हिंदुस्थान बळावले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |
Samarth Ramdas_1 &nb



आपला देश म्लेंच्छांच्या तावडीतून सोडवून हिंदुस्थान बलवान झालेला रामदासांना बघायचा होता. आपल्या ध्येयाचा असा संकल्प करताना स्वामींनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या होत्या. संपूर्ण हिंदुस्तान त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे नक्की. एवढेच नव्हे तर सर्व पापी, चांडाळ, दुष्ट मारले जाऊन ‘निर्मळ जाहली पृथ्वी’ असे उत्तुंग ध्येय स्वामी बाळगून होते. रामावतारात रामाने असुरांच्या बाबतीत जे धोरण अवलंबले होते, तेच आता शिवाजी महाराजांच्या रुपाने येऊन त्यांच्या सैन्याने दुष्टांचा समाचार घ्यावा व गांजलेल्या या राष्ट्राला व हिंदू संस्कृतीला त्यातून सोडवावे, असे रामदासांना वाटत होते.
 
समर्थकालीन एकंदर राजकीय, सामाजिक परिस्थितीचे रामायण कालखंडातील परिस्थितीशी साम्य रामदासांनी चाणाक्षपणे ओळखले होते. जुलमी पारतंत्र्याचा अंध:कार जाऊन हिंदवी स्वराज्याची पहाट स्वामींच्या समोर उदयाला येत होती. स्वामींच्या क्रांतिकारी विचारांना, प्रयत्नांना यश येताना दिसत होते. अशावेळी कविमनाच्या रामदासांनी आनंदून भविष्यातील घडणार्‍या घटना द्रष्टेपणाने लोकांसमोर मांडल्या तर त्या आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यातून ‘आनंदवनभुवनी’ या काव्याची निर्मिती झाल्याचे आपण मागील लेखात पाहिले.
 
रामदासांच्या विचार प्रगटीकरणाचा, भाषेचा ओघ एवढा प्रचंड आहे की, ‘आनंदवनभुवनी’ काव्यातील कडव्यांची नीट संगती लावल्याशिवाय त्यातील आशयाची कल्पना येत नाही. तरीही काही ठिकाणी गूढार्थाने झाकलेल्या अर्थाचा उलगडा करताना अडचणी येतात. रामाने सज्जनांच्या ऋषिमुनींच्या रक्षणार्थ त्यांना त्रास देणार्‍या राक्षसांना एकामागून एक मारून टाकले. त्या मारून टाकलेल्या राक्षसांच्या हाडांचे डोंगर रचले गेले, असे म्हणतात. अनेक सहस्र वर्षांच्या काळात त्या हाडांचे प्रस्तर खडक तयार झाले आहेत. रामाच्या ‘दक्षिणापंथ’ या भ्रमणमार्गात काही ठिकाणी हे खडक आढळतात. आग लावली तर ते प्रस्तर जळतात आणि ते जळताना त्यातून हाडांच्या ज्वलनाची दुर्गंधी येते. रामाने राक्षस मारले. परंतु, राक्षसीवृत्ती नष्ट न होता, निपचित पडून होती. ती समर्थकाळात पुन्हा बलवान होऊन लोकांना त्रास देऊ लागली होती, असे समर्थ म्हणतात. हिंदू संस्कृतीवर आलेल्या या विघ्नाने देवांचाही देव आता संतापला आहे. या विघ्नांचा शेवट झाला पाहिजे, असे मुख्य देवाने मनावर घेतले, असे रामदासांना दिसत होते.
 
पूर्वी जे मारिले होते।
तेचि आता बळावले ॥
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनी॥ 29॥
 
 
रामदास पुढे म्हणतात, “लोकांना या गोष्टी माहीत आहेत की, पूर्वी या राक्षसांनी त्रैलोक्यात धाक निर्माण केला होता. अशावेळी रामाने पीडितांचा पक्ष घेऊन प्रथम हनुमानाला तेथे पाठवले. रावणाच्या लंकेत हनुमानाने आपल्या शेपटीच्या साहाय्याने दाणादाण उडवली होती. आता हिंदू देवतांची, धर्माची चेष्टा होत आहे. त्यामुळे सर्व लोकक्रोधाने संतप्त झाले आहेत. मुख्य देवच आता उठला आहे. त्यामुळे काय होणार हे कळेनासे झाले आहे.
 
