वुहान : चीनचे चेर्नोबिल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020   
Total Views |


chirnoble_1  H

वुहान आता चीनसाठी चेर्नोबिल ठरेल काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण, चेर्नोबिल आणि वुहानची प्रयोगशाळा या दोन्ही घटनाक्रमात बरेच साम्य आहे. या वार्तापत्रात चेर्नोबिल घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे, तर पुढील वार्तापत्रात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न असेल.



ठीक ३२ वर्षांपूर्वी बरोबर आजचा दिवस...
दि. २७ एप्रिल १९८८ रोजी मॉस्कोत राहणारे रशियन अणुशास्त्रज्ञ वालेरी लिगासोव्ह यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या दोन वर्षापूर्वी, दि. २६ एप्रिल १९८६ रोजी सोव्हिएत युनियनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्राच्या एका संयंत्रात स्फोट झाला होता, त्याची चौकशी लिगासोव्ह करीत होते आणि दि. २८ एप्रिल रोजी ते आपला अहवाल सरकारला सादर करणार होते. २४ तास अगोदर त्यांनी आत्महत्या केली. मात्र, त्यापूर्वी त्यांनी चेर्नोबिल स्फोटामागचे सत्य सांगणार्‍या सहा टेप कचर्‍याच्या बादलीत लपवून घराबाहेर नेल्या. एका खिडकीतून त्या एका घरात टाकल्या. नंतर कचराकुंडीत कचरा टाकला आणि घरी परतून स्वत:ला गळफास लावला. काही महिन्यांनी सोव्हिएत सरकारने लिगासोव्ह यांना हिरो ऑफ रशियन फेडरेशन‘, ‘ऑडर ऑफ लेनिनया सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित केले.


दोन लाख बळी
?


चेर्नोबिलचे सत्य आजवर बाहेर आलेले नाही. या घटनेत फक्त ३१ लोक ठार झाल्याचे रशियन सरकारने सांगितले असले तरी
, काही तटस्थ अंदाज किमान चार हजार ते कमाल दोन लाख लोक यात मरण पावले असावेत, असा आहे. चेर्नोबिलने सोव्हिएत युनियनचे आर्थिक कंबरडे मोडले. चेर्नोबिलमुळेच सोव्हिएत युनियनचे विघटन झाले, असा अभिप्राय तत्कालीन राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी नंतर व्यक्त केला. जगाला वेठीस धरणारा कोरोना व्हायरस चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून अपघाताने बाहेर पडला असावा, असे म्हटले जाते. वुहान आता चीनसाठी चेर्नोबिल ठरेल काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण, चेर्नोबिल आणि वुहानची प्रयोगशाळा या दोन्ही घटनाक्रमात बरेच साम्य आहे. या वार्तापत्रात चेर्नोबिल घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे, तर पुढील वार्तापत्रात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न असेल.


चेर्नोबिल ऊर्जा केंद्र


अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु होती. दोन्ही देश परस्परांवर मात करणारे कार्यक्रम हाती घेत होते. त्याचाच एक भाग म्हणून तत्कालीन सोव्हिएत युनियनने चेर्नोबिल येथे जगातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातील चार संयंत्रे सुरु करण्यात आली. आणखी आठ संयंत्रे सुरु केली जाणार होती. चौथ्या संयंत्रांत काही चाचण्या केल्या जात होत्या. त्याच प्रक्रियेत अचानक दि. २६ एप्रिल
, १९८६च्या मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांनी चेर्नोबिलच्या चौथ्या संयंत्रात स्फोट झाला. सोव्हिएत युनियन सरकारने पहिला निर्णय काय घेतला असावा? चेर्नोबिलची माहिती जगात जाऊ नये, म्हणून या परिसरातील सारे दूरध्वनी रातोरात कापण्याचा! मॉस्को केंद्रावरुन प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांमध्ये चेर्नोबिलचा साधा उल्लेखही नव्हता. सोव्हिएत युनियनसाठी सारा विषय तेथेच संपला होता.


स्वीडनने पकडले


सोव्हिएत युनियनने चेर्नोबिल स्फोटाची घटना जगापासून दोन दिवस दडवून ठेवली. ती उघड झाली दुसर्‍या एका घटनेने. स्फोटानंतर दोन दिवसांनी दि. २८ एप्रिल रोजी सकाळी स्वीडनच्या एका अणुऊर्जा केंद्रात काम करणार्‍या एका कर्मचार्‍यास
, आपल्या केंद्रातील रेडिएशनचा स्तर अचानक वाढला असल्याचे लक्षात आले. दिवसभर चौकशी सुरु झाली. या कर्मचार्‍याने घातलेल्या बुटातूनही रेडिएशन होत असल्याचे लक्षात आले. स्वीडनच्या अधिकार्‍यांनी दिवसभरात आपल्या अणुकेंद्राची वारंवार तपासणी केली. त्यांना या रेडिएशनचा स्रोत सापडला नाही. मग, मागील दोन दिवसांत वार्‍याची दिशा कोणती होती हे पाहण्यात आले. ही दिशा रशियातील युक्रेनकडे संकेत करीत होती. स्वीडन सरकारने सायंकाळी सोव्हिएत युनियनच्या अधिकार्‍यांना, आपल्या देशात एखादी अणु दुर्घटना झाली आहे काय, याची चौकशी केली. सोव्हिएत युनियनने मुळीच नाहीअसे उत्तर दिले. नंतर स्वीडनने या संदर्भात- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. युरोपातील देशांना सतर्क केले. सोव्हिएत युनियनला हे समजताच त्याने चेर्नोबिल स्फोटाचे वृत्त प्रसारित केले. गोर्बाचेव्ह यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत चेर्नोबिलचा आढावा घेतला. बैठकीततील सारे मंत्री-नेते या घटनेला फार महत्त्व देत नव्हते. मात्र, लिगासोव्ह यांनी चेर्नोबिल प्रकरण साधे नाही, हे गोर्बाचेव्ह यांना सांगितले. यामुळे केवळ आपला देशच नाही, तर सारा युरोप संकटात येईल, हेही सांगितले. गोेर्बाचेव्ह यांनी एका वरिष्ठ मंत्र्यांसह लिगासोव्ह यांना चेर्नोबिलला पाठविले.


