जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही?; तब्लीगीवरुन पवारांचा सवाल
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या काळात काळजी घ्या,” असे आवाहन शरद पवार यानी यावेळी केले. तसेच त्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणच्या कार्यक्रमावरही भाष्य केले.
“डॉक्टर, नर्स हे कष्टाने काळजी घेत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी घरी बसायला पाहिजे. सर्व जात- धर्मांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.
“महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे संमलेनाची विनंती धार्मिक संघटनांनी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री यांनी विचार करुन ही परवानगी नाकारली. म्हणून ती खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं,” असेही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
“कोरोनाबाबत मी जे काही टीव्हीवर बघतो. त्यापेक्षा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरचे मॅसेज काळजी करण्यासारखे आहेत. त्यातील ५ पैकी ४ मेसेज हे खोटे असतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे,” असे आवाहन शरद पवारांनी केले.
“यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा. महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया,” असेही आवाहन शरद पवारांनी सर्व जनतेला केलं.