मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका सर्वस्तरीय प्रयत्न करत आहे. पालिकेच्या ४०० चमूने दोन दिवसात ३१ हजार ८७२ घरांमधील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यातील ४ हजार ३१२ ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळून आले आहे. तर यापैकी १०४ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले.
कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड विषयक आजार, अनियंत्रित दमा यासारखे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा अधिक धोका संभवतो असे निदर्शनास आले आहे. यानुसार 'कोविड १९' या आजाराचा संसर्ग व धोका याची अधिक शक्यता असणाऱ्या व्यक्तींचा समावेश 'कोमाॅर्बिड' गटात करण्यात येतो
या गटातील ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी ही ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांच्या बाबतीत या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. ही बाब लक्षात घेऊन अशा व्यक्तींना 'प्राणवायू उपचार पद्धती' देण्याचा निर्णय घेण्यातआला आहे. त्यानुसार कार्यवाही आता सुरू करण्यात आली आहे. प्राधान्याने आव्हानात्मक परिसरात करण्यात येत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या या सर्वेक्षणादरम्यान कोरोना बाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधित ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास त्यानुसार वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचार देखील करण्यात येत आहेत.