मुंबई : कोरोनाची लागण आणि मृत्यू यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांच्या बचावासाठी पालिकेकडून त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 'कोरोनाचा अधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांना असल्याने त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच सर्वेक्षणा दरम्यान गरज वाटल्यास त्यांच्या शरीरातील प्राणवायू पातळी तपासली जाणार आहे. प्रमाण कमी असल्यास प्राणवायू उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबईत ३ हजार ४४५ बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी ४०८ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या २ हजार ८८२ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत १५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड आजार, दमा असे विविध आजार असल्याने प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांचा कोरोनाची बाधा लवकर होते. अशा ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व वैद्यकीय दृष्टिकोनातून एक विशेष सर्वेक्षण महानगरपालिकेने हाती घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, कर्करोग, अनियंत्रित दमा, मूत्रपिंड विकार, थाॅयराइड विषयक आजार, श्वसनाचे आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नोंद प्राधान्याने घेतली जाणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार केले जाणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांच्या (हेल्थ पोस्ट) परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय एका चमू गठीत करण्यात येत असून त्यांच्याद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या चमूमध्ये २ 'कम्युनिटी हेल्थ वर्कर' वा 'आशा वर्कर' यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक देखील यांना मदत करणार आहेत.
महानगरपालिकेची काही उपनगरीय रुग्णालये ही 'नॉन कोविड' रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये सांताक्रूझ पूर्व परिसरातील विष्णुप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वोपचार रुग्णालय, मालाड पूर्व परिसरातील सदाशिव कानोजी पाटील मनपा सर्वोपचार रुग्णालय, बोरीवली पूर्व परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, विक्रोळी परिसरातील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले मनपा सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड पूर्व परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रुग्णालय इत्यादी उपनगरीय रुग्णालयांच्या समावेश आहे. या उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुमारे ३०० खाटा 'नॉन कोविड' रुग्णांसाठी आहेत. तर जे.जे. रुग्णालयामध्ये १०० खाटा 'नॉन कोविड' रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहे. याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयातील धर्मादाय खाटांचा उपयोग देखील या रुग्णांसाठी करण्यात येणार आहे.