निर्मळ मनाचे परोपकारी 'फॅमिली स्टोअर्स' चे अप्पा जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2020
Total Views |


Appa Joshi_1  H


कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मन सुन्न अवस्थेत असतानाच 'फॅमिली स्टोअर्स'चे अप्पा जोशी गेल्याची बातमी कानावर आली. मन अधिकच सुन्न झाले. 'विवेक'च्या कामामुळे माझा अप्पा जोशींशी सतत संपर्क येत असे. त्यातून अप्पा जोशींशी माझा स्नेहबंध जुळत गेला आणि पुढे तो एकदम घट्ट झाल्याचा अनुभव मला येऊ लागला होता. अप्पांनी आपल्या जन्माचा सोहळा केला होता असे मी म्हणेन.


कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मन सुन्न अवस्थेत असतानाच 'फॅमिली स्टोअर्स'चे अप्पा जोशी गेल्याची बातमी कानावर आली. मन अधिकच सुन्न झाले. 'विवेक'च्या कामामुळे माझा अप्पा जोशींशी सतत संपर्क येत असे. त्यातून अप्पा जोशींशी माझा स्नेहबंध जुळत गेला आणि पुढे तो एकदम घट्ट झाल्याचा अनुभव मला येऊ लागला होता. अप्पांनी आपल्या जन्माचा सोहळा केला होता असे मी म्हणेन. 'फॅमिली स्टोअर्स' या आपल्या कर्मभूमीतून हा सोहळा ७५ वर्षे चालू होता. त्यांनी फक्त आपला व्यवसाय चालविला नाही तर तो एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपल्या विशाल कर्तृत्वाने पसरविला. पसरलेला वटवृक्ष ज्याप्रमाणे अनेकांना आधार देतो अगदी तसेच एखाद्या वटवृक्षाप्रमाणे अनेक गरजवंतांना आधार दिला, हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. अप्पा जोशी यांचे 'फॅमिली स्टोअर्स' म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी मिळवायची याचं उत्तम उदाहरण होईल. अविश्रांत मेहनत, परमेश्वरावर नितांत श्रद्धा त्यांनी जोपासली. जिद्द, चिकाटी व सौजन्याने बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जाण्याची अप्पांची वृत्ती यामुळेच ते 'फॅमिली स्टोअर'चा वटवृक्ष उभा करू शकले, असे मला वाटते.

 

अल्प शिक्षण घेतलेले अप्पा कोकणातील राजापूर येथून फक्त नेसत्या वस्त्रानिशी मुंबईच्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आपले नशीब आजमावण्यासाठी येऊन दाखल झाले होते. आपल्या सौजन्यपूर्ण वागण्यातून आणि त्याहीपेक्षा जास्त अविरत मेहनत करण्याच्या वृत्तीतून त्यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले. असे हे अप्पा मला एक असामान्य व्यक्तिमत्त्व वाटतात. कारण, माणूस जसा आर्थिकदृष्ट्या संपन्न होत जातो, तसा तो धूर्त आणि व्यवहारी बनत जातो. अप्पांनी कधी आपल्यातील विनम्रता सोडली नाही. त्यांच्यामध्ये हे वेगळेपण मला नेहमी जाणवले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाबरोबर अप्पांचं आत्मीय नातं जुळलं होतं. दुसऱ्याचं दुःख जाणून त्याला साहाय्य करणं हा जणू त्यांचा छंद होता. वेगवेगळ्या वाटांनी समाजाशी जवळीक साधून समाजाची आपली नाळ जोडून घेताना त्यांनी आपल्या गावी शाळा, धर्मशाळा, देवळे बांधली. एखादा माणूस जेव्हा स्वतःसाठी घर बांधतो, तेव्हा ते 'कर्तव्य' असते. पण जेव्हा दुसऱ्यासाठी घर बांधतो तेव्हा तो 'धर्म' असतो. अप्पांनी स्वकष्टाने परिश्रमाने कमावलेले, परंतु आपण समाजाचे काही देणे लागतो अशी जाणीव ठेवून ते सतत देतच राहिले आणि हाच आपला धर्म आहे असे ते म्हणत. आपला हा धर्म करीत असताना त्यांनी एका हाताने दिलेले दुसऱ्या हातालाही कळू दिलं नाही. व्यवहारी तत्त्वज्ञानाला अंतिम सत्य मानणाऱ्या या दुनियेत धर्माच्या मार्गावर चालणारे अप्पा जोशी म्हणजे माझ्या दृष्टीने एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांना एकदा त्यांच्या यशाचे तत्त्वज्ञान काय आहे? असे विचारले होते. आपल्या यशाचे तत्त्वज्ञान सांगताना अप्पा म्हणतात की, "ज्यांना हसता येत नाही, त्यांनी धंदा करू नये." त्यातून त्यांच्या यशाचे गमक आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आपल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यामुळेच 'फॅमिली स्टोअर्स'चे अप्पा जोशी हे ग्राहकांसाठी केवळ एक दुकानदार नव्हते, तर आपल्या जगण्यातील सुखाचे, दुःखाचे,आनंदाचे प्रसंग सांगण्याचे एक हक्काचे माणूस होते. त्यामुळेच अप्पा आपल्या व्यवसायामध्ये असामान्य यशाबरोबर विलक्षण लोकप्रियताही मिळवू शकले. अप्पांच्या मनामध्ये कुठेही या गोष्टीचा अहंकार निर्माण झाला नाही.

