गाऊ त्यांना आरती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2020
Total Views |


police lockdown_1 &n

 

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हात जोडून लोकांना विनंती करतात. पण, ‘हम नही सुधरेंगे’ अशा पद्धतीने लोक नियम पायदळी तुडवून झुंडीने मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडतात. अशावेळी या निर्बुद्धांना काय म्हणावे, तेच कळत नाही.


पोलीस म्हटले की गुन्हेगारांची शिकार हेरणारी शोधक नजर, प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काठीचे फटके देणारे कायद्याचे रक्षक ही प्रतीमा डोळ्यासमोर उभी राहते. पण, कधी कधी कायद्याच्या या रक्षकांचाही नाईलाज होतो. मग ते चक्क आरती ओवाळण्याचा गांधीगिरीचा मार्ग अवलंबतात, तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. कोरोना विषाणूने सार्‍या मानवजातीला एका पातळीवर आणून ठेवले आहे. लहान-मोठा, उच्च-नीच सारे भेट मिटवू टाकले आहेत. शासन आणि प्रशासन यंत्रणा हतबल झाली आहे. पण, शासन आणि प्रशासन म्हणजे कोण, हे लोकांना अजून कळत नाही, हेच या देशाचे दुर्दैव आहे.
 

जेव्हा फायद्याच्या गोष्टी असतात तेव्हा लोकशाहीच्या नावाने गळा काढणारी मानवी जमात संकटे उभी ठाकतात, तेव्हा सरकारच्या नावाने शिमगा करते. पण, सरकार म्हणजे आपण आहोत, आपणच आपल्या हितरक्षणाकरिता काही नियम बनवतो आणि ते आपल्याच फायद्याचे असते. त्यामुळे त्यांचे पालन करणे हे आपले आद्यकर्तव्य असते, याचाच त्यांना विसर पडतो. परिणामी हाती घेतलेले काम तडीस जाण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. कोरोनाच्या बाबतीत तसेच झाले आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर स्वतःच स्वतःला किमान १४ दिवस कोंडून घेणे, हाच त्यावरील एकमेव उपचार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हात जोडून लोकांना विनंती करतात. पण, ‘हम नही सुधरेंगे’ अशा पद्धतीने लोक नियम पायदळी तुडवून झुंडीने मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडतात. अशावेळी या निर्बुद्धांना काय म्हणावे, तेच कळत नाही.
 


पोलिसांनी सुरुवातीला फटके दिले,
दोन तास उन्हात बसवून तेथेच व्यायामाचे प्रकार करायला लावले. रस्त्यात बेडूक उड्या मारायला लावल्या. फक्त एकत्र कोंडून ठेवायची शिक्षा करता आली नाही. त्याचा कदाचित उलटा परिणाम होऊन कोरोनाची व्याप्ती वाढली असती. शेवटी पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. महिला पोलिसांकरवी त्यांना आरती ओवाळत ‘जगदीशा’ची आळवणी केली. तरीही निर्लज्ज लोक पोलिसांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत दररोज मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडत आहेत. पोलिसांची विनवणी करणारे हात कानापर्यंत पोहोचतील तेव्हा मात्र ते सर्वांसाठीच घातक ठरतील. हे न घडो एवढेच!
 
 
आश्वासक उपचार पद्धती
 
 
कोरोनाने सार्‍या जगताची झोप उडवून दिली आहे. शासन, प्रशासन, समाजातले विविध घटक या कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्राणपणाने लढत आहेत. मात्र, सव्वा महिना झाला तरी कोरोना मागे हटायचे नाव घेत नाही. सव्वा महिन्यानंतरही गुरुवार, दि. २३ एप्रिलपर्यंत राज्यात एकूण ७७८ रुग्ण आढळले, तर मुंबईत ५२२ रुग्ण आढळले. रुग्ण बाधित होण्याचा हा उच्चांक आहे. त्यातही शनिवारपासून देशभरात मुस्लीम धर्मीयांचा रमजान उत्सव सुरू होत आहेत. यावेळी समूहाने नमाज अदा करायची आणि संध्याकाळी समूहानेच रोजा (उपवास) सोडायची प्रथा आहे. मात्र, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात प्रतिकात्मक देवांचा पराभव झाला असतानाच, माणसात परमेश्वर आहे हे आता लोकांना हळूहळू पटलेले दिसते. अशा वेळी डॉक्टर, पोलीस यांच्यावर हल्ल्याच्या वाढणार्‍या घटना सर्वस्वी दुर्दैवी आहेत. या आजारालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोना हा सांसर्गिक आजार आहे. समूहात तो अधिक जलद गतीने पसरतो. दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या ‘तबलिगीं’च्या मरकजमुळे कोरोनाचा प्रसार अधिक जलद गतीने झाला आहे. तसा प्रकार रमजानमुळे होऊ नये. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगपाळून घरातूनच नमाज अदा करणे आणि घरात कुटुंबासमवेत रोजा सोडणे समाजाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
 
वाढणारे रुग्ण, रुग्ण वाढण्यासाठी कारणीभूत ठरणारे कार्यक्रम याबरोबरच या आजारावर कोणताही रामबाण उपाय नाही. याची चिंता भेडसावत असतानाच ‘प्लाझ्मा थेरपी’ ही आश्वासक उपचार पद्धती समोर येत आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये शेवटच्या अवस्थेत असलेल्या ४९ वर्षीय रुग्णावर ‘प्लाझ्मा थेरपी’चा प्रयोग करण्यात आला आणि तो रुग्णही ठणठणीत बरा झाला. कोरोनातून बरा झालेल्या व्यक्तीची अ‍ॅण्टी बॉडीज काढून ती आजारी व्यक्तीच्या शरीरात सोडणे आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढविणे अशी ही ‘प्लाझ्मा थेरपी’ आहे. ‘आयसीएमआर’ने मान्यता दिल्यानंतर या उपचारपद्धतीचा लवकरच अवलंब होईल आणि आता ज्या गतीने रुग्णांची वाढ होत आहे. त्यात पद्धतीने बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात ना तेच खरे!
 

 

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@