बेस्टच्या मिनी बसेस कोरोना लढयासाठी सज्ज ; रुग्णवाहिकेत रूपांतर

    26-Apr-2020
Total Views |

best mini buses_1 &n




मुंबई
: बेस्ट उपक्रमात प्रवाशांच्या सेवेसाठी आणलेल्या वातानुकूलित मिनी बसेस आता कोरोनाबाधित रुग्णासाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या ७ बसेसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे. त्यानंतर आणखी २० बसेस रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्यात येणार आहेत.



मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी बेस्ट बस कोरोना विरोधातील लढ्यात आधीच उतरली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी बेस्ट बसेसचा उपयोग करण्यात येत आहे. त्यानंतर गरजू, बेघर आणि स्थलांतरितांना जेवण पोहोचविण्यासाठी वातानुकूलित मिनी बसेसचा वापर करण्यात येत आहे. आता कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करणे आणि कोरोनामुक्तांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी वातानुकूलित मिनी बसेसचा रुग्णवाहिका म्हणून उपयोग करण्यात येणार आहेत. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिकेच्या रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह व कोरोना संशयित रुग्णांना वेळीच रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. परंतु कोरोना रुग्ण वाढत असून रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या मिनी वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येत आहे.


दरम्यान, अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांसाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यातील रोज १,२०० बसेस रस्त्यावर धावत आहेत. रुग्णालय स्टाफ, पोलीस व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी रोज ६०० बसेस सोडण्यात येत असून पनवेल, बदलापूर कल्याण, वसई आदी ठिकाणांहून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कार्यालय व घरी सोडण्याचे काम बेस्ट परिवहन विभाग करत आहेत.