प्रस्ताव स्वहिताचाच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |
IPL_1  H x W: 0
 
 




जगभरात थैमान घालणार्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही वाढत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जगप्रसिद्ध ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेवर स्थगिती आल्याने जगभरातील क्रिकेटपटूंची निराशा झाली. या स्पर्धेतून मिळणारा मोबदला हा सर्वात मोठा असतो. यंदा मात्र यासाठी मुकावे लागल्याने जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे भारत आपल्या देशात ही स्पर्धा आयोजित करू शकत नसल्याने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा राबविण्याची आपली तयारी असल्याचे सूतोवाच केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप यावर भाष्य केलेले नाही. मात्र, श्रीलंकेच्या या प्रस्तावासमोर भारताने नकारघंटाच वाजवावी, असे मत व्यक्त केले जात आहे. आयपीएल स्पर्धा देशाबाहेर खेळविण्याची ही काही पहिली वेळ नाही. 2009 सालीदेखील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर खेळविण्यात आली होती. भारत ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करू शकत नसल्याचे कळताच त्याही वेळी विविध देशांनी भारतापुढे आपल्या देशात ही स्पर्धा आयोजित करण्याबाबत प्रस्ताव धाडले होते. मात्र, भारताने ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आयपीलसारख्या स्पर्धेचे आयोजन झाल्यानंतर या स्पर्धेतून मिळणारे उत्पन्नही मोठे असल्याने प्रत्येक देश या स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक असतात. श्रीलंका क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थिती पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डापेक्षा काही बरी नाही. खेळाडूंना त्यांचे मानधन मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन आपल्या देशात झाल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल, या आशेने श्रीलंकेने हा प्रस्ताव भारतापुढे केला आहे. भारताच्या मदतीने आपल्या बोर्डाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा हा श्रीलंकेचा प्रयत्न आहे. भारतालाही हे चांगलेच ठाऊक आहे. परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर स्पर्धेचे आयोजन होईलच, यात काही शंका नाही. कारण, भारताने या स्पर्धेला स्थगिती दिली आहे, ती रद्द केलेली नाही. केवळ गरज आहे ती फक्त प्रेक्षकांच्या संयमाची!
 

नकारघंटाच वाजवावी!

 
 
श्रीलंकेने स्वतःच्या क्रिकेट बोर्डाची परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव पाठविल्याचे मत नोंदविताना समीक्षकांनी अनेकविध बाबींकडे लक्ष वेधले आहे. एकेकाळी क्रिकेटविश्वात बलाढ्य संघ म्हणवला जाणार्‍या श्रीलंकेमध्ये क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे श्रीलंकेचे क्रिकेट भवितव्य अधांतरीच आहे. सध्याच्या घडीला श्रीलंकेकडे जागतिक दर्जाचा एकही मोठा खेळाडू नाही. विजयी खेळी साकारणारे खेळाडू नसल्याने श्रीलंकेचा संघ सध्या दुबळ्या संघाकडून पराभूत होत आहे. लसिथ मलिंगा हा तेजगती गोलंदाज वगळल्यास श्रीलंकेच्या इतर कोणत्याही खेळाडूची आयपीएलसाठी निवड होत नाही. केवळ आयपीएलच नव्हे, तर अनेक लीग स्पर्धांमधील संघ श्रीलंकेच्या खेळाडूंचा आपल्या संघात सामील करून घेण्यास रुची दाखवत नाहीत. जागतिक पातळीवरील संघांत खेळाडूंना स्थान मिळत नसल्यामुळे श्रीलंकेचे क्रिकेटमधील अस्तित्व दिवसेंदिवस पुसट होत चालले आहे. आपल्या देशातील क्रिकेटचे अस्तित्व कायम राखण्यासाठी श्रीलंकेला वारंवार भारताचा आधार घ्यावा लागतो. याला कारणीभूतही श्रीलंकेचे क्रिकेट बोर्डच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यानंतर अनेक देशांनी भारताची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. श्रीलंकेने मात्र आततायीपणाने पाकिस्तानसोबत सामने सुरुच ठेवले. 2012 साली जेव्हा खेळाडूंवर हल्ला झाला, त्यानंतर श्रीलंकेला शहाणपण सुचले. त्यानंतर पाकिस्तानच्या धरतीवर जाऊन खेळणे श्रीलंकेने सोडून दिले. महत्त्वाचे म्हणजे, ज्यांच्या जीवावर श्रीलंकेने आपले क्रिकेटचे अस्तित्व टिकून ठेवले होते, त्यांच्याच शत्रूसोबत हातमिळवणी करत श्रीलंकेने क्रिकेट सामने सुरु ठेवले. लंकेला योग्यवेळी याचा फटका बसलाच. मात्र, भारताने मदतीचा हात आखडता घेताच श्रीलंकेचे क्रिकेटमधील अस्तित्वच धुसर होत चालले आहे. भारत वर्षातून दोन वेळा श्रीलंकेसोबत क्रिकेट मालिकांचे आयोजन करत असे. मात्र, गेल्या काही काळापासून भारताने श्रीलंकेसोबत मोठ्या मालिकांचे आयोजन केलेले नाही. भारत मोठ्या स्पर्धा खेळवत नसल्याने याचा फटका श्रीलंकेला बसत असून क्रिकेट बोर्डाला नफाही कमावता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड सध्या तोट्यात असून खेळाडूंना मानधनही जवळपास सहा महिन्यांच्या अंतराने देत आहे. कृपादृष्टी असतानाही एकेकाळी भारताविरोधात भूमिका घेणार्‍या या श्रीलंकेच्या या प्रस्तावासाठी भारताने आताही नकारघंटाच वाजवावी, असे समीक्षकांचे मत आहे.


- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@