चेर्नोबिलच्या संयंत्रातून जो धूर बाहेर पडत होता
, तो साधा नव्हता. तो कसा रोखावयाचा हा सर्वात मोठा प्रश्न होता. त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान सोव्हिएत युनियनजवळ नव्हते. अखेर लाखो पोत्यांमधून ओली माती व रेती या संयंत्रांवर टाकण्यात आली. हे काम ७२ तासांत पूर्ण करावयाचे होते. त्यासाठी काही लाख मजुरांचा वापर करण्यात आला. प्रत्येक मजुराला केवळ ९० सेकंद काम करण्याची परवानगी देण्यात आली. तरी यात अनेक मजूर मरण पावले.


स्फोटाचे कारण


चेर्नोबिल स्फोटामागे दोन कारणे सांगण्यात आली. एक - संयंत्राची सदोष रचना आणि नवख्या तंत्रज्ञाचा वापर. केवळ चार महिने कामाचा अनुभव असलेल्या तंत्रज्ञाला
, दि. २६ एप्रिलच्या रात्री म्हणजे स्फोटाच्या रात्री महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याला परिस्थिती हाताळता आली नाही. लिगासोव्ह यांनी या सार्‍या बाबी समोर आणल्या. याचा परिणाम म्हणून ते ज्या अणु संशोधन केंद्राचे संचालक होते, त्यांना त्या पदावरुन काढून टाकण्यात आले. चेर्नोबिल स्फोटानंतर लिगासोव्ह यांनी तातडीने कारवाई करुन सार्‍या युरोपला वाचविले, असे मानले जात असताना, रशियात मात्र लिगासोव्ह यांना जवळपास आरोपी ठरविण्यात आले होते. त्या कोंडीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी अखेर त्यांना आत्महत्या करावी लागली.


२४ हजार वर्षे
?


जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर ७५ वर्षांपूर्वी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. ही दोन्ही शहरे बेचराख झाली. मात्र
, ती पुन्हा उभी झाली. चेर्नोबिल प्रकरण त्याहून गंभीर होते. आता चेर्नोबिलच्या २६०० चौरस किलोमीटरच्या परिसरात २४ ते ३० हजार वर्षे मानवी वस्ती होणे शक्य नाही, असे शास्त्रज्ञांना वाटते.


आर्थिक किंमत


चेर्नोबिल स्फोटात फक्त ३१ लोक ठार झाले
, असे रशियाने वारंवार सांगितले असले तरी, याची आर्थिक किंमत मात्र त्यांना लपविता आली नाही. सोव्हिएत युनियनच्या विखंडनानंतर- चेर्नोबिल युक्रेन सरकारला हाताळावे लागले. रेडिएशनमुळे जे जे परिणाम होत होते, ते नियंत्रणात आणण्यासाठी युक्रेन सरकारला प्रयत्न करावे लागले. या भागात मरणार्‍या शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांना पुरण्यासाठी मोठमोठे खड्डे खणण्यात आले. त्यातून रेडिएशन बाहेर येऊ नये म्हणून ते सिमेंट काँंक्रिटने बुजविण्यात आले. ज्या-ज्या भागावर रेडिएशनचा परिणाम झाला, ते सारे अवशेष जमिनीत पुरणे व नंतर त्यावर काँक्रिट टाकणे, हे काम युक्रेन सरकारला नियमितपणे करावे लागले. चेर्नोबिलचे परिणाम सावरण्यासाठी युक्रेनला २० लाख कोटी रुपये खर्च करावे लागले.


सोव्हिएत युनियनचे विखंडन


चेर्नोबिलच्या दुष्परिणामातून सारे युरोप कसेबसे बचावले
; अन्यथा फार गंभीर स्थिती या देशांमध्ये तयार झाली असती. मात्र, याचा आर्थिक परिणाम एवढा मोठा होता की त्यातून सोव्हिएत युनियन स्वत:ला सावरु शकलेली नाही. चेर्नोबिलच्या घटनेने सोव्हिएत युनियनचा जगातील दबदबा संपुष्टात आला. हंगेरी, पोलंड, पूर्व जर्मनी, झेकोस्लोवाकिया, रुमानिया हे देश सोव्हिएत युनियनच्या मगरमिठीतून बाहेर पडले. दुसरीकडे सोव्हिएत युनियनच्या वेगवेगळ्या भागात रशियाच्या प्रभुत्वाविरुद्ध वातावरण तापू लागले. जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, बेलारुस, युक्रेन यासह १४ देश सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडले. सोव्हिएत युनियनमधील साम्यवाद कोसळून पडला. प्रत्येक देशाने नवा झेंडा, नवी घटना स्वीकारली. या सार्‍याचे एक प्रमुख कारण होते- चेर्नोबिल!

@@AUTHORINFO_V1@@