लाॅकडाऊनमध्ये अमरावतीत लोखंडी सापळ्यात अडकून बिबट्या जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020
Total Views |
 leopard _1  H x
 
 
 

सापळ्याची रचना वाघांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सापळ्यासारखी

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यामधील एका शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकून बिबट्या जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रसंगी अमरावती वन्यजीव बचाव पथकाने जखमी बिबट्याला बेशुद्ध करुन ताब्यात घेतले. उपचारासाठी त्याची रवानगी परतवाड्यात करण्यात आली. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेले शिकारीचे प्रयत्न समोर आले आहेत.
 
 
 

leopard _1  H x 
 
 
अचलपुर तालुक्यातील खेैरी गावातील मक्याच्या शेतात जखमी अवस्थेत एक बिबट्या पडून असल्याची माहिती शनिवारी सकाळी वन विभागाला मिळाली. त्यानुसार अमरावती वन्यजीव बचाव पथकाने जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीत बिबट्याचा उजवा पाय लोखंडी सापळ्यात अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. पथकातील पशुवैद्यकाने बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले आणि उपचाराकरिता त्याची रवानगी परतवाड्यात करण्यात आली. तीन वर्षांचा हा नर बिबट्या आहे. मात्र, या बिबट्याला जखमी करणाऱ्या लोखंडी सापळ्याची आता चर्चा होऊ लागली आहे. कारण, वाघांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या मध्यप्रदेशातील शिकाऱ्यांच्या पारंपारिक सापळ्यासारखी या सापळ्याची रचना असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
 

leopard _1  H x 
 
 
 
याविषयी अमरावतीचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, वाघांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारा मध्यप्रदेशातील एका शिकारी जमातीचा सापळा हा जाडजूड असतो आणि वाघांची ताकद पेलण्यासाठी त्याला साखळदंडाने बांधून जमिनीत पुरण्यात आलेले असते. याउलट शनिवारी बिबट्याच्या पायात आढळून आलेला सापळा हा बराच लहानसा आणि त्याला तारेने बांधण्यात आलेले होते. त्यामुळे या क्षेत्रात बहेलिया पारधींव्दारे शिकार सुरू असल्याची शक्यता नाही. प्राथमिक तपासाअंती हा सापळा डुंक्करांच्या शिकारीसाठी स्थानिक शिकाऱ्यांनीच लावल्याची शक्यता आहे. आम्ही सखोल तपास करत असून बिबट्याची प्रकृती उत्तम आहे. पुढील दोन ते तीन दिवसात उपचाराअंती त्याला सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@