रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे २७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आरोग्य रक्षा सेवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
पुणे : रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे सोमवार,२७ एप्रिलपासून पुणे शहरातील वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने तपासणी आणि गरजूंना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्यरक्षा सेवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. हे तपासणी व औषधोपचार अभियान हे पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासनाच्या मदतीने रा.स्व. संघाने राबविलेल्या #PunekarAgainstCorona या अभियानाचा एक भाग आहे.
या अभियानात पुणे महानगरातील अनेक वस्तीमध्ये नागरिकांच्या आजारपणावर (कोरोनासंबंधी उपचार वगळता) उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाने हाती घेतलेल्या या अभियानात समाजातील सर्व डॉक्टरांनी आपला वेळ संकटात सापडलेल्या समाजबांधवांसाठी द्यावा, असे आवाहन रा.स्व. संघातर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अभियानात सहभागी डॉक्टरांची रूग्ण तपासणीसाठी आधुनिक यंत्रणा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक डॉक्टरांनी तीन दिवसांची सेवा देणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्येक डॉक्टरांसाठी विश्रांती मिळू शकेल अशी रचना करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांच्या विलगीकरणाची देखील स्वतंत्र सोय रा.स्व. संघातर्फे करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे आपल्या पुणे महानगरातील नागरिक, लहान मुले आणि वंचित वस्त्यांमधून (झोपडपट्टी) राहणाऱ्या समाजातील ३१ हजारांहून अधिक गरजू कुटुंबांपर्यंत शिधा आणि भोजन पोहचवले गेले आहेत. हा उपक्रम अजूनही सुरूच आहे. परंतु आता त्यांच्या आरोग्याच्या समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येते आहे. तेव्हा वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने पुढे यावे आणि लोकांची डॉक्टरविषयी असणारी श्रद्धा व विश्वास दृढ करावा असे आवाहन रा.स्व. संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व जनकल्याण समितीचे पुणे महानगर कार्यवाह अश्विनीकुमार उपाध्ये यांनी केले आहे.
कसे व्हाल सहभागी :
यासाठी डॉक्टरांनी उपलब्ध वेळ कळवल्यास रा.स्व.संघ जनकल्याण समिती आपल्या घराजवळील वस्तीमध्ये सुरू असणाऱ्या आरोग्यसेवेत आपल्याला जोडून घेईल. यासाठी डॉक्टरांनी https://forms.gle/nSxbMYLi7f23NWLPA या लिंकवर आपली नोंदणी करायची आहे. किंवा महेश मानेकर 9960773012 व मुग्धा वाघ 9552451077 यांच्याशी संपर्क करून नोंदणी करायची आहे.