वरळी कोळीवाड्यात पोलिसाला करोनाची लागण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |

worli_1  H x W:


२४ तास ऑनड्युटी असलेल्या पोलिसबांधवांनाही कोरोनाचा विळखा

मुंबई : रेल्वे पोलिसांनंतर आता मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलला करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. ‘व्हीआयपी' सुरक्षेसाठी तैनात असणारा हा पोलिस कॉन्स्टेबल असून वरळी येथील पोलिस वसाहतीमध्ये वास्तव्यास आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने वरळी पोलिस कॅम्पमध्ये घबराट पसरली असून कॉन्स्टेबल राहत असलेली आणि आजूबाजूच्या काही इमारती सील करण्यात आल्या आहेत.


मुंबईमध्ये करोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना यामध्ये आता २४ तास ऑनड्युटी असलेल्या पोलिसांचाही समावेश होऊ लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे ड्युटीवर असलेला एक पोलिस करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त ताजे असतानाच मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या आणि व्हीआयपी सुरक्षा विभागात नेमणुकीला असलेल्या पोलिसाला करोनाची लागण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पोलिस कॉन्स्टेबल १८ मार्च रोजी आपल्या एका मित्रासोबत लोणावळा येथे जमीन खरेदी करण्यासाठी गेला होता. याचदरम्यान पोलिस दलातच कार्यरत असलेला त्याचा भाऊ सायन रुग्णालयात दाखल होता. भावाच्या देखभालीसाठी रोज सायन रुग्णालयात जाणारा हा कॉन्स्टेबल आजारी पडल्याने त्याला १ एप्रिल रोजी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पत्नी आणि दोन मुले यांचे वेगवेगळ्या रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले आहे.


पोलिस करोना बाधित असल्याचे महापालिकेने कळवताच वरळी पोलिसांनी तो वास्तव्यास असलेल्या इमारतीचा आजूबाजूचा परिसर सील केला आहे. वरळी कोळीवाडा, आदर्श नगर पाठोपाठ आता वरळी कॅम्पचा काही परिसर सील करण्यात आल्याने वरळीत प्रचंड घबराट पसरली आहे. वरळी बरोबरच हा कॉन्स्टेबल नेमणुकीला असलेल्या संरक्षण आणि सुरक्षा विभागातही खळबळ उडाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@