मुंबईतील वाघ-सिंह-बिबट्यांच्या आहारात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020   
Total Views |
tiger_1  H x W:
 
 

म्हशीचे मांस मिळत नसल्याने कोंबडीचा आहार

 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लाॅकडाऊनमुळे मुंबईतील देवनार कत्तलखान बंद असल्याने म्हशीचे मांस उपलब्ध होत नाही आहे. या परिस्थितीत बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' आणि भायखळ्याच्या 'वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालया'तील (राणीची बाग) मासांहारी प्राण्यांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. पिंजराबंद असलेले वाघ, सिंह, बिबटे, कोल्हे, तरस या प्राण्यांना आता म्हशीच्या मांसाऐवजी कोंबडीचे मांस खाऊ घालण्यात येत आहे.
 
 
 
मुंबईतल्या लाॅकडाऊनचा परिणाम पिंजराबंद वन्यजीवांच्या आहारावर देखील पडला आहे. नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील पिंजराबंद अधिवासामधील मासांहारी वन्यजीवांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. या प्राण्यांना म्हशीचे मांस खादय म्हणून देण्यात येते. या मांसाचा पुरवठा देवनारच्या कत्तलखान्यातून होतो. मात्र, आता लाॅकडाऊनमुळे कत्तलखाना बंद झाला आहे. परिणामी म्हशीचे मांस मिळत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्राण्यांना आता कोंबडीच्या मांसाचा खुराक सुरू केला आहे. राणीबागेत प्रत्येकी दोन वाघ, बिबटे, तरस आणि चार कोल्हे आहेत. तर नॅशनल पार्कमध्ये पिंजराबंद अधिवासात वाघ, बिबटे आणि सिंह मिळून २० मांसभक्षी प्राणी आहेत.
 
 
 
 
यासंदर्भात राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांंनी सांगितले की, आमच्याजवळील २० मांसभक्षी प्राण्यांसाठी दररोज १०० ते १२० किलो मांस लागते. पंरतु, लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देवनार कत्तलखान बंद असल्याने म्हशीच्या मांसाच्या अनुपलब्धतेमुळे आम्ही प्राण्यांना खाण्यासाठी कोंबडीचे मांस सुरु केले आहे. आज आम्हाला मांसाची निर्यात करणाऱ्या एका निर्यातदाराकडून म्हशीचे गोठलेले (फ्रोझन) मांस मिळाले असल्याचे पेंठेंनी सांगितले. राणीच्या बागेतील मांसभक्षी प्राण्यांना देखील कोंबडीचे मांस देत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कोमल राऊळ यांनी दिली. याठिकाणी दररोज जवळपास ५० किलो मांसाची आवश्यकता असते. म्हशीचे मासांपेक्षा कोंबडीच्या मांसामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असल्याचे राऊळ यांनी नमूद केले. राणीबाग प्रशासनही गोठवलेले म्हशीचे मांस मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@