देशात ८ हजार ३२४ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

    30-Apr-2020
Total Views |


luv agarwal_1  

रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्क्यापेक्षाही जास्त, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ११ दिवसांवर


नवी दिल्ली : देशात आतापर्यंत ८ हजार ३२४ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून आता रुग्ण बरे होण्याचा दर हा २५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे रुग्ण दुप्पट होण्याचा वेगही आता ११ दिवसांवर गेला असून ही भारतासाठी आश्वासक स्थिती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनाविषयक दैनंदिन पत्रकारपरिषदेत गुरूवारी केले.




देशात आतापर्यंत एकुण ८ हजार ३२४ कोरोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता २५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातल एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ०५० एवढी झाली आहे. गेल्या २४ तासात १७१८ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, ६३० रुग्ण बरे झाले आहेत आणि ६७ मृत्यू झाले आहेत. देशाता आतापर्यंत एकुण १०७४ मृत्यू झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत झालेली वाढ हा सकारात्मक संकेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.



देशात कोरोनाग्रस्तांचा मत्यूदर हा ३.२ टक्के असून त्यात ६५ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. वयोमानानुसार पाहिल्यास वय वर्षे ४५ पेक्षा कमी वयोगटात म़ृत्यूची टक्केवारी १४ टक्के, वयवर्षे ४५ ते ६० दरम्यान ३४.८ टक्के, वयवर्षे ६०च्या पुढे ५१.२ टक्के अशी आहे. त्याचप्रमाणे वयवर्षे ६० ते ७५ च्या दरम्यान ४२ टक्के, तर वयवर्षे ७५ त्या पुढे मृत्यूदर हा ९.२ टक्के आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७८ टक्के प्रकरणांमध्ये रुग्णांचे वय जास्त होते आणि त्यांना अन्य आजारही होते, हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.




रुग्ण दुप्पट होण्याचा देशाचा सरासरी वेग हा आता ११ दिवसांवर गेला असून हादेखील सकारात्मक संकेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये वेग त्याहूनही जास्त आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, तामिळनाडू, ओदिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा दर ११ ते २० दिवसांच्या दरम्यान आहे. कर्नाटक, लडाख, उत्तराखंड, हरियाणा आणि केरळचा दर २० ते ४० दिवसांवर गेला आहे. त्याचप्रमाणे आसाम, तेलंगाणा, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये ४० दिवसांपेक्षा जास्त दुपटीचा वेग आहे. आगामी काळात दुपटीचा वेग वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाविरोधात औषध अथवा लसीसंदर्भात विविध संस्था संशोधक करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसोबत भारतदेखील समन्वयाने त्यावर काम करीत आहे. मात्र, त्यामध्ये आणखी काही कालावधी लागणे अपेक्षित आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.