हमशकल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2020
Total Views |

hamshakal_1  H



रबरनेक ऑटो बस सुटणारच होती. कंडक्टरने स्वस्त प्रवाशांना टपावर जागा करून दिली होती. परीटघडीच्या कपड्यातले उच्चभ्रू प्रवासी बसच्या आत रुबाबात विराजित झाले होते. कंडक्टरने हातातल्या कर्ण्यावरून सर्व प्रवाशांना बस सुटत असल्याच्या घोषणेबरोबरच आपापल्या जागेवर बसून घ्यायची सूचना दिली आणि ड्रायव्हरला इशारा केला. स्टोव्हवर झाकणीसह ठेवलेले चहाचे पातेले उकळी आल्यावर थरथरते तशी बस थरथरली. टपावर बसलेल्या प्रवाशांनी खुर्च्यांचे हात घट्ट धरले आणि बस सुरू झाली.


सर्वात पाठीमागच्या सीटवर जेम्स विल्यम्स आणि हॅटी हे नवविवाहित दाम्पत्य बसले होते. हॅटीच्या मुखचंद्रावर भावनांचे तीन ग्रंथ विराजमान होते. एक, जेम्स हा जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. दोन, जग अतिशय सुंदर आहे. तीन, रबरनेक बसमध्ये मागच्या सीटवर एकांतयुक्त जागा मिळणे ही स्वर्गसुखाची परमावधी आहे.


बस गोल्डन वे वरून निघाली. प्रवाशांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभा गाईड कर्ण्यावरून शहराची माहिती सांगत होता. पर्यटक आपसात बोलत एका कानाने ती माहिती ऐकत होते. कॅथेड्रल आले आणि गेले. ग्रॅन्ड सेंट्रल डेपो आला आणि गेला. हॅटीच्या पुढच्या आसनावर सैलसर जाकीट आणि गवती हॅट घातलेली एक तरुणी च्युईंगम चघळत बसलेली होती. तिच्या शेजारी २४-२५ वर्षांचा राकट देखणा तरुण बसला होता. जेम्सच्याच वयाचा आणि अंगयष्टीचा. फक्त राहणीमानात फरक. पण, एकूण सलगीवरून त्यांचं नातं देखील वधूवरांप्रमाणेच वाटत होतं. हॅटी आणि ‘ती’ची नजरानजर झाली, तेव्हा हॅटीला ते तीव्रतेने जाणवलं. सिग्नलपाशी बस थांबली तेव्हा दोघींनी आपसात शिळोप्याचं स्त्रीसुलभ बोलूनही घेतलं. बस थोडी पुढे गेली न गेली तोच रस्त्याच्या मध्यभागी उभ्या साध्या पोषाखातील बलदंड इसमाने हात वर उभारला. बस थांबली. बस थांबलेली पाहून ‘ती’च्या शेजारचा तरुण ताडकन उठला आणि बसच्या मागच्या दारातून खाली उतरला.


बस थांबवणार्‍या इसमाचा पोषाख साधा असला तरी त्याची देहयष्टी आणि चेहर्‍यावरचे गुर्मीयुक्त भावच सांगत होते की तो गुप्त पोलीस आहे. बस थांबल्यावर तो बसमध्ये चढला आणि ड्रायव्हरला बस थांबवायला सांगून गाईडच्या शेजारी उभा राहून त्याने सर्व प्रवाशांवर आपली सराईत नजर फेकली. मग त्याने घोषणा केली, या बसमध्ये पिंकी मग्वायर नावाचा घरफोड्या करणारा गुन्हेगार लपलेला आहे. मी त्याला अटक करण्यासाठी आलो आहे.


‘ती’ने मागे वळून हॅटीचा हात घट्ट दाबून धरला आणि काहीतरी पुटपुटली. हॅटीने मान डोलावली.


“डॉनव्हिन, मागच्या सीटवर बसलेल्या त्याला उभं राहायला सांग,” पोलिसाने गाईडला आज्ञा केली.


गाईड चालत चालत जेम्सपाशी आला. जेम्सला पाहून पोलीस गरजला, “कम्मॉन, पिंकी. बाकी या बसमध्ये लपण्याची तुझी कल्पना नामी होती. पण माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही. चल, पुढे ये.”


“पण, मी पिंकी नाही. माझं नाव जेम्स विल्यम्स आहे. माझ्यापाशी माझी ओळख पटवणारी कागदपत्रेदेखील आहेत.”


“सर, तुम्हाला काय खुलासा करायचा असेल तो पोलीस स्टेशनवर जाऊन करा, प्लीज.” बसचा खोळंबा करू नका, कंडक्टरने कर्ण्यावरून सूचना केली. त्याच वेळी हॅटीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, “पोलिसांबरोबर जा तू. तुला तुझं निर्दोषत्व सिद्ध करता येवो म्हणून शुभेच्छा.”


“तुझ्या मैत्रिणीचं तरी ऐक,” पोलीस गुरगुरला.


जेम्स खांदे उडवून हताशपणे खाली उतरता उतरता म्हणाला, “खरंच माझं नाव पिंकी नाही आणि ती माझी मैत्रीण नाही. बायको आहे. दोनच दिवसांपूर्वी आमचं लग्न झालं म्हणून आम्ही इथं पर्यटनासाठी आलो. तिचा माझ्याबद्दल गैरसमज होईल.”


दोघे उतरले. बस गेली. शेजारच्या पोलीस कारमधून गुप्त पोलिसी गणवेषातला वरिष्ठ अधिकारी बाहेर आला. “पिंकी, तू भलताच हुशार आहेस. पण, तू या बसमध्ये बसलास तेव्हाच आम्हाला एका निनावी फोनवरून ही माहिती मिळाली. तुझं वर्णन शहरातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनवर आहे. आम्हाला अगदी मुखोद्गत आहे.”


“अहो, पण खरंच मी पिंकी नाही. ही माझ्या ब्रीफकेसमधली कागदपत्रे पाहा. माझा पासपोर्ट पाहा आणि माझ्या कंपनीत फोन करून माझ्या सहकार्‍यांना बोलावून घ्या." दोन्ही पोलीस गोंधळले. त्यांनी पासपोर्ट आणि कागदपत्रे तपासली. कचेरीत फोन करून खातरजमा केली. जेम्सची क्षमायाचना करून त्याला सोडून दिलं. बस गेली त्या दिशेने जेम्स चालत राहिला. दोन चौक चालल्यानंतर समोरून हॅटी चालत येताना दिसली. ती पुढच्या थांब्यावर बसमधून उतरली होती.



“तिला बघून मला माझी बहीण आठवली म्हणून तिला मदत करावीशी वाटली. बस थांबल्यावर पिंकी लगेच उतरून पळाला होता. त्याच्या आणि तुझ्या देहयष्टीतल्या साम्यामुळे पोलीस फसले. आपल्याला पिंकी आणि त्याच्या वधूची दुवा लाभेल. त्यांचं देखील परवाच लग्न झालंय. तेही आपल्यासारखेच मधुचंद्रार्थ निघालेत. मुख्य म्हणजे पिंकीने गुन्हेगारी जीवन सोडून प्रामाणिकपणे जगायचा निश्चय केलाय असं त्याची वधू सांगत होती,”
हॅटी म्हणाली. जेम्सने मान हलवून होकार दिला आणि ते जवळच्या रेस्तराँमध्ये शिरले.

(SISTERS OF THE GOLDEN CIRCLE या कथेवर आधारित)

- विजय तरवडे
@@AUTHORINFO_V1@@