लाॅकडाऊनमध्ये पक्षी अभ्यासकांसाठी 'आॅनलाईन' व्याख्यानांची मालिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2020
Total Views |
bird _1  H x W:

 

'महाराष्ट्र पक्षीमित्र'तर्फे तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन

 
 
 
प्रतिनिधी (मुंबई) - लाॅकडाऊनमुळे पक्षीनिरीक्षण बंद झाले आहे. त्यामुळे काही पक्षीनिरीक्षक आपल्या परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी करून त्या इ-बर्ड या संकेतस्थळावर नोंदवत आहेत. त्यामुळे या काळात पक्ष्यांविषयी सखोल व शास्त्रीय माहिती पक्षीमित्रांना, निसर्गप्रेमींनी व महाराष्ट्र पक्षिमित्र सभासदांना व्हावी या दृष्टीने 'महाराष्ट्र पक्षीमित्र'तर्फे आॅनलाईन व्याख्यानांची मालिका सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ आणि अभ्यासू पक्षी अभ्यासक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या व्याख्यांनामधून मिळत आहे.
 
 
 
 
प्रत्येक ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप कमी झालेला असल्याने अनेक ठिकाणी पक्षी रस्त्यावर, गावात, घरात येतांना दिसत असल्याने नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी उत्सुकता निर्माण होताना दिसत आहे. 'महाराष्ट्र पक्षिमित्र' ही संस्था महाराष्ट्रात पक्षीविषयक जनजागृती व संवर्धनासाठी गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहे. संस्थेचे राज्यात व बाहेर असे एकूण १२०० आजीवन सभासद आहेत. या संस्थेने आजवर ३३ राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलने व ३० पेक्षा जास्त विभागीय पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे. आपल्या सभासदांसाठी व पक्षिमित्रासाठी 'महाराष्ट्र पक्षीमित्र'तर्फे आयोजित या व्याख्यानांच्या मालिकेत आजवर एकूण ०६ व्याख्याने ऑनलाईन पद्धीतीने पार पडली असून या प्रत्येक व्याख्यानास पूर्ण क्षमतेने श्रोत्यांची उपस्थिती मिळाली आहे. १०० पेक्षा जास्त श्रोत्यांची क्षमता पूर्ण झाल्याने प्रवेश सुद्धा मिळू शकत नाही असे चित्र बघावयास मिळाले आहे.
 
 
 
 
 
आजवर या व्याख्यानमालेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईचे सहायक संचालक डॉ. राजू कसंबे (पक्षीनिरीक्षणाची सुरुवात आणि पक्ष्यांची ओळख) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईचे कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे (पक्ष्यांची ओळख आणि नोंदणी) अमरावती येथील वेक्सचे पक्षी अभ्यासक किरण मोरे (माळरानावरील चंडोल पक्षी ओळख आणि प्रजानाचा अभ्यास) बर्ड काउंट इंडीया, बंगळूरू येथील पूजा पवार (प. घाटातील धनेश प्रजातींचे संवर्धन व त्यांचे महत्व), नाशिक येथील पक्षिमित्रचे जेष्ठ सदस्य सतीश गोगटे (नांदूर मध्यमेश्वर या रामसर स्थळावर स्थलांतरित पक्षी जास्त का येतात?) व सांगली येथील पक्षिमित्रचे जेष्ठ सदस्य व पक्षी आवाज तज्ज्ञ शरद आपटे (पक्ष्यांचा आवाज हीच पक्ष्यांची भाषा) अशा सहा तज्ञांची विविध माहितीपूर्ण व रंजक विषयावर एकूण सहा व्याख्याने पार पडली आहेत. पुढील दोन आठवड्यात प्रतीक्षा कोठुळे नाशिक (गिधाडांचे पुनर्वसन आणि सुरक्षित अधिवास निर्मिती) प्रा. डॉ. गजानन वाघ, अमरावती (पाणथळ ठिकाणे चिखलपक्षी आणि त्यांची ओळख), डॉ. जयंत वडतकर, अमरावती (रानपिंगळा : पुनर्शोध आणि त्यानंतर), डॉ. अनिल पिंपळापुरे, नागपूर (आशियन पाणपक्षी गणना), डॉ. संदीप साखरे, अकोला (माळटिटवीचे जीवनचक्र), मनोज बिंड (पक्ष्यांचे छायाचित्रण) अविनाश कुबल (मुंबई), व डॉ. राजू कसंबे, सतीश गोगटे, नाशिक (रामसर दर्जाचे पाणस्थळे आणि पहिले रामसर स्थळ नांदूर मध्यमेश्वर) अशा विविध आणखी दहा व्याख्यानांचे आयोजन करण्यात करण्यात येणार असल्याचे व्याख्यानमालेचे निमंत्रक तथा 'महाराष्ट्र पक्षीमित्र'चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले. या आयोजनासाठी प्रा. गजानन वाघ, किरण मोरे, नंदकिशोर दुधे यांचे सहकार्य लाभत असून ही सर्व व्याख्याने झूम या ऑनलाईन अँप वरून घेतली जात आहेत. अधिक माहितीसाठी 9822875773 या क्रमाकांवर जयंत वडतकर यांच्याशी संपर्क साधावा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@