‘विकेटकीपर’ ते ‘टीम सिलेक्टर’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020
Total Views |
MSK Prasad _1  
 




भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदावरून एम. एस के. प्रसाद नुकतेच पायउतार झाले. एक सर्वसामान्य खेळाडू ते वरिष्ठ पदाधिकारी असा प्रवास करणार्‍या एम. एस. के. प्रसाद यांच्या आयुष्याविषयी...

 

क्रिकेट म्हणजे भारतीयांचे जीव की प्राण... या खेळातील खेळाडूही जसे जगभर प्रसिद्ध आहेत, तशीच प्रसिद्धी या खेळातील प्रशिक्षक, नियामक मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांनाही मिळते. ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’च्या (बीसीसीआय) अध्यक्षांपासून ते विविध समित्यांवर कार्यरत असणार्‍या अशाच काही व्यक्ती या क्रिकेटविश्वात फार प्रसिद्ध आहेत. एम. एस. के. प्रसाद हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. जगप्रसिद्ध टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. नुकतेच ते या जबाबदारीतून मुक्त झाले.
 
 
एम. एस. के. प्रसाद यांच्या नावावर मोठी खेळी साकारल्याचा असा कोणताही विक्रम नाही. मात्र, प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी केलेले कार्य फार उल्लेखनीय म्हणावे लागेल. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद यांची निवड करण्यात आली. जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ते या निवड समितीच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक नवख्या खेळाडूंना आपले करिअर घडविण्यासाठी संधी मिळाली. आजघडीला निवड समितीचे अध्यक्षपद भूषविणारे व्यक्ती म्हणून जरी एम. एस. के. प्रसाद सर्वत्र ओळखले जात असले तरी येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनात जीवापाड संघर्ष केला आहे.
 
 
एम. एस. के. प्रसाद हे मूळचे आंध्रप्रदेशचे. मन्नावा श्रीकांत प्रसाद हे त्यांचे पूर्ण नाव. दि. 24 एप्रिल 1975 रोजी आंध्रप्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. प्रसाद यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा क्रिकेट जगताशी संबंध नव्हता. शेतीच्या पारंपरिक व्यवसायात समाधानी असलेले हे प्रसाद कुटुंबीय क्रिकेटपासून तसे चार हात लांबच होते. एका छोट्याशा खेड्यात जन्मलेले एम. एस. के. प्रसाद एकेदिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू म्हणून प्रसिद्ध होतील, असा विचार स्वप्नातही प्रसाद कुटुंबीयांतील कोणत्या सदस्यांनी केला नव्हता. मात्र, एम. एस. के. प्रसाद यांनी छोट्याशा खेड्यात राहूनही ते स्वप्न पाहिले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. आपले स्वप्न पूर्ण करताना त्यांना जीवनात अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. मात्र, तरीही ते डगमगले नाहीत. याउलट कठीण प्रसंगांचा सामना करत त्यांनी अधिक कष्ट करत आपले ध्येय पूर्ण केले.
 
 
आंध्रप्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील एम. एस. के. प्रसाद हे सर्वात पहिले क्रिकेटपटू म्हणून ओळखले जातात. प्रसाद हे आधी गुंटुर येथील मैदानावर क्रिकेट खेळायला जायचे. मात्र, गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात त्यांचे मन रमत असे. यष्टीमागे क्षेत्ररक्षण करण्यात ते पटाईत होते. उजव्या हाताचे फलंदाज म्हणूनही ते ओळखले जात. आधी मैदानावर क्रिकेटचे सामने खेळताना त्यांना आपल्यामध्ये असणार्‍या अनोख्या क्रिकेट शैलीची जाणीव झाली नाही. मात्र, यष्टीमागे उत्तमरित्या क्षेत्ररक्षण करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत क्रिकेट प्रशिक्षकांनी प्रसाद यांना क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षकांनी स्वतः याबाबत प्रसाद कुटुंबीयांशी चर्चा केली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असणार्‍या प्रसाद कुटुंबीयांना हे मंजूर नव्हते. मात्र, एम. एस. के प्रसाद अडूनच बसल्याने अखेर कुटुंबीयांचाही नाईलाज झाला. 
 
 
आर्थिक पदरमोड करत प्रसाद कुटुंबीयांनी एम. एस. के. प्रसाद यांना क्लबमधील क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून दिले. क्लबमध्ये प्रसाद हे दिवस-रात्र कसून सराव करत असे. अनेक ठिकाणी ते जिल्हास्तरीय सामने खेळण्यासाठी जात असे. जिल्हास्तरावर त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेत आंध्रप्रदेशच्या रणजी क्रिकेट संघाने त्यांची आपल्या संघात निवड केली. रणजी संघातही त्यांच्या कामगिरीचा धडाका असाच सुरु राहिल्यानंतर 1999 साली भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य संघात त्यांना स्थान मिळाले.
 
यष्टीरक्षक नयन मोंगिया यांच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक म्हणून त्यांची निवड झाली. एम. एस. के. प्रसाद यांनी एकूण सहा कसोटी, तर १७ एकदिवसीय सामने खेळल्याचा इतिहास आहे. एका सामन्यादरम्यान उजव्या हाताला दुखापत झाल्याने बरेच महिने ते मैदानापासून दूर राहिले. बरेच महिने क्रिकेटपासून दूर राहिल्याने त्यांना पुनरागमन करणे अशक्य झाले. वयाच्या ३३व्या वर्षी त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. मात्र, त्यांनी क्रिकेट सोडले नाही. आंध्रप्रदेशमधील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रसाद यांनी दिलेल्या प्रशिक्षणातून अनेक खेळाडू घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर विविध संघांकडून त्यांना प्रशिक्षक पदासाठी ‘ऑफर’ येऊ लागल्या. भारतीय ‘अ’ संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी बजावलेल्या भूमिकेची दखल घेत त्यांची निवड भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. ‘विकेटकीपर’ ते ‘टीम सिलेक्टर’ असा प्रवास करणार्‍या प्रसाद यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...!
- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@