'रितू' ठरतोय वन्यजीव गुन्हेगारांचा कर्दनकाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020
Total Views |
dog _1  H x W:
 

सह्याद्रीत वन्यजीव गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या श्वान पथकातील 'रितू' नामक श्वान वन्यजीव गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रविवारी या श्वानाने रानडुक्करांची शिकार करणाऱ्या आरोपींचा छडा लावला. मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तो प्रसिद्ध असून गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होण्याकरिता वनाधिकाऱ्यांना त्याची मदत होत आहे.
 
 
 
 
दोन दिवसांपूर्वी 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या बफर क्षेत्रात येणाऱ्या पाटण तालुक्यातील देशमुख वाडीत वन विभागाने मोठी कारवाई केली. येथील काही ग्रामस्थांनी भाल्याच्या मदतीने रानडुक्कराची शिकार केल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. आरोपींनी शिजवलेले मटण खड्डयात पुरुन ठेवले होते. हे पुरलेले मटण गुन्ह्यांमधील महत्त्वाचा पुरावा असल्याने त्याचा माग काढणे आवश्यक होते. या कामासाठी 'सह्याद्री व्याघ प्रकल्पा'च्या श्वान पथकातील 'रितू' धावून आला. त्याने अचूकपणे खड्ड्यात पुरलेल्या रानडुक्कराच्या मटणाचा शोध घेऊन आरोपींचाही माग काढला. 'कोयना वनक्षेत्रा'च्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीने 'रितू'च्या मदतीने ही कारवाई पूर्ण केली. कारवाईअंती सहा आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 
dog_1  H x W: 0
 
 
 
'प्राॅजेक्ट टायगर' अंतर्गत तीन वर्षांपूर्वी आम्ही 'जर्मन शेफर्ड' जातीच्या 'रितू' नामक नर श्वानास प्रकल्पामध्ये आणल्याची माहिती 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'चे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी दिली. सात वर्षांच्या या श्वानाला प्रशिक्षण देण्याचे काम आमचे कर्मचारी बाळू आंगरे व सहकर्मचारी करत असून त्याला दूध, चिकन आणि श्वान खाद्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वनाधिकारी 'रितू'चा दररोज व्यायामही घेतात. कोल्हापूर आणि सातारा वनपरिक्षेत्रात घडणाऱ्या वन्यजीव गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये 'रितू' महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली. यापूर्वी खवले मांजर आणि बिबट्याच्या शिकारीच्या घटनांचा शोध लावण्यामध्ये 'रितू'ची मोठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@