गूढ वलयांकित ‘किम जाँग उन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020   
Total Views |

south koria_1  



अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही किम मरण पावल्याच्या वृत्ताला नकार दिला. असे असले तरी अगदी भारतासारख्या देशात, जो कोरियापासून हजारो मैल दूर आहे, किमच्या मृत्यूची बातमी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे किम जाँग उनच्या गेल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीकडे दृष्टिक्षेप टाकणे क्रमप्राप्त ठरते.


उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी गेले काही दिवस समाज माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 15 एप्रिल रोजी उत्तर कोरियाच्या संस्थापक-अध्यक्ष किम इल संग यांची जयंती कोरियात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. पण, सुमारे दोन आठवड्यांपासून गायब असलेले किम जाँग उन या कार्यक्रमातही दिसले नाहीत. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीबद्दल वावड्या उठू लागल्या. 21 एप्रिल रोजी खुद्द ‘सीएनएन’ने अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांमधील आपल्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली की, किम जाँग उनवर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर ते कोमात किंवा ‘ब्रेन-डेड’ अवस्थेत असून मृत्यूशी झुंजत आहेत. त्यांची धाकटी बहीण किम जो याँग यांनी कारभार पाहायला सुरुवात केल्याच्याही बातम्या पसरल्या. त्यामुळे मग उत्तर कोरियाला पहिल्या महिला हुकूमशहा मिळणार का, याची चर्चा सुरू झाली. याची खात्री करणे अवघड होते.




कारण, उत्तर कोरिया एक अत्यंत बंदिस्त देश आहे, जिथे खाजगी वृत्तपत्रं किंवा वाहिन्या नाहीत. इंटरनेटवर निर्बंध आहेत. नागरिक सरकारच्या परवानगीशिवाय दुसर्‍या देशात काय, दुसर्‍या शहरातही जाऊ शकत नाहीत. पण, 26 एप्रिलला दक्षिण कोरियाचे (कोरिया) एकत्रीकरणमंत्री किम येओन चुल यांनी सांगितले की, “आमच्या गुप्तचर संस्थांकडे पुरेशी माहिती आहे की, जिच्या आधारे आम्ही म्हणू शकतो की, उत्तर कोरियात अनपेक्षित असे काही घडत नाहीये.” त्यानंतर दक्षिण कोरियाच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही या भूमिकेला दुजोरा दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही किम मरण पावल्याच्या वृत्ताला नकार दिला. असे असले तरी अगदी भारतासारख्या देशात, जो कोरियापासून हजारो मैल दूर आहे, किमच्या मृत्यूची बातमी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे किम जाँग उनच्या गेल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीकडे दृष्टिक्षेप टाकणे क्रमप्राप्त ठरते.


दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस कोरिया जपानच्या तावडीतून मुक्त झाला असला तरी भांडवलशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी चीन आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धात भरडला गेला. कोरियन युद्धात देशाची फाळणी झाली. उत्तर कोरियाने साम्यवाद स्वीकारला, तर दक्षिण कोरियाने मुक्त अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही. साम्यवाद स्वीकारला असला तरी उत्तर कोरियावर किम घराण्याची निरंकुश सत्ता राहिली. किम इल संग, किम जाँग इल आणि त्यांच्यानंतर 2011 साली किम जाँग उन यांच्याकडे सत्ता आली. उत्तर कोरियाचे अध्यक्षपद स्वीकारताना किम जाँग उन जेमतेम 27 वर्षांचे होते. ते अध्यक्ष होण्याआधी त्यांचे बालपण, शिक्षण, विचारधारा किंवा मानसस्वास्थ्य याबद्दल कुठेच फारशी काही माहिती उपलब्ध नाही. पण, जी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यावरून किम एक स्थूल, चंगळवादी, बिघडलेला, पण अत्यंत क्रूर असा नेता आहे. त्याने स्वतःचे काका आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला, तसेच त्याच्या वडिलांच्या काळात लष्करातील वरिष्ठ पदावरील अधिकार्‍यांना राजद्रोहाच्या संशयावरून यमसदनी धाडले असून लाखो लोकांना राजकीय बंदी बनवले, अशा बातम्या पसरल्या होत्या. ‘कोवळा बच्चा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या किमने अल्पावधीत खुर्चीवर आपली पकड बसवली. त्याच्या कारकिर्दीत उत्तर कोरिया जगापासून आणखी विलग झाली. चीन वगळता उत्तर कोरियाचे फारसे कोणाशी संबंध नव्हते. स्वतः किम सात वर्षं, म्हणजे 2018 सालपर्यंत एकदाही देशाबाहेर पडला नाही.



