आकांक्षा पुढती जिथे गगण ठेंगणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2020
Total Views |


women_1  H x W:


'सृजनशक्ती महिला संघटना' शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्यविषयक आणि स्त्रीसबलीकरणासाठी काम करते. जनजागृती करते. महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना. या संघटनेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...


महाबळेश्वर आणि पाचगणी अगदी सगळ्या जगात माहीत असलेली ही दोन गावं. कारण, तेथील थंडगार हवा. सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणं. मुंबई-पुणे-कोल्हापूर यांना जवळ असणारी. महाबळेश्वरला येणारे खूप पर्यटक पाचगणीच्या प्रेमात पडतात आणि मुक्काम तिथेच करतात. त्यामुळे पाचगणी हे पर्यटन स्थळ असल्याने तिथे मुख्य व्यवसाय हा हॉटेल्स आणि लॉजिंग हाच. पण, पाचगणीची ओळख वेगळी आहे. हे आहे शाळांचे गाव. इथे आहेत अनेक उत्तमोत्तम निवासी शाळा. या खूप पूर्वीपासून सुरू आहेत. त्यामुळे जुन्या लोकांना पाचगणी हे 'शाळांचे गाव' म्हणूनच लक्षात असेल. हे गाव आहे 'कॉस्मोपॉलिटिन.' अशा या पाचगणीमधील 'सृजनशक्ती महिला संघटना' जिचे ब्रीदवाक्य आहे - 'आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे' हे. या संस्थेची स्थापना झाली २० नोव्हेंबर, २०१२ साली. डॉ. नीलम हातेकर या वाई महविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. पण राहायला होत्या पाचगणी येथे. पाचगणी गावापासून थोड दूर अशी सर्व प्राध्यापक मंडळींची एक सोसायटी होती. रोज वाई-पाचगणी हा येऊन जाऊन ३० किलोमीटरचा प्रवास. त्यामुळे गावातल्या लोकांजवळ फार काही बोलणं गप्पा होत नसत. पण, या प्राध्यापक सोसायटीमध्ये दरवर्षी संक्रांतीचे हळदी-कुंकू केले जाई. त्यावेळी मात्र पाचगणी गावातून खूप स्त्रिया या ठिकाणी येत.

 

डॉ. नीलम हातेकर या जेव्हा सेवानिवृत्त झाल्या, तेव्हा त्यांच्या मनात आले की, आपण बायकांसाठी एखादे महिला मंडळ सुरू करूया. येथील स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणींशी संपर्क केला आणि २० नोव्हेंबर २०१२ ला नगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत त्या आणि त्यांच्या मैत्रिणी अशा ३५ जणी एकत्र जमल्या. नीलमताई यांना आधी काही महिला संस्थांचे काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी त्याप्रमाणे संस्थेची रचना केली. पहिला प्रश्न होता नावाचा. मग खूप नाव समोर आली. त्यातून 'सृजनशक्ती' हे नाव ठरले. कार्यकारणी निवडली. दरवर्षीची ठराविक वर्गणी ठरवून दर महिन्याला एक कार्यक्रम करायचा हे ठरले. या संस्थेकडून विविध विभागांमध्ये कार्य केले जाते. शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्यविषयक आणि स्त्रीविषयक जाणिवा निर्माण करणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन काम करते ही संस्था. वैद्यकीय शिबिरामध्ये या संस्थेकडून 'पास्मियर चाचणी'चे शिबीर घेतले गेले. त्यात आजूबाजूच्या गावातील जवळ जवळ १५० महिलांना याचा लाभ झाला.

 

तेथील महिलांना आवश्यक असेल अशा गरजा ओळखून विविध विषयांवर व्याख्याने व प्रात्यक्षिके इथे आयोजित केली जातात. बागकाम, हास्ययोग, ग्राहक जागृती, पाककृती स्पर्धा, महिला सबलीकरण त्याचबरोबर महिलांच्या मनोरंजनासाठी गाण्याचे, कवितांचे कार्यक्रम ही घेतले जातात. काही आध्यात्मिक विषयांवर चर्चा ठेवल्या जातात. पाल्य आणि पालक आणि शिक्षक यांच्या मधला सुसंवाद आणि त्याचे महत्त्व अशा आवश्यक विषयांवर इथे कार्यक्रम घेऊन समाजप्रबोधन केले जाते. अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे माहितीपर व्याख्यान आयोजित केले गेले होते. आपल्या महारष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यंगना फुलवा खामकर यांची मुलाखत, तसेच विविध शाळांतून हस्ताक्षर स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धादेखील घेतली जाते. महिलांनी त्यांच्यामधील असलेल्या कलागुणांना वाव द्यावा, हे या संस्थेतून आवर्जून सांगितले जाते. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून या संस्थेचे अनेक कार्यकम सादर झाले आहेत.

 

एक महत्त्वाचा कार्यक्रम इथे महिला दिनाला होतो तो म्हणजे पाचगणी आणि आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो. अगदी तळागाळातील स्त्रियांच्या कार्याची दाखल घेऊन तिचा योग्य सन्मान केला जातो. त्याचबरोबर संस्थेच्या दोन उत्तम कार्यकर्त्यांचा सत्कारदेखील या वेळी केला जातो. हा सत्कार समारंभ हा खूप भारावून टाकणारा अनुभव असतो. कारण, प्रसिद्ध व्यक्तींच्या कार्याची दाखल सगळेच घेतात, पण आयुष्याशी झगडत असतानादेखील दुसऱ्याला मदत करण्याऱ्या किंवा अगदीच वाईट अवस्थेत असतानादेखील खूप काही करण्याऱ्या स्त्रियांची दखल घेतली जाते, हे सृजनशक्तीचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून 'आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे' हे ध्येयवाक्य आहे. आकाशात भरारी घेणारा पक्षी हा स्त्रियांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. डॉ नीलम हातेकर या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही संस्था छोट्या गावात असून स्वतःचे वेगळ अस्तित्व सिद्ध करणारी आहे. या संस्थेच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!

 

- तनुजा इनामदार

 
 
@@AUTHORINFO_V1@@