लहानपणीच पैशांचं मोल जाणणारा अरुण म्हणजे धनेश्वर उद्योगसमूहाचा संचालक अरुण धनेश्वर होय.
१९८२चा गिरणीकामगारांचा संप म्हणजे त्यांच्या आयुष्यातला खराखुरा सुरु झालेला ‘लॉकडाऊन’ होता. हजारो कुटुंबं या संपामुळे देशोधडीला लागली. याच संपाचा बळी ठरलेलं कुर्ल्यातलं धनेश्वर कुटुंब. या कुटुंबातला १२ वर्षांचा अरुण दुधाच्या रिकाम्या पिशव्या घेऊन विकायला एका रद्दीवाल्याकडे गेला. रद्दीवाल्याने पिशव्या पाहून तीन रुपये देतो म्हणून सांगितले. “पण, माझ्या आईने ६० पिशव्यांचे ५ रुपये येतात,” अरुण म्हणाला. रद्दीवाल्याने एक स्वच्छ पिशवी दाखवत सांगितले की, “अशी स्वच्छ पिशवी असेल तरच ५ रुपये मिळतात. तुझ्याकडच्या काही पिशव्यांमध्ये दुधाचे अंश तसेच आहेत.” “ठीक आहे, मी साफ करुन देतो पिशव्या.” असे म्हणत अरुण तिथेच बसला आणि रद्दीवाल्याकडच्या फडक्याने पिशव्या साफ करु लागला. दीड तास झाला मुलगा अजून आला नाही म्हणून अरुणचे बाबा त्याला शोधण्यासाठी निघाले. अरुण पिशव्या साफ करताना त्यांना दिसला. ते अरुणसह घरी आले. डबडबत्या डोळ्यांनी त्यांनी अरुणच्या आईला घटना सांगितली. अरुणच्या आईचे सुद्धा डोळे भरुन आले. तिने अरुणला जवळ घेत हृदयाशी कवटाळले. ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,’ या म्हणीचा प्रत्यय घेत अरुण उद्योगात उतरला. स्वत:चे चार निरनिराळे व्यवसाय उभारले. लहानपणीच पैशांचं मोल जाणणारा अरुण म्हणजे धनेश्वर उद्योगसमूहाचा संचालक अरुण धनेश्वर होय.
५०-६०च्या दशकात सांडू धनेश्वर औरंगाबाद वरुन मुंबईला आले. भायखळ्याच्या एका गिरणीत कामाला लागले. सांडू धनेश्वरांना त्यांची पत्नी लीलाबाई खांद्याला खांदा लावून साथ देत होत्या. दरम्यान दोन मुले आणि दोन मुली असं सहा जणांचं कुटुंब झालं. ऐन उमेदीच्या भरात मुंबईच्या इतिहासातला तो काळाकुट्ट अध्याय सुरु झाला. मुंबईत गिरणीकामगारांचा संप पुकारला गेला. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मिळेल ती कामं करु लागली. धनेश्वरांनी कोंबड्या पाळल्या. त्यातून अंशत: पैसे मिळायचे. दुधाच्या पिशव्या साठवून महिना-दोन महिन्याने विकून येणार्या पैशातून काहीतरी चटणी-मीठ आणलं जाई. तो काळ खर्या अर्थाने काटकसर शिकवणारा होता. अरुण शाळेत शिकता-शिकता वृत्तपत्रे घरोघरी पोहोचविण्याची कामे करु लागला. नेहरु नगरच्या एस.के.पी. वालावलकर हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण झालं. पुढे मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातून नाट्यप्रशिक्षणाची पदविका त्याने प्राप्त केली.
