स्वदेशीतून स्वयंपूर्णता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |


rss mohanji bhagwat_1&nbs

 



विविध उद्योगांत काम करणार्‍या किंवा गावी गेलेल्या सर्वांसमोर रोजगाराचे प्रश्न उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी मांडलेला स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचा मूलमंत्र विशेष ठरतो. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणावरील हातांना काम आणि दाम देण्याची क्षमता स्वदेशी व स्वयंपूर्णतेवरच आहे. ते कसे हे समजून घेऊया.

 


कोरोना विषाणूजन्य संकटाने अवघ्या जगात थैमान घातले असून जगासह भारतही त्याविरोधात लढा देत आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक संकट काहीना काही धडा देऊन जाते, त्याचप्रमाणे कोरोना संकटानेही स्वावलंबी व्हा, असा सर्वांत महत्वाचा धडा देशाला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात भारताला प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे लागणार असून परदेशावर कमीत कमी अवलंबून राहावे लागेल. स्वदेशी उत्पादन पद्धतीस प्राधान्य द्यावे लागेल व त्यासाठी गुणवत्तापूर्ण स्वदेशी उत्पादने तयार करण्यावर भर द्यावा लागेल. सरकारलादेखील तसे धोरण आखावे लागेल,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. कोरोना साथ रोग आणि ‘लॉकडाऊन’मुळे भारतातील बहुतांश उद्योग बंद आहेत. उद्योग बंद असल्याने त्या ठिकाणी काम करणारे अनेक कामगार आपल्या गावी, आपल्या राज्यात गेले आहेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनामुळे अर्थचक्राची गती थांबली असून आगामी काळात मंदी येण्याची भाकिते वर्तवली जात आहेत. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये काम करणार्‍या किंवा गावी गेलेल्या सर्वांसमोर रोजगाराचे प्रश्न उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी मांडलेला स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचा मूलमंत्र विशेष ठरतो. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणावरील हातांना काम आणि दाम देण्याची क्षमता स्वदेशी व स्वयंपूर्णतेवरच आहे. ते कसे हे समजून घेऊया.

 


इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, स्वदेशीचा इतिहास प्रदीर्घ असून भारतीय स्वातंत्र्यलढ्यावेळीही लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांसह तत्कालीन नेतृत्वाकडून स्वदेशीचा नारा दिला गेला. स्वदेशी वस्तूंच्या वापरामुळे देशातला पैसा देशातच राहील, देशाची आर्थिक उन्नती होईल, देशातील लघु-कुटीर उद्योगांना संजीवनी मिळेल, अशी त्यामागची भूमिका होती. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा अर्थ अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगितला असून तो आताच्या कोरोना संकट काळातही लागू होतो. गांधीजी म्हणतात की, “माझ्या मते, स्वदेशी म्हणजे भारतातील कारखान्यात तयार केलेल्या वस्तू नव्हे. स्वदेशी म्हणजे भारतातील बेरोजगारांच्या हातांनी तयार केलेल्या वस्तू होय. सुरुवातीला या वस्तूंमध्ये काही त्रुटी, उणीव राहिली तरी आपण त्या वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच त्यांची निर्मिती करणार्‍यांना स्नेहभावनेने त्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करायला सांगितले पाहिजे. असे केल्याने कोणत्याही प्रकारे वेळ आणि श्रम खर्च केल्याशिवाय देश आणि देशातील लोकांची सच्ची सेवा करता येईल.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. जेणेकरुन कोरोनोत्तर काळात रोजगार गमावलेल्या बेरोजगार जनतेच्या हाताला काम मिळेल.

 


सरसंघचालकांनी सरकारलाही यासंबंधीचे धोरण तयार करावे लागेल, असे सांगितले. आपल्याला माहितीच असेल की, देशात कोणताही सण, उत्सव आला की, साध्या आकाशकंदिल, पणत्या, पतंग, विजेच्या माळा आदी वस्तू चीनमधून येतात. रोजच्या वापरातली मुलांची खेळणी, बाहुल्या, गाड्या, घरगुती वापरातील प्लास्टिकची उत्पादने या वस्तूही चीनमधून आयात केल्या जातात. देशातील बहुतांश गाव-खेड्यांत लघु उद्योग, कुटिरोद्योग कित्येक दशकांपासून सुरु आहेत. त्यापैकीच इच्छुकांना हाताशी धरुन पारंपरिक वस्तुनिर्मितीच्या कलेबरोबरच ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्या तयार करण्याचे प्रशिक्षण सरकारी स्तरावर देता येईल का, याची कृतीयोजना आता सरकारने हाती घ्यायला हवी. तसेच पारंपरिक उत्पादनांची जाहिरात व वितरणही आक्रमक पद्धतीने करण्यावर भर दिला पाहिजे. र्ई-कॉमर्सच्या जमान्यात वावरत असल्याने अशा वस्तूंच्या विक्रीसाठी ‘अ‍ॅमेझॉन’ वा ‘अलिबाबा’च्या तोडीसतोड एखादे भारतीय संकेतस्थळ यासाठी विकसित करता येईल का, याचाही विचार करुन त्याची निर्मिती केली पाहिजे. अन्नप्रक्रिया उद्योगाबद्दलही असे करता येऊ शकते. कारण, भारतात खाद्यपदार्थांचे जितके वैविध्य आहे, तितके अन्य कुठल्याही देशांमध्ये नाही. उन्हाळी, हिवाळी आणि पावसाळी अशा ऋतुमानाप्रमाणे खाण्याचे शेकडो प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. ‘इन्स्टंट फूड’, ‘रेडी टू इट’ या प्रकारात ते जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील का, यासाठी कार्यक्रम आखला पाहिजे. गाव-खेड्यांसह शहरातील महिलांनाही यामुळे रोजगाराची प्रचंड संधी निर्माण होऊ शकते.