 

जसे अप्पा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी समाजाला जोडून ठेवणारे एक केंद्र होते, तसेच ते आपल्या कुटुंबातही एक आधारस्तंभ होते. त्यांच्या पत्नी शैलाताई जोशी सांगतात की, "लग्न होऊन घरी आल्यानंतर अप्पांनी मला एक गोष्ट सांगितली आणि अप्पा हे व्यक्तिमत्त्व काय आहे हे त्या क्षणी मला कळलं. अप्पांनी सांगितले, "हे बघ माझ्यावर संसाराची जबाबदारी आहे. माझ्या भावंडांचे शिक्षण, लग्नकार्य व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडण्याचा शब्द माझे वडील अंथरुणावर असताना मी त्यांना शब्द दिलेला आहे. आपण दोघांनी आपली हौस मजा खुंटीला टांगून ठेवायची. आपली सगळी कर्तव्य निभावून झाल्यानंतर म्हातारपणी सुख मिळालं तर ते अनुभवू." शैलाताईंनी 'तू तिथे मी' असं म्हणत अप्पांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांना आयुष्यभर साथ दिली. १९९५मध्ये भारताच्या व्यापारी शिष्टमंडळातर्फे एक यशस्वी व्यावसायिक म्हणून अमेरिकेला जाण्याचा योग अप्पा आणि शैलाताईंना आला. सातासमुद्रापलीकडे ती झगमगती दुनिया पाहताना शैलाताई मात्र लग्नाच्या पहिल्य दिवसाच्या त्या आठवणीत हरवून गेल्या होत्या. लग्नाच्या पहिल्या दिवशी मिळालेला कानमंत्र त्यांना आठवत होता. वेळोवेळी मदतीचा हात देऊन माणसं जोडणे ही अप्पा जोशी यांची कला होती. मुंबईत १९८५ पासून गिरण्यांचे संप सुरू झाले होते. त्या गिरणी कामगारांच्या बायकांना त्यांनी तिळाचे लाडू, वड्या, पापड, कुरडया अशा स्वरूपाचे विविध पदार्थ बनवण्याचा उद्योग सुरू करून दिला. ते पदार्थ आपल्या 'फॅमिली स्टोअर्स'मध्ये विक्री करण्याची व्यवस्था सुरू केली. यातून अनेक गिरणी कामगारांच्या घरांमध्ये चूल पेटवली. आपल्या दुकानातील सेवकांच्या बायकांनाही गृह उद्योग करायला लावून त्यांनी तयार केलेल्या वस्तू आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या. त्यांनी ७५ वर्षांमध्ये फारसे सेवक बदलले नाहीत. अनेक सेवक 'फॅमिली स्टोअर्स'मध्ये आले आणि तेथेच 'रिटायर' झाले. काही तरुण सेवक जे आज आहेत, त्यातील कित्येकांना अप्पांनी आपल्या पुढील पिढ्यांकडे म्हणजे नातवंडांकडे सोपविला आहे.

 

अप्पांचा एक चांगला अनुभव मला आला होता तो इथे तुम्हाला सांगावासा वाटतो. मी अप्पांना विचारले, "अप्पा, समाजातील जो कोणी तुमच्याकडे मदत मागायला येतो, त्यांना यथाशक्ती मदत तुम्ही करत असता. हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये कोणती भावना असते?" माझ्या या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "राजापूरवरून मुंबईत उदरभरण करण्यासाठी येताना माझ्यासोबत मी फक्त अंगावरील कपडे, काखोटीला एक चादर आणि सोबत एक लोटा आणला होता. आज 'फॅमिली स्टोअर्स'च्या माध्यमातून या मुंबईने मला खूप काही दिले आहे. तो लोटा संपन्नतेने भरून वाहतोय. त्या लोट्यामध्ये जे काही आहे ते माझं आहे आणि लोट्यातून ओसंडून जे बाहेर वाहते आहे ते समाजाचे आहे. या सरळ, साध्या भावनेतून मी लोकांना मदत करीत असतो. अप्पांच्या या सरळ, साध्या भावनेमुळे अप्पा कधी यशस्वी व्यापारी म्हणून माझ्या लक्षात राहिले नाहीत तर सज्जन, निर्मळ आणि मानवतेची किनार असलेले व्यक्तिमत्व म्हणूनच ते नेहमी माझ्या लक्षात राहिले आणि पुढेही राहतील. वयाच्या ९३व्या वर्षी आपला स्नेहमय प्रवास थांबून निर्मळ मनाचे आणि परोपकाराच्या भावनांची किनार जीवनाला असलेले अप्पा जोशी आपली कर्मभूमी 'फॅमिली स्टोअर्स' सोडून दादरच्या वैकुंठधामातून आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. 'माणसाने किती वर्ष जगावं?' टॉलस्टॉयच्या या जगप्रसिद्ध कथेमध्ये याचे उत्तम उदाहरण सांगितले आहे. माणसाने किती वर्ष जगावे याचा हिशोब काही या जगामध्ये कुठेही सांगितलेला नाही. त्यामुळे जगता येईल तेवढे जगत राहिले पाहिजे, असे सोपे उत्तर माणसाने काढलेले आहे. 'फॅमिली स्टोअर्स'च्या अप्पा जोशी यांनी आपल्या जीवन प्रवासातून बहुधा याला उत्तर दिलं असावं. माणसाने किती वर्षे जगावे यापेक्षा जन्म आणि मृत्यूमधील ती वर्षं ज्याला आपण 'जीवन' म्हणतो, ते सुंदर कसे करता येतील? संपन्न, परोपकारी आणि समाधानी जीवन जगून अप्पांनी याचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

- अमोल पेडणेकर
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@