जरा चुकीचे, जरा बरोबर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020
Total Views |
mutual-fund_1  




आजवर पतसंस्था, बँका ठेवीदारांचे पैसे देत नाही, हे सर्वसामान्य लोक ऐकून होते. पण सर्वोत्तम तरलता देणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड अशी बिरुदावली असलेल्या योजना जेव्हा लॉक डाऊन होऊ लागतात तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

 
 

शुक्रवारी फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंड या आघाडीच्या घराण्याने त्यांच्या रोखे गटातील ६ योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या योजनांमधे नवीन गुंतवणूक तर घेतली जाणार नाहीच परंतु या योजनांमधून गुंतविलेले पैसे देखील काढता येणार नाही. मार्च अखेरीस २.८५ लाख कोटी मालमत्ता व्यवस्थापनाखाली असलेल्या फंड घराण्याने जाहीर केल्याने खरं चिंतेच कारण आहे. या फंडातील मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना गुंतविलेले पैसे परत केले जातील असे या पत्रकात नमूद करतांनाच मालमत्ता विक्रीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर केलेली नाही. स्थगित झालेल्या पुढील योजनांचा एकूण मालमत्ता व्यवस्थापन निधी २८,००० कोटींच्या घरात आहे.

 

१. फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉन्ड

२. फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इनकम

३. फ्रँकलिन इंडिया डायनॅमिक अॅक्र्युअल

४. फ्रँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क

५. फ्रँकलिन इंडिया लो ड्युरेशन फंड

६. फ्रँकलिन इंडिया इनकम ऑपोर्च्युनिटीज फंड

 

कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातल्याने जागतिक टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने रोकड सुलभता कमालीची खालावली आहे. पुरेशा रोकड सुलभते अभावी रोखे बाजारात कंपन्यांच्या रोख्यांच्या भावात सतत घसरण झाली होती. रोखे बाजार वर्ष अखेरीस नेहमीच रोकड चणचणीचा सामना करतो. सर्वच फंड घराण्यांच्या रोखे फंडातून गुंतवणूकदार पैसे काढून घेत होते. ज्या फंड घराण्यांच्या मालमत्तेत उच्च पत असणारे रोखे होते त्या फंड घराण्यांना रोकड सुलभता आटण्याचा कमी सामना करावा लागला.

 

मग याचा सर्वाधिक फटका फ्रॅंकलिन टेंपल्टन इंडिया फंड घराण्याला का बसला?

कारण फ्रॅंकलिन टेंपल्टन इंडिया फंड या घराण्याच्या वरील योजनांची गुंतवणूक कमी पत असलेल्या रोख्यांमधे असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका बसला. रोकड सुलभता राखण्यासाठी सेबीने घालून दिलेल्या मर्यादेत फंड घराण्याने कर्ज उचलसुद्धा केली होती. घेतलेल्या कर्जातून गुंतवणूकदारांना पैसे दिले जात होते. परंतु गुंतवणूकदारांचा पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच होता. घेतलेल्या कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजाच्या खर्चामुळे फंडाच्या मालमत्ता मूल्यात (NAV) सातत्याने घसरण होत होती. त्यामुळेच फंड स्थगित करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय फंड घराण्यापुढे उरला नव्हता.

 

रोखे फंड योजना कशा प्रकारे काम करतात?

बँकेने मुदत ठेव घेतल्यानंतर बँक कर्ज वाटप करून मुदत ठेवीच्या देय व्याजदरापेक्षा जास्त उत्पन्न मिळविते व ठेवीदारास परतावा देते. त्याचप्रकारे रोखे फंड योजना कंपन्यांच्या कर्जरोख्यांमधे गुंतवणूका करून गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देत असतात. रोखे फंडांच्या योजनांना दोन प्रकारची जोखीम असते. पहिली व्याजदर बदलाची आणि दुसरी पत खालावण्याची. गुंतवणूकदार नेहमीच अधिक परतावा असलेला फंड पसंत करतात. परंतु अधिक परतावा नेहमीच कमी प्रतीची पत असलेल्या रोख्यांमुळे मिळतो. फंडाचा जोखीम समायोजन परतावा गुंतवणूकदाराला स्थैर्य आणि रोकड सुलभता देतो. उच्च पत असलेले रोखे रोकड सुलभ असतात. रोख्यांवरील देय व्याज आणि रोख्याची पत यांच्यात व्यस्त प्रमाण असते.

 

क्रेडीट रिस्क फंडांना सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ६५% गुंतवणूक हि एए- पेक्षा कमी पतमानांकन असलेल्या कंपनी रोख्यांमधे गुंतवणूक करण्याची मुभा असते. म्हणजेच अशा गुंतवणुकांतून जास्तीचा परतावा मिळण्याची अपेक्षा गुंतवणूकदार करू शकतात. परंतु परतावा आणि जोखीम यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. योजनांची मागील परताव्याची कामगिरी बघून रोखे फंडात गुंतवणूक करणे किती जोखमीचे ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येईल.

 

क्रेडीट रिस्क फंड दोन प्रकारे उत्पन्न मिळवत असतात. कर्जरोख्यांवर मिळणाऱ्या व्याजातून आणि रोख्यांच्या पतमानांकनात सुधारणा झाल्यास मिळणाऱ्या मूल्यवृद्धीतून. परंतु काहीवेळा याच्या उलट देखील घडू शकते. कर्जरोख्यांना अकार्यक्षम होण्याचा (डीफॉल्ट) किंवा पतमानांकन खालावण्याचा धोका मोठया प्रमाणात असू शकतो. यापैकी कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास निधी व्यवस्थापकास गुंतवणुका विकणे शक्य होत नाही. जे फ्रॅंकलिन टेम्पल्टनच्या योजनांत घडले.

 

मागच्या आठवडयात एका होऊ घातलेल्या गुंतवणूकदाराशी फोनवर बोलणे झाले. त्याला ३ ते ५ वर्षांसाठी शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास दामदुप्पट होतील असे कुणीतरी सारखे संदेश पाठवत होते. मी त्यांना थोडे दिवस ओव्हरनाईट फंडात पैसे ठेवा असे सुचविले. त्यांनी विचारले माझे पैसे मला हवे तेव्हा परत मिळतील ना? सर्वात कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकीबाबत साशंक असणारे सर्वोच्च जोखीम घेण्याची तयारी का दाखवितात? जास्त परतावा मिळविण्यासाठीच ना? मग तेवढी सर्वोच्च जोखीम घेण्याची क्षमता आधी वाढविली पाहिजे. गुरुवारी जागतिक पुस्तक दिन होता. भरपूर जणांनी समाजमाध्यमातून शुभेच्छा पाठविल्या. वाचाल तर वाचाल या बाबासाहेब आंबेडकरांच्या पंक्तीचे सर्वजण आठवण करून देत होते. या घटनेतून आपण धडा घेऊन येथून पुढे गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी माहितीपुस्तक नक्कीच वाचाल.

 
 

अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक नियोजक)

94 23 18 75 98

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@