ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020   
Total Views |


manas_1  H x W:


देश, समाजासाठी जगायचे आहे, संघर्ष असो, समन्वय असो की सेवा असो, काम करायचे आहे ते देशासाठीच! असे मानणार्‍या आणि जगणार्‍या गायत्री गोहाँई यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...



ईशान्य भारतातील नागरिक महाराष्ट्रात कामानिमित्त वसलेले आहेत. कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे या मजुरांचे कामधंदे ठप्प झाले. भाषा, राहणीमान वेगळे, स्थानिकांशी जास्त परिचय नाही. यांना कोण मदत करणार? यावर उत्तर होते - ‘श्री श्री शंकरदेव समिती’ संस्थेच्या गायत्री गोहाँई. त्या म्हणतात, “कोरोनाच्या प्रकोपामुळे ईशान्य भारतातील कुणीही कामगार, मजूर महाराष्ट्रात अडकला असेल, अन्नधान्य इतर सुविधा आणि मानसिक आधारही हवा असेल तर कृपया मला सांगा, आपण त्या सर्वांची सर्वतोपरी मदत करू.” कोण आहेत गायत्री गोहाँई? गायत्री म्हणजे उच्चशिक्षित, समाजकार्यासाठी पूर्णत: वाहून घेतलेले अत्यंत सरल आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्व. त्यांचे वास्तव्य सध्या नेरूळ, नवी मुंबई येथे आहे. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत असून पारंपरिक आसामी शिवणकलेमध्येही त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्या रा. स्व. संघात सक्रीय असून अभाविप, राष्ट्र सेविका समितीच्या अनेक जबाबदार्‍या त्यांनी लिलया पेलल्या आहेत.


आसामच्या दिब्रूगड येथील देवेन बॉरपात्र गोहाँई आणि भाग्यवती यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक गायत्री. देवेन हे आसाम विद्युत परिषदेत अधिकारी, तर भाग्यवती या एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका. देवेन हे लेखक, संगीतकार आणि वेद व शास्त्राचे पंडित होते. आई भाग्यवती या शास्त्रीय नृत्यात पारंगत होत्या. कला, शास्त्र, धर्म-संस्कृती यांचा गोहाँईच्या घरात अधिवासच होता. गायत्री यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले ते आईवडिलांकडूनच. आई परिसरातील गरीब-गरजू मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदत करे. परिसरातील गरजूंना अन्नदान करणे ही तर नित्यांची बाब. माणूस आहोत तर दुसर्‍या माणसाचे दु:ख दूर करणे आपले कर्तव्यच आहे. यातच ईश्वर आहे, हे भाग्यवती मुलांना सांगत.


दिवस जात होते. गायत्री सहा-सात वर्षांच्या असतील. त्यावेळी त्यांच्या आईच्या 18 महिन्यांच्या आजारपणात गायत्री यांनी मग स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आईची तब्येत ठीक झाली. पण एक दुसरेच संकट उभे राहिले. गोहाँई कुटुंब जिथे राहायचे तिथे एक जमीनदार होता. तो ख्रिश्चन होता. गोहाँई कुटुंबाचा समाजावर पगडा होता. लोक त्यांचे ऐकतात, त्यामुळे या जमीनदाराने देवेन यांच्याशी मैत्री केली आणि हळूच त्यांना धर्मांतर करण्याचे आमिष दिले. पण, देवेन आणि भाग्यवती यांनी धर्मांतरणाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर हे असे ऐकत नाही पाहून त्यांच्या घरावर हल्लेही झाले. पण, गोहाँई कुटुंबाने धर्मांतर केले नाही. असेही बधत नाही म्हणून जमीनदाराने देवेन यांना खोट्या केसमध्ये अडकवले. अत्यंत पापभिरू असलेल्या गोहाँई कुटुंबाने मात्र लढा द्यायचे ठरवले. १६ वर्षे केस लढले. शेवटी गोहाँई कुटुंब जिंकले. हे १६ वर्षे म्हणजे गायत्री यांचे धर्मासाठी लढणे कसे असते, याचे प्रशिक्षणच होते.


संघर्ष इतकाच नव्हता. गायत्री यांची बारावीची परीक्षा सुरू होती. एक पेपर दिला, त्या रात्री १२.३० वाजता त्यांच्या आईला हदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्याकाळी आसाममध्ये मोबाईल युग नव्हते. त्यांच्या मृत्यूची बातमी देवेन यांच्या आईला सांगण्यासाठी सकाळी संपर्क साधण्यात आला तेव्हा कळले की देवेन यांची आईही नुकतीच मृत्यू पावली. आई आणि आजीचे निधन आठ-नऊ तासांच्या अंतरात... त्यात बोर्डाची परीक्षा... गायत्री यांना वाटले की, परीक्षा द्यावी की नाही द्यावी. पण क्षणभरच. आई आपल्याला नेहमी सांगायची की खूप शिक. आईची इच्छा पूर्ण करावी म्हणून गायत्री त्या दिवशीही परीक्षेला गेल्या. बोर्डाचा निकाल लागला आणि गायत्री विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. पुढे महाविद्यालयीन काळात त्या अभाविप आणि पुढे राष्ट्र सेविका समितीचे काम करू लागल्या. धर्म आणि देशासाठी काम करणार्‍या रा. स्व. संघाशी गायत्री यांची नाळ जुळली ती कायमचीच. गायत्री यांनी युपीएसीची परीक्षा द्यायचे ठरवले. अभ्यासासाठी त्या दिल्लीला आल्या. खूप अभ्यास केला. पण, तीनही वेळा अगदी कमी गुणांनी त्यांना यश मिळाले नाही. तो काळ खूप मानसिक संघर्षाचा होता. आसामचे संतश्रेष्ठ श्री श्री शंकरदेव यांची शिकवण ‘एक नाम एक शरण’ या मंत्राने त्यांना बळ दिले.


‘एक वाट बंद झाली म्हणून काय झाले, दुसरे मार्ग तयार करायचे असतात,’ या विचारांनी गायत्री यांनी उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामालाही लागल्या. कामानिमित्ताने त्या मुंबईत आल्या. त्या काळात मात्र धर्म-समाज यासाठी काम करावे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. रा. स्व. संघाशी नाते होतेच. संघाच्या माध्यमातून आणि स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. त्या म्हणतात, “मलाही देश आणि समाज आणि धर्मासाठी कार्य करायचे आहे. मग ते कार्य संघर्षाचे असो की समन्वयाचे की सेवेचे.” उद्देश एकच आहे की,


ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू ।
मैं जहाँ रहूं, जहाँ में याद रहे तू ॥

@@AUTHORINFO_V1@@