 


लघु व कुटीर उद्योगाप्रमाणेच अन्य क्षेत्रांतही स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचा अवलंब करता येईल. ऑटोमोबाईल, विमान वाहतूक, जैव-तंत्रज्ञान, रसायन, संरक्षण, कातडे कमावणे, तेल आणि नैसर्गिक वायू, औषधनिर्माण, खाणकाम, अपारंपरिक ऊर्जास्रोत, अवकाश तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रांत भारताला व भारतीयांना स्वतःची ओळख अधिक ठळकपणे अधोरिखत करण्याचीही मोठी संधी आहे. वरीलपैकी कित्येक क्षेत्रात भारतीय कंपन्या उत्तम काम करत असून जगात अनेक देशांना त्यांनी तयार केल्या उत्पादनांची निर्यातही होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगातल्या प्रत्येक देशाला व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट्स, मास्क्स आणि ‘पीपीई किट्स’ची मोठी आवश्यकता भासत आहे. भारतालाही त्यांची गरज असून तेवढ्या प्रमाणात या वस्तू आयात करता येतीलच, याची शाश्वती नाही. त्या पार्श्वभूमीवर काही वाहननिर्मिती कंपन्यांनी व्हेंटिलेटर तयार करायला सुरुवातही केली आहे. काही कंपन्या ‘पीपीई किट्स’ तयार करत आहेत, तर अनेक ठिकाणी मास्क्सचे उत्पादनही सुरु आहे. विविध संशोधन संस्थांमध्ये ‘टेस्टिंग किट्स’ तयार करण्यात येत आहेत. म्हणजेच देशातल्या उद्योगात, कामगारांत तशी क्षमता आहे व वेळ येताच आपल्यात परिवर्तन घडवून नवीन वस्तू निर्माण करण्याची योग्यताही आहे. अशा सर्वांनाच सरकारसह समाजातल्या प्रत्येकानेच प्रोत्साहन द्यायला हवे, त्याचा योग्य वापर करुन घ्यायला हवा. नक्कीच देशात स्वावलंबनाचे वारे वेगाने वाहू लागतील. त्यातून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यास साहाय्यही मिळेल आणि अनेकांच्या हाताला कामही मिळेल.

 


स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वयंपूर्णतेचा हा विषय कोरोना संकटामुळे सध्याच्या घडीला उपस्थित झाला. हाच मुद्दा घेऊन भारताचे जे पारंपरिक ज्ञान आहे, त्याचा अधिकाधिक प्रसार देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत व्हायला हवा. प्रतिकारशक्ती उत्तम असलेली व्यक्ती कोरोनाचा सामना अधिक सशक्तपणे करु शकते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने काही उपायही सांगितले आहेत. जगभरातील कंपन्या विविध प्रकारची रसायन मिश्रीत उत्पादने वा औषधे तयार करत असतात आणि आपल्या भारतातील लोकही त्यांची खरेदी, सेवन करत असतात. पण, त्यांना आपल्या आयुर्वेदात वा योगशास्त्रात काय सांगितले आहे, याचीच पुरेशी माहिती नसते. अशा परिस्थितीत आपल्या अवतीभवती उपलब्ध असलेल्या आले/सुंठ, तुळस, दालचिनी, काळ्या मिरी, मनुका व गूळ वा लिंबूमिश्रीत काढा पिण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. अशाप्रकारचे अनेक उपाय, ओषधे, काढे निरनिराळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आपण आता त्यांचे मार्केटिंग करता येईल का, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करुन त्यांची निर्यात करता येईल का, यावरही विचार केला पाहिजे. म्हणजे परकीय कंपन्यांच्या उत्पादनांऐवजी आपल्या घरातल्या वस्तूंच्या मदतीने आपण तंदुरुस्त राहू आणि त्यांची निर्यात करुन जगालाही त्याचा वापर करायला सांगू. हादेखील स्वदेशी आणि स्वयंपूर्णतेचा एक मार्ग ठरु शकेल. औषधनिर्मिती क्षेत्राबरोबरच ऊर्जाक्षेत्रातही भारताने स्वदेशीचा अवलंब करणे गरजेचे आहे. पेट्रोलियमऐवजी सौरऊर्जेचा किंवा विजेचा, हायड्रोजनवर चालणार्‍या वाहनांचा वापर केला तर आखाती देशांवरील आपले अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. तथापि, हे एकाएकी होणार नाही, पण कोरोनाच्या संकटाने तशी संधी आपल्यापुढे आणून ठेवली आहे. आता त्या संधीचे सोने करायची जिद्द आपण बाळगली पाहिजे, सरसंघचालकांनी त्याकडे देशाचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार आगामी काळात देश म्हणून आपण सर्व, सरकार आणि प्रत्येकजण त्या दिशेने पावले उचलेल, स्वदेशीचा वापर करेल आणि स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@