परतफेडीची हीच ती संधी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |


senior citizens_1 &n 

 
 

भौगोलिक अंतर असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आणि सामाजिक जवळीक साधण्यासाठी टेलिफोन-मोबाईलची, अर्थात संपर्क आणि संवादाची गरज आहेच. आपण सगळ्यांनाही त्यांची सतत विचारपूस करणे आवश्यक आहे. आपण त्यांना आज प्रेमाने सांभाळणे हे तर परम कर्तव्यच.


आज सकाळी सकाळी मला माझ्या डॉक्टर मित्राचा फोन आला. आम्ही डॉक्टर्स कोरोनाच्या या बिकट आणि आव्हानात्मक परिस्थितीत एकमेकाला आधार देत असतो. विश्वास देत असतो. असंच आमच्या वैद्यकीयशास्त्रात काय चाललं आहे, आमचे डॉक्टर कसे वेगाने विलगीकरणात किंवा ‘क्वारंटाईन’मध्ये कसे चालले आहेत, याचा आढावा घेत होतो. तेवढ्यात माझा मित्र मला म्हणाला, “त्याचे वडील आता ९० वर्षांचे आहेत. तसे आता काही आजाराने त्रासलेले नाहीत. जे काही ‘जेनिटीक’ आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहेत, ते देखरेखीखाली स्थिर आहेत. अचानक या ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत ते माझी जायची वेळ झाली आहे, असे म्हणायला लागले आहेत.” आजची परिस्थिती तशी जिकिरीची आहे. आपण सगळे सामाजिक प्राणी आहोतच. खरे तर आपले ‘सोशल नेटवर्क’(आपले कुटुंब, मित्रमंडळी, जात, धार्मिक) आपल्याला या जगात जगायला आणि परिणत व्हायला मदत करते. आज आपल्याला दोन गजाची भौगोलिक दूरी आणि स्वतःवर लादलेले विलगीकरण यामुळे आपली सामाजिक साखळी खरेतर भंग झाली आहे. ही वैश्विक महामारी वणव्यासारखी पसरत चालली आहे. कामाच्या जागा मोकळ्या पडल्या आहेत. सोसायटीच्या मोकळ्या जागा ओस पडल्या आहेत. ‘कोविड’चा ‘अ‍ॅटॅक’ मानवी शरीरापेक्षा मानवी मनावर खूपच असह्य झाला आहे.

 
सगळ्याच वयाच्या स्त्रिया व पुरुषांत कोरोनाचा भयग्रस्त आघात उघडउघड दिसून येतो. त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिक कोरोनामुळे फारच त्रस्त आहेत आणि काहीसे धास्तावले आहेत. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तुलनात्मकदृष्ट्या कोरोना आणि लॉकडाऊनचा जास्त परिणाम झालेला दिसतो. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या वयोवृद्ध माणसांना आरामात दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या हालचाली करायला जमत नाही. जेव्हा सांभाळ करणारी ‘केअर टेकर’ मंडळी घरी असतात, तेव्हा त्यांच्या आधाराने बरंच काही त्यांना करता येत असे. पण, आता बरीच ज्येष्ठ मंडळी एकटीच राहतात. कारण, त्यांची मुलं नोकरी-व्यवसायानिमित्त इतर राज्यांत किंवा परदेशात वास्तव्यास असतात, तर काहींनी आपले संसार वेगळे थाटले आहेत. अशावेळी या उतारवयात ही मंडळी स्वत:चा आणि स्वत:च्या साथीदाराचा सांभाळ तरी कसा करणार म्हणा! यातील मला माहीत असलेली काही मंडळी तर ९० वर्षांची आणि त्यांचे जोडीदार ८५-८६ वर्षे वयोगटातील आहेत. काहींना शेजारी बर्‍यापैकी मदत करतात. त्यांच्यासाठी दोन वेळच्या जेवणाचीही सोय केली आहे. ही मंडळी पण एकटी पडली आहेत, समाजापासून बर्‍यापैकी दूर राहायचे म्हणजे त्यांना आपल्या मित्रमंडळींमध्ये बागेत जाऊन गप्पा मारणे, आठवणींना उजाळा देणे असं सगळं काही एकदम बंद. आपलं जीवन किती विस्कळीत झालं आहे, या भावनेनेच त्यांची मने धास्तावली आहेत.
 
माझे एक सर जवळजवळ ९१ वर्षांचे आहेत. त्यांची पत्नी ८८ वर्षांची आहे. तिला स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांना वर्तमान गोष्टी पटकन कळत नाही. थोड्या वेळापूर्वी केलेल्या गोष्टीही त्यांना काही केल्या आठवत नाहीत. दोन दिवसांपूर्वी मी सरांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याच्या पिंपात त्यांनी दूधाची पिशवी रिकामी केली. सर बिचारे इतके गोंधळले आणि रागावलेसुद्धा. कारण, ते बिचारे पिंप कसे साफ करतील? पुन्हा त्यांना दूध कुठून मिळेल? खरंच खूपच जटिल समस्या आहेत आणि त्या दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक परिघात आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ किंवा ‘दो गज दुरीया गोष्टी आज कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्याला कोरोनापासून आपला, आपल्या परिवाराजा, समाजाचा बचाव करायलाच पाहिजे. किंबहुना, ते आपले आजचे मुख्य ध्येय आहे. शरीरविज्ञानशास्त्र विषयक तत्त्वानुसार एकटेपणा आणि सामाजिक अंतर माणसांची रोगप्रतिकारकशक्ती कमी करू शकते. ताणतणाव आणि चिंतेमुळे शरीरात अधिक संसर्गजन्य आजार निर्माण होऊशकतात. यासाठी आपल्याला ‘लॉकडाऊन’च्या काळात कोरोनापासून संभवणार्‍या मनोसामाजिक बदलांचा विचार केला पाहिजे.
 
भौगोलिक अंतर असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आणि सामाजिक जवळीक साधण्यासाठी टेलिफोन-मोबाईलची, अर्थात संपर्क आणि संवादाची गरज आहेच. आपण सगळ्यांनाही त्यांची सतत विचारपूस करणे आवश्यक आहे. आपण त्यांना आज प्रेमाने सांभाळणे हे तर परम कर्तव्यच. त्यांना खूप एकाकी तर वाटतेच. पण, आपण आपल्या माणसांपासून तुटलो आहोत, याची व्यथा त्यांना खूप अस्वस्थ करुन जाते. ही मंडळी आतापर्यंत स्वाभिमानी आयुष्य जगली आहेत. कोरोनाच्या या आव्हानात्मक स्थितीत आपण कोणाचे तरी ओझे झालो आहोत, ही भावना त्यांना मनोमनी पोखरत असते. त्यामुळे मग त्यांचे अपराधी मन ‘आपण या जगात राहू नये,’ असा नकारात्मक, निराशाजनक विचार करणे अगदी स्वाभाविक. सगळी वयोवृद्ध मंडळी आपलेच माता-पिता आहेत, गुरू आहेत, आजी-आजोबा आहेत. त्यांना जपणं हे आपलं खरंतर प्रथम कर्तव्य आहे. आज त्यांनी आपल्याला आयुष्यभर जे प्रेम दिलं, त्याची एक सुंदर साजिरी परतफेड करायची मौल्यवान संधी आपल्याला लाभली आहे. चला, आपण ती आनंदाने स्वीकारुया!
 

 

- डॉ. शुभांगी पारकर

 

@@AUTHORINFO_V1@@