उत्तम बंडू तुपे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020   
Total Views |
bandu tupe_1  H





उत्तम बंडू तुपे, ज्येष्ठ साहित्यिक आणि श्रेष्ठ माणूसही. मानवी जगण्याच्या एक दुर्लक्षित विश्वाला त्यांच्या साहित्याने जगाच्या व्यासपीठावर आणले. तुपे यांची साहित्यसमृद्धी लक्षणीय आहे. कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल ५२ पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. त्यांच्या ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोटं’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला होता. ‘झुलवा’ कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. ‘खुळी’, ‘कळा’, ‘कळाशी’, ‘नाक्षारी’ , ‘भसम’, ‘चिपाड’, ‘इंजाल’, ‘झावळ’, ‘माती’ आणि ‘माणसं’ या कादंबर्‍याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या. त्यांच्या काही आठवणी...


 
मरसता साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन मुंबईमध्ये होते. समोर सर्व अभिजात साहित्याची रूची असणारा रसिक वर्ग होता. नामदेव ढसाळांच्या ‘गोलपिठा’ कवितासंग्रहावर माझे सत्र होते. ‘गोलपिठा’ च्या काही अर्वाच्य आणि संस्कृतीचौकटी बाहेरील शब्दांचे रसग्रहण करताना मला त्यातले मूळ शब्द उच्चारावे लागलेच. त्या शब्दांना आजही सामान्य वस्त्यांमध्ये, खेडोपाडी गावचौकात सहज बोलले जाते.

 
ते शब्द, तो विशिष्ट हेल मी मांडला. अर्थात, मला जे वाटले ते मी मांडले. पण व्यासपीठावरून खाली उतरताच श्रोत्यांमधील काही जणांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. या साहित्य संमेलनात असले शब्द उच्चारायला नको होते, असा त्यांचा सूर. खरेतर इतक्या मोठ्या व्यासपीठावर साहित्यिक तेही विद्रोही साहित्यावर मी पहिल्यांदाच बोलले होते. हा विरोध पाहून माझ्या डोळ्यात अश्रू यायचेच ते काय बाकी होते. अर्थात, ‘विवेक’चे दिलीप करंबेळकरजी, रवींद्र गोळेजी यांनी मला समर्थन केले की, प्रत्येकाचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि जे सत्य आहे ते मांडायला हवेच.
 

एक प्रकारे गदारोळच झाला. पण इतक्यात एक सावळे, ज्येष्ठ गृहस्थ तिथे आले आणि म्हणाले, “पोरी तू बिलकुल माघार घिऊ नकोस, बरोबर बोललीस. भाषा, शब्द, त्याची लकब का लपवायची? नामदेवला ‘गोलपिठा’ लिहताना काय भोगलं असलं ते तू निगुतीनं मांडलंस. दुनिया गोल असली तरी प्रत्येकाची वेगळीच हाय. मला तर आवडलं बी आन पटलं बी तुझं बोलणं.”ते असे म्हटल्याबरोबर मला असे बिनधास्त शब्द बोलायला नको होते म्हणणारे पटापट बाजूला झाले. सगळेजण पांगल्यावर ते गृहस्थ म्हणाले, “बाय, वेदना समजायला माणूसपण हवं. तेच माणूसपण मग लिखाणात जीवंत होतं, असे अनुभव येतच असतात. पण आपण मातुर जे खरं आहे तेच बोलायचं, तेच लिहायचं. समजलं का साळवी ”बाई हा माणूस कोण? आणि हा मला का धीर देत आहे?” या माणसाने माझे समर्थन केल्यावर विरोध करण्यासाठी जमा झालेले ते काहीजण लगेच का पांगले?
 

मी त्या माणसाला विचारले,“ थॅक्यू काका. तुमच्यामुळे मला खूप धीर आला. पण तुम्ही कोण?” यावर ती व्यक्ती म्हणाली, “बाय, मी पुण्याला असतू माझं नाव उत्तम बंडू तुपे. उत्तम बंडू तुपे?“ ‘झुलवा’ लिहिणारे? ते आहेत हे? मला खरेच वाटेना. मी न राहून विचारले,”तुम्ही लेखक आहात का? ‘झुलवा’ लिहिले ते?” यावर ती व्यक्ती निरागस हसत मान डोलावत निघून गेली. उत्तम बंडू तुपे या ज्येष्ठ साहित्यिकाची आणि माझी ही पहिली भेट. एका ज्येष्ठ साहित्यिकाने माझे समर्थन केले. का? याला उत्तर एकच होते की, “ते खरे साहित्यिक होते. अन्याय अत्याचार, शोषण याविरोधात उभा ठाकणारे ते एक साहित्यिक वादळ होते. ते वादळ सत्य आणि वास्तव यांच्या आंदोलावरच उभारलेले होते. त्यांच्या साहित्यात एक संवेदनशील क्रांती उमटते. ती क्रांती कुणाच्याही विरोधातली नाही तर आत्मशोध, आत्मचिंतन आणि आत्मविकासाची आहे. आपण का जगतोय, आपल्याच वाट्याला भोग का? याचा विचार उत्तम तुपे यांच्या साहित्यातले नाडलेले, गांजलेले नायक किंवा नायिका करतात.
 
