५५ वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश

    28-Apr-2020
Total Views |
CP Mumbai _1  H

मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय


मुंबई : मुंबई पोलिस दलातील तीन हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावले उचलली आहेत. ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की, मुंबई पोलिस दलातील ५० पेक्षा जास्त वयाच्या आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर कोणताही आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी सध्या सुटी घ्यायलाही हरकत नाही. ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेही हा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.


कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलिस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत. गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी ५० वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. ५५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.