‘पद्मश्री साहेबजादा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020   
Total Views |
irfan khan_1  H



अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने या क्षेत्रात येण्याचं त्याने धाडस केलं. अगदी बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. असा हा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याच्या निधनाने अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे...




इरफानचा जन्म राजस्थानच्या टोंकमधल्या एका नवाबी कुटुंबात झाला होता. ७ जानेवारी १९६७ मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याचे संपूर्ण नाव ‘साहेबजादे इरफान आली खान’ असे होते. इरफानचं संपूर्ण बालपण राजस्थानमध्येच गेलं. मोठं होऊन त्याने आपला टायरचा व्यवसाय सांभाळावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्याला मात्र लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचे होते आणि अभिनय क्षेत्रात तर तो अगदी ओघाओघानेच आला.

राजस्थानमध्ये असताना आकाशवाणी जयपूर आणि ‘बीबीसी’मुळे कानावर पडणार्‍या गोष्टी त्याला आवडायच्या. मात्र, या गोष्टी त्याला त्याच्या आत्याकडे गेल्यावर अनुभवायला मिळायच्या. यामुळेच कधी एकदा सुट्टी पडते आणि आपण तिथे जातो, असं त्याला नेहमी वाटायचं. त्याची आत्या एका खेड्यात राहायची. मात्र, तिच्या शेजारीच गावातलं एकमेव चित्रपटगृह होतं. त्यांच्या घरात आणि चित्रपटगृहामध्ये फक्त एक भिंत उभी होती. त्यामुळे चित्रपट लागला की, सगळ्या लहानमुलांची चित्रपटगृहाच्या कोपर्‍यात बसण्याची सोय व्हायची. इथूनच त्याला चित्रपटांची गोडी लागली. आपणही मग या क्षेत्रात काम करायचं, असं त्याने ठरवलं.

पडद्यावरचे नसिरुद्दीन शहा, राजेश विवेक यांच्या भूमिका बघून इरफानला स्फूर्ती आली, पण प्रत्यक्षात सुरुवात कशी करायची याची मात्र त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचवेळी एका परिचिताने इरफानला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये जाऊन अभिनयकला शिकण्याचा सल्ला दिला. त्या क्षणापासून इरफानला जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी ‘एनएसडी’च दिसू लागलं. अखेर त्याने तिथे प्रवेश मिळवला आणि तिथून उत्तीर्ण होऊन तो ‘मायानगरी’ मुंबईत दाखल झाला. नवाबी पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानला मायानगरीत आल्यावर मात्र अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

घरादारापासून लांब आलेल्या इरफानने एव्हाना अनेक दिग्दर्शकांकडे रांगा लावायला सुरुवात केली होती. याचवेळी दोन वेळची भूक भागावी आणि डोक्यावर राहायला छापर मिळावं म्हणून त्याने एका मित्राच्या मदतीने एसी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. नशीबाची साथ मिळालेल्या इरफानच्या कामाची सुरुवात योगायोगानं सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घराचा एसी दुरुस्त करण्यापासूनच झाली. नोकरी सोबतच दिग्दर्शक-निर्मात्यांचे उंबरठे झिजवण्याचे कामही सुरूच होते.

दरम्यानच्या काळात त्याने दूरदर्शन, सेट इंडिया, स्टार प्लस या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिन्यांमध्ये मिळेल काम करण्यास सुरुवात केली होती. ‘चंद्रकांता’, ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘श्रीकांत’, ‘बनेगी अपनी बात’सारख्या मालिकांमधून तो प्रेक्षकांना भेटत राहिला. त्याचवेळी राकेश मोहन यांनी अनुवादित केलेल्या ‘लाल घास पर निले घोडे’ या नाटकावर आधारित टेलीफिल्ममध्ये त्याने ‘लेनिन’ची भूमिका साकारली.

मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. त्याची छोटीशी भूमिका असलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले, तर ‘ऑस्कर’साठी नामांकनदेखील मिळालेलं. त्यानंतरही अनेक चित्रपटांतून छोट्या छोट्या भूमिका त्याने साकारल्या. घरखर्च भागात होता. सगळं व्यवस्थित सुरु होतं, मात्र इरफान मधला अभिनेता अद्याप तृप्त झाला नव्हता. तब्बल पंधरा वर्षे त्याने अशा भूमिका साकारल्या. आता काहीतरी वेगळं करायचं असं त्याने पक्क ठरवलं. त्याचवेळी लंडनस्थित दिग्दर्शक असिफ कपाडिया यांनी भारतात ‘द वॉरिअर’ या चित्रपटासाठी काम करण्यास सुरुवात केली. नायक म्हणून त्यांनी या चित्रपटासाठी इरफान खानची निवड केली. त्यांच्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीयस्तरावर कीर्ती मिळवली. लहानलहान भूमिकांमध्ये समाधान मानणार्‍या इरफानने या चित्रपटातून बॉलीवूडला आपली दखल घेण्यास भाग पाडलं.

इरफानसोबत ‘एनएसडी’मध्ये शिकणार्‍या तिग्मांशू धुलियाने इरफानला २००३ मध्ये ‘हासिल’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार्‍याची संधी दिली. या भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर तिग्मांशूच्या ‘चरस’, ‘पानसिंग तोमर’, ‘बेगम सामरू’, ‘साहेब, बीबी और गँगस्टर रिटर्न’, ‘बुलेट राजा’ या चित्रपटात इरफान झळकला. ‘पानसिंग तोमर’साठी इरफानला अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’मधील भूमिकेने त्याने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. ‘रोग’ चित्रपटानंतर तो खर्‍या अर्थाने चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर झाला.

‘मेट्रो’, ‘द नेमसेक’, ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘मुंबई मेरी जान’, ‘न्यूयॉर्क’, ‘सात खून माफ’, ‘द लंच बॉक्स’, ‘हैदर’, ‘तलवार’, ‘पिकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’ या सगळ्याच चित्रपटांसाठी इरफानला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २०११ मध्ये त्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

इरफानचा अभिनय प्रवास हा भारतातच नव्हे तर हॉलीवूड आणि ब्रिटिश चित्रपटजगतातदेखील वाखाणला गेला. ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘लाईफ इन मेट्रो’, ‘सच अ लाँग जर्नी’ यांसारख्या इंग्रजी चित्रपटांतूनही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘द ट्रिटमेंट’ या इंग्रजी मालिकेत त्याने साकारलेला ‘सुनील’ अमेरिकेतील प्रेक्षकांची दाद मिळवून गेला.

२०१८ ला इरफानला कर्करोगाचे निदान झाले. मात्र, त्यावर उपचार घेऊन तो पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाला होता. मात्र, नववर्षाच्या सुरुवातील प्रदर्शित झालेला ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. २९ एप्रिल, रोजी इरफानने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अगदी काहीच दिवसांपूर्वी इरफानला मातृशोक झाला होता. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे त्याला तिचे अंतिम दर्शनही घेता आले नाही, याची खंत त्याने व्यक्त केली होती.

विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा अनेक भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार्‍या या हरहुन्नरी अभिनेत्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!
@@AUTHORINFO_V1@@