‘सोनी पिक्चर्स’ने किम जाँग उनच्या हत्येच्या कटावर ‘इंटरव्यू’ हा विनोदी चित्रपट बनवला होता. तो प्रदर्शित होण्यापूर्वी 24 नोव्हेंबर 2014 रोजी उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी सोनी कंपनीवर सायबर हल्ला करुन कंपनीचे प्रदर्शित न झालेले चित्रपट तसेच कंपनीच्या कर्मचार्‍यांचे आरोग्य विम्याचे तपशील आणि आर्थिक माहिती फोडून टाकली आणि जगाला आपली दखल घ्यायला लावली. त्यानंतर ते सातत्याने आपल्या आक्रमकतेसाठी चर्चिले गेले. 2003 साली अण्वस्त्र प्रसार बंदी करारातून बाहेर पडलेल्या उत्तर कोरियाने किम जाँग उन सत्तेवर येण्यापूर्वी प्रायोगिक स्तरावर दोन अणुस्फोट केले होते, पण ते चीनच्या माध्यमातून पाकिस्तानकडून मिळवलेल्या अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या आधारे. त्याबदल्यात कोरियाने आपल्याकडील क्षेपणास्त्रं तंत्रज्ञान पाकिस्तानला पुरवले. उत्तर कोरियाला खर्‍या अर्थाने अण्वस्त्रधारी देश बनवले ते किम जाँग उन यांनी. त्यांच्या काळात कोरियाने हायड्रोजन बॉम्ब आणि अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांचीही चाचणी केली.




कोरियाकडे चीनच्या मदतीने दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रं असल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील युद्धाची भीती निर्माण झाली. बराक ओबामांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासून उत्तर कोरियाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. पण, त्याची पर्वा न करता किम जाँग उन यांनी 13 फेब्रुवारी 2017 रोजी, म्हणजेच ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारुन महिन्याभरात आपले सावत्र भाऊ किम जाँग नाम यांची मलेशियातील क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नर्व्ह एजंट (विषप्रयोग) वापरुन हत्या घडवून आणली. सुरुवातीला ट्रम्प यांनी उत्तर कोरियावरील निर्बंध अधिक तीव्र केले, पण किम जाँग उन यांनी त्यास भीक घातली नाही. चीनने यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता चीनच्या दूतास भेटण्यासही किम यांनी नकार दिला. किमच्या धमक्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनीही युद्धाच्या धमक्यांद्वारेच प्रत्युत्तर दिले त्यामुळे 2017च्या अखेरपर्यंत अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात युद्ध होणार अशी दाट शक्यता निर्माण झाली होती.




2018च्या सुरूवातीपासून चित्र अचानक पालटायला लागले. किम जाँग उन यांनी दक्षिण कोरियाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जै इन यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. 9-25 फेब्रुवारी, 2018 या कालावधी दरम्यान दक्षिण कोरियातील प्येओंगचाँग शहरात आयोजित केलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांत उत्तर कोरिया सहभागी झाला. ‘आइस हॉकी’ या खेळ प्रकारात दोन्ही कोरियांची संयुक्त टीम खेळली. या स्पर्धांच्या निमित्ताने अमेरिका आणि दोन कोरियांचे नेते एकत्र आले. किम जाँग उन यांची धाकटी बहीण किम जो याँग आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स उद्घाटन सोहळ्यात एकाच स्टँडमध्ये बसले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये दोन कोरियांच्या नेत्यांनी शिखर परिषदेसाठी भेटायचे असे ठरले असतानाच मार्च महिन्याच्या सुरूवातीस डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात आपण किम जाँग उन यांना भेटून थेट चर्चा करणार असल्याचे जाहीर करून गेल्या सात दशकांपासून घोंगडे भिजत पडलेल्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असा आशावाद उत्पन्न केला. या घटनांकडे चीन कशा पद्धतीने बघत असणार, असा विचार मनात यावा तोच किम जाँग यांचे बीजिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भव्य स्वागत केल्याची बातमी बाहेर आली.





12 जून, 2018 रोजी किम जाँग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सिंगापूरमध्ये भेट झाली. अमेरिका आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. फेब्रुवारी 2019 मध्ये ट्रम्प आणि किम व्हिएतनामची राजधानी हनोई येथे भेटले आणि जून 2019 मध्ये डोनाल्ड ट्रम्प दक्षिण कोरियाला गेले असता दोन कोरियांच्या सीमांमधील सैन्य तैनात नसलेल्या पट्ट्यात तिसर्‍यांदा या नेत्यांची भेट झाली. या भेटीत ट्रम्प यांनी किम जाँग उनच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासोबत चालत उत्तर कोरियात प्रवेश केला आणि अर्धा तास घालवला. या भेटीने आणखी एक इतिहास घडवला. ट्रम्प-किम यांच्या भेटींमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील युद्धाचे काळे ढग दूर होण्यास मदत झाली असली आणि त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली असली तरी त्या पलीकडे फारसे काही घडले नाही. कारण, शांतता कराराची अट म्हणून कोरियाने आपली अण्वस्त्र नष्ट करावीत ही मागणी सोडायला अमेरिका तयार नाही आणि अशी मागणी उत्तर कोरिया कधी मान्य करणार नाही. दरम्यानच्या काळात किम यांनी रशियाला भेट देऊन व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली. आजही उत्तर कोरिया आत्ममग्नच असून जगापासून वेगळा आहे. पण, थंड रक्ताचा आणि क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या किम जाँग उनने उत्तर कोरिया आणि जगामधील पोलादी पडदा हटवण्याच्या दृष्टीने काही पावले टाकली हे मान्य करावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@