 
कुणी बाहेरून कितीही प्रयत्न केले तरी आपले स्वत:चे आयुष्य दुसरा कुणीही बदलू शकत नाही, तर त्यासाठी ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ किंवा ‘अत्त दीप भव’ व्हायलाच हवे. आपण आपला शोध घेत आपली शक्ती ओळखत, आपल्या समस्या आपणच सोडवाव्यात आणि आपणच आपला नवा मार्ग स्वीकारावा. आयुष्य बदलून टाकावे हाच संदेश त्यांचे साहित्य देते. हा मोठा प्रेरणादायी विचार आहे. याच विचाराची परिक्रमणा करत तुपे यांचे साहित्य मानवी मूल्यांचा पाठपुरावा करते.” एकंदरीत उत्तम तुपे यांच्या साहित्याचा विचार केला तर ते साहित्य अस्सल मानवी वेदना चितारणारे होते. पण तरीही त्यांचे साहित्य विद्रोही होते का? या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते आहे की, ते विद्रोही किंवा अन्य कोणत्याही गटातटात मोडणारे नव्हते.
 
 

तुपे यांचे साहित्य माणूसपण आणि त्याचे जगणे या एकाच अभिजात संवेदनशील नाते सांगणारे होते. त्यांची सगळीच पुस्तके वाचून अस्वस्थ व्हायला होतेच. पण ‘झुलवा’ वाचल्यानंतर मी कित्येक दिवस झोपूच शकले नाही. साधारण त्यावेळी मी महाविद्यालयात शिकत होते. 20 वर्षांपूर्वीचा काळ. मुक्ती, स्वातंत्र्य वगैरेच्या कल्पना अस्सल विदेशीच होत्या. त्यातही स्त्रीमुक्ती संघटनेशी संबंध आलेला. सुरक्षित कवचातल्या आम्ही चारचौघी मुक्ती आणि स्वातंत्र्य याबाबत तावातावाने चर्चा, वादविवाद करत असू. अन्याय अत्याचार आणि शोषणाचे कोणतेही भयंकर रूप तसे आम्ही पाहिलेही नव्हते. मात्र, ‘झुलवा’ वाचले आणि अंतर्बाह्य बदलून गेले. स्त्री नव्हे तर मानवी शोषणाचे, अत्याचाराचे असले हिडीस रूप अत्यंत वेदना देऊन गेले.
 
 

त्यातला तो एक प्रसंग तर ... आजही डोळ्यात पाणी येते. ‘झुलवा’ची नायिका जोगतिणीची दीक्षा घेऊन येते. त्या रात्री तिची आई आणि ती एकाच पालात विसावतात. त्या रात्री गावातले ३५ - ४० जण त्या पालात शिरतात. नव्याने जोगतीण झालेल्या नायिकेला जबरदस्तीने उपभोगण्यासाठी. आई आणि मुलगी, रांगा लावून ते बलात्कार करतात. अंधारात त्यांना काही दिसत नाही. पण, मुलगी कुठे आहे हे समजताच सगळे तिला घेरतात. त्यावेळी त्या आईचा आक्रोश...”अरे माझ्याकडे या... तिला सोडा... ती लहान लेकरू हाय रं...” आजही लिहिताना डोळ्यात पाणी येते. तो आक्रोश त्या असाहाय्य मातेचा. ती त्या सगळ्यांना स्वत:वर अत्याचार करायला बोलावते. का? तर तिची लहान लेक वाचेल. पण तसे होत नाही. हे दु:ख हा आक्रोश ही वेदना उत्तम तुपे यांनी अत्यंत त्रयस्तपणे, पण त्या त्या दु:खात समरस होऊन मांडली.
 

 
गेल्या वर्षीच समरसता साहित्य परिषदेच्या माध्यमातून पुण्याला उत्तम तुपे यांची भेट झाली. समरसता साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांची तुपे यांच्याशी चांगलाच स्नेह. समरसतेच्या साहित्य संमेलनाला ते हजर असत. व्यासपीठही भूषवत, तर पुण्याच्या भेटीत आम्ही सगळे तुपे यांना भेटलो. तुपेकाकांनी मला आठवणीत ठेवावे, असे काही नव्हतेच. त्यामुळे त्या भेटीत मी सगळ्या ज्येष्ठांचा संवाद एकत राहिले. सगळ्यांना भेटून ते आनंदाने चक्क रडू लागले. मात्र, काही वेळातच तुपेकाका म्हणाले, “साळवी बाई तुम्ही काय बोलत नाही. आठवलं का मुंबईला आपण भेटलेलो. तू तशीच बिनधास्त बोलतेस का? बोलत राहा लेका. आवाज उठवायचा.” मी अवाक झाले. कारण, एकतर मला लक्षात ठेवावे असे काही काकांचा आणि माझा कधीही भेट संवाद झालाही नव्हता. आता तुपे तसे आजारीच होते. त्यांची पत्नीही आजारीच होती. आयुष्यात संघर्षच होता. पण तरीही त्यांच्या स्मृती तल्लख होत्या. जाणिवा बोथट झाल्या नव्हत्या आणि २६ एप्रिलला बातमी आली उत्तम बंडू तुपे आता राहिले नाहीत. या अस्सल माणसाच्या, थोर साहित्यकाराच्या स्मृतीस माझी श्रद्धांजली..





@@AUTHORINFO_V1@@