात्री ते धारावीत आले. २२ मार्चपर्यंत त्यांनी त्या मृत रुग्णाच्या घरी पाहुणचार झोडला. त्या दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे आणि त्यामुळे कोरोनाची बाधा सर्वत्र पसरल्याचे निदर्शनास येत होते. जे दहा तबलिगी बेपत्ता होते. त्यापैकीच हे असावेत असाही कयास बांधण्यात येत आहे.
राज्यात किंवा मुंबईत असलेल्या तबलिगींनी स्वतःहून पुढे येत चाचणी वा उपचार करून घ्यावेत. त्यांनी क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन पालिकेमार्फत सातत्याने करण्यात येत होते. मात्र कुठेतरी दडून बसलेले तबलिगी बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे इशारा देऊनही स्वत:हून पालिकेसमोर न येणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात मुंबई महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. मुंबईत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण तसे मर्यादित होते. मात्र ३१ मार्चपासून कोरोनाबाधितांमध्ये कमालीची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण केवळ दहा टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५०० हून अधिक झाली आहे. यातील बहुतेक रुग्ण हे दुबई आणि दिल्लीतील निजामुद्दीन येथून आलेल्यांच्या संपर्कातील असल्याचे परदेशी यांनी म्हटले आहे. मुंबईत साडेदहा हजार चाचण्या करण्यात आल्या असून अजूनही चाचणी केंद्रे वाढवत असल्याने रुग्णही सापडत असल्याचे ते म्हणाले. दाट वस्तीचा वरळी आणि धारावीचा परिसर सील करण्यात आला आहे. येथील ४०० लोकांना पोद्दार रुग्णालय आणि कोळी सभागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे, बाहेर फिरणारे क्वारंटाईन यांच्यावर ड्रोनद्वारे लक्ष्य ठेवले जात असल्याचेही परदेशी यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या संख्येने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनविषयी विचारण्यात आले असता, लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. जे काही मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या हिताचे असेल तो निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.