चीनने पसरवला 'कोरोना'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020   
Total Views |

xi jingping_1  

 


सध्या जगातील सुमारे २०० पेक्षा अधिक देश कोरोना महामारीशी झगडत आहेत. तसेच कोरोना विषाणू नेमका कुठून पसरला, याचा शोध घेण्यात विविध देशांची सरकारे व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटन सरकारला गुप्तचरांमार्फत कोरोना विषाणूबद्दल एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण प्रथम चीनच्या प्रयोगशाळेमधून प्राण्यांना झाले आणि नंतर तो मानवी शरीरात पसरला, असे या गुप्तचरांच्या 'कोब्रा' नामक समितीने म्हटले आहे.

ब्रिटिश गुप्तचर संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत इबोला, निपाह, सार्स आणि इतरही घातक विषाणूंवर संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांनी आपल्या मायस्क्रोस्कोपमधून एका विचित्र विषाणूची सुरुवातीला नोंद घेतली. वैद्यकीय इतिहासात अशा प्रकारचा विषाणू यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. कोरोना विषाणूच्या 'जेनेटिक सिक्वेन्स'कडे अधिक बारकाईने पाहिल्यास तो वटवाघळात आढळणार्‍या विषाणूंच्या जवळचा असल्याचे मानले जात होते. २००२-०३ साली चीनमध्ये महामारीचे रूप घेणार्‍या आणि चीनमध्ये ७०० पेक्षा अधिक लोकांचा जीव जाणार्‍या 'सार्स' विषाणूशी कोरोनाचे साम्य दिसत होते. सार्सच्या प्रादुर्भावावेळीही तो स्पर्शाने आणि संक्रमित व्यक्तीच्या शिंकेतून पसरतो, असे सांगितले जात होते.

दरम्यान, 'डेली मेल' या ब्रिटिश माध्यमात कोरोनाशी संबंधित वृत्त आले आहे. कोरोना विषाणू चीनच्या वुहान येथील प्राण्यांच्या बाजारातून मानवात पसरला, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. परंतु, चीनच्या प्रयोगशाळेतून या विषाणूने बाह्यजगात प्रवेश घेतला, ही बाब नाकारता येणार नाही, असे या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गठित केलेल्या 'कोब्रा' या आपत्कालीन समितीच्या एका सदस्याने म्हटले की, मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू प्राण्यांपासून पसरला, यात शंकेला वाव नाही. तथापि, वुहानच्या प्रयोगशाळेमधूनच हा विषाणू मानवामध्ये पसरायला सुरुवात झाली, हेही स्पष्ट होत आहे. ब्रिटिश गुप्तचरांच्या अहवालानुसार सर्वप्रथम वुहानमधील विषाणू प्रयोगशाळेच्या कर्मचार्यांच्या रक्तात कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आणि तिथून पुढे स्थानिकांना त्याची लागण झाली.

दरम्यान, वुहानमधील प्रयोगशाळेचे नाव 'इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' असे असून इथे अनेक प्रकारच्या चाचण्या, प्रयोग केले जातात. वुहानमधील 'इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' ही चीनमधील सर्वाधिक प्रगत विषाणू प्रयोगशाळा आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही प्रयोगशाळा वुहानमधील प्राण्यांच्या बाजारापासून केवळ १० मैलाच्या अंतरावर आहे. याव्यतिरिक्त 'वुहान सेंटर फॉर डिसिज कंट्रोल' ही संस्थादेखील प्राण्यांच्या बाजारापासून केवळ तीन मैलांवर आहे. चीनच्या 'पीपल्स डेली' या दैनिकाने २०१८ साली असेही म्हटले होते की, या संस्थांकडे घातक अशा 'इबोला' विषाणूवरदेखील प्रयोगात्मक चाचणी करण्याची पात्रता आहे. चीन आणि कोरोना विषाणूचा प्रसार यातली संशयास्पद बाब म्हणजे, मृतांची आकडेवारी.

चीनमध्ये कोरोना संक्रमितांची ८१ हजार, ६३९ 'पॉझिटिव्ह' प्रकरणे समोर आली, तर ३ हजार, ३२६ जणांचा यामुळे बळी गेला. मात्र, जागतिक पातळीवरील प्रसारमाध्यमे, जागतिक घडामोडींचे अभ्यासक आणि वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मते, चीनमधील मृतांचा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. मात्र, हुकूमशाही असलेल्या चीनमध्ये नेमके काय सुरू आहे, हे कोणालाही समजू शकत नाही.

कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले असताना आणि अनेक देश यासाठी चीनला जबाबदार ठरवत असताना, चीनने मात्र विचित्र करामती केल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेल्या इटलीला सध्या जीवनरक्षक 'पीपीई किट्स'ची नितांत आवश्यकता आहे. मात्र, इटलीच्या याच असहाय्यतेचा फायदा घेण्याचे काम चीनने केले असून आपला अमानवी चेहराही दाखवून दिला. वुहानमध्ये कोरोनासंसर्ग वेगाने पसरला, त्यावेळी इटलीने चीनला 'पीपीई किट्स' देणगी म्हणून दिल्या. आता वुहानमधील कोरोना साथ आटोक्यात आली असून इटलीत मात्र त्याचा धुमाकूळ सुरू आहे. इटलीने याच पार्श्वभूमीवर चीनकडे 'पीपीई किट्स' मागितल्या. चीन मात्र इटलीने केलेली मदत विसरून त्या देशाने 'पीपीई किट्स' आपल्याकडून विकत घ्याव्यात, असे म्हणताना दिसत आहे. म्हणूनच चीनची वर्तणूक कोरोनाप्रकरणात मग तो कोरोनाचा प्रसार असो वा आता इटलीबाबत घेतलेली भूमिका, माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचेच स्पष्ट होते.




@@AUTHORINFO_V1@@