संप ही अरुणच्या काळजातली ठसठसती जखम होती. नोकरीमध्ये आर्थिक स्थैर्य नसतं, हे एव्हाना त्याला कळलं होतं. तसं साकीनाक्याला दिवसभर काम करुन संध्याकाळी ६ नंतर तो नाईट कॉलेजमध्ये शिकला होता. नोकरदाराचं जगणं त्याने अनुभवलेलं होतं. त्यामुळे नोकरी न करता व्यवसाय करायचा हे मनाशी त्याने पक्क केलं होतं. यातूनच त्याने सन २००१च्या आसपास सायबर कॅफे सुरु केला. नाट्यप्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याने नाटक, चित्रपट, मालिकेमधून प्रॉडक्शनची कामे केली. ही कामे करताना अरुणला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, खरा पैसा हा निर्माता, वितरक वा नाटकाच्या व्यवस्थापकाकडे असतो. त्या दिशेने आपण काम करणे आवश्यक आहे. या विचारातूनच एक प्रॉडक्शन हाऊस सुद्धा उभं राहिलं. या माध्यमातून नाटक, चित्रपट, मालिका यांच्या प्रॉडक्शनची कामे होऊ लागली.
सोबत वितरणाची कामेसुद्धा करु लागले. दरम्यान अरुणचा विवाह पंचशिला या सुविद्य तरुणीसोबत झाला. योग आणि चार्वी अशी गोंडस मुले या दाम्पत्याला आहेत. कालांतराने अरुण धनेश्वरांना लहानपणीचे घरोघरी पेपर लाईन टाकण्याचे दिवस आठवले. तब्बल १५० वृत्तपत्रे वितरण ते दररोज करीत. कोणत्या घरात कोणतं वृत्तपत्र वाचलं जातं, हे त्यांना तोंडपाठ होतं. वृत्तपत्राशिवाय लोकांना मासिकामध्ये स्वारस्य आहे हे त्यांना माहित होतं. शाळा-महाविद्यालयात जर्नल्स आणि शैक्षणिक नियतकालिके वाचली जातात. त्यांची जास्त गरज असते हे उमजल्यानंतर ते या क्षेत्रात उतरले. ‘ए फॉर अॅप्पल’ नावाची कंपनी सुरु केली. अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यक, औषध, विधी व कायदे अशा जवळपास सर्वच शैक्षणिक क्षेत्रातील शाखांचे जर्नल्स, नियतकालिके ते महाविद्यालय व विद्यापीठांना वितरित करतात. सध्या पाचशेहून अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांना सातशेहून अधिक प्रकाशनांचं ते वितरण करतात. ‘ऍथनिअम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने त्यांनी त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या महाराष्ट्रीयन उद्योजकीय संस्थेने सुरु केलेल्या उद्योजकीय प्रशिक्षण वर्गाचे ते पहिले विद्यार्थी होत.
‘धनेश्वर रोडवेज’ या नावाने ते एलपीजी गॅस वितरणाचे काम देखील करतात. ‘डिक्की’च्या सहकार्यामुळे त्यांना निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून वितरणासाठी दोन टँकर्स मिळाले आहेत. त्यांचे बंधू रविंद्र धनेश्वर हे ‘धनेश्वर रोडवेज’चा कारभार पाहतात. त्याचप्रमाणे इव्हेंट्स आणि वितरणासाठी ‘धनेश्वर प्रॉडक्शन’ची मुहूर्तमेढ सुद्धा त्यांनी रोवली आहे. ‘बी अ जॉब गिव्हर’ नावाचा उद्योजकीय कार्यक्रम ते लवकरच घेऊन येत आहेत. धनेश्वर उद्योगसमूहाच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या ४०० हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. अरुण धनेश्वरांची उद्योगातील प्रगती पाहून ‘डिक्की’चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी मुंबई विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली. या माध्यमातून अनेक तरुणांना ते उद्योगाविषयी मार्गदर्शन करत असतात. ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,’ हे बाळकडू स्वानुभवातून शिकलेले अरुण धनेश्वर कोणत्याही तरुण उद्योजकासाठी आदर्शवत आहेत.