खौळले लोक देवांचे।
मुख्य देवचि उठिला॥
कळेना काय रे होते।
आनंदवनभुवनी॥ 12॥
 
जेव्हा सर्व लोक संतापून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक होतात, तेव्हा देवही त्यांना साहाय्य करण्यासाठी धावून येतो, असे चित्र रामदासांना दिसत होते. या युद्धाचे संकेत त्यांना जाणवत होते. त्यांना वाटत होते की, अनेक रणवाद्ये वाजत आहेत. सैन्याला त्वेष येण्यासाठी रणवाद्ये वाजवतात. अशी अनेक रणवाद्ये, एकाच वेळी वाजत असल्याने ध्वनींचा कल्लोळ झाला आहे. छबिने डोलत आहेत. लोक ढाली घेऊन निघाले आहेत. अन्यायाविरुद्ध आता हे घनघोर युद्ध होणार असून देवांनी त्यात भाग घेतला आहे. हे कशासाठी?
 
तर-
 
 
कल्पान्त मांडिला मोठा।
म्लेंच्छ दैत्य बुडावया।
कैपक्ष घेतला देवी। आनंदवनभुवनी॥27॥
 
 
हा सारा खटाटोप म्लेंच्छरूपी राक्षस बुडवण्यासाठी चालला आहे. आता त्यात प्रत्यक्ष देवांचा सहभाग आहे. त्याचा परिणाम म्हणून जे अभक्त आणि पापी आहेत, त्यांचा नाश होणार आहे आणि हिंदुस्थान बलशाही होणार आहे. आता या दुष्टांचा संहार निश्चित आहे. कारण, रामाला वर देणारी ‘रामवरदायिनी माता’ अर्थात भवानीमाता हातात गदा घेऊन उठली आहे. याच भवानीमातेने पूर्वी गदाप्रहार करून पाप्यांना मारून टाकले होते. ती भक्तांचे रक्षण करते, अशी तिची ख्याती आहे.
 
 
भक्तांसि रक्षिले मागे।
आताही रक्षिते पहा।
भक्तांसि दिधले सर्वे। आनंदवनभुवनी॥43॥
 
 
ही तुळजाभवानी शिवरायांची कुलदेवता आहे. आपल्या भक्तांचे ती नेहमी रक्षण करते. आता सर्वच देव उठल्याने दुष्ट, पापी, चांडाळ, भेदभाव वाढवणारे समाजविघातक कृत्ये करणारे या सार्‍यांना देव झोडपून काढणार आहेत. ते पापी आता मरतील किंवा पळून जातील आणि ही पृथ्वी स्वच्छ होईल.
 
 
बुडाले भेदवाही ते।
नष्ट, चांडाळ, पातकी।
ताडिले पाडिले देवे। आनंदवनभुवनी॥34॥
गळाले पळाले मेले।
जाले देश धडी पुढे।
निर्मळ जाहली पृथ्वी। आनंदवनभुवनी॥35॥
 
 
आपला देश म्लेंच्छांच्या तावडीतून सोडवून हिंदुस्थान बलवान झालेला रामदासांना बघायचा होता. आपल्या ध्येयाचा असा संकल्प करताना स्वामींनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या होत्या. संपूर्ण हिंदुस्तान त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे नक्की. एवढेच नव्हे तर सर्व पापी, चांडाळ, दुष्ट मारले जाऊन ‘निर्मळ जाहली पृथ्वी’ असे उत्तुंग ध्येय स्वामी बाळगून होते. रामावतारात रामाने असुरांच्या बाबतीत जे धोरण अवलंबले होते, तेच आता शिवाजी महाराजांच्या रुपाने येऊन त्यांच्या सैन्याने दुष्टांचा समाचार घ्यावा व गांजलेल्या या राष्ट्राला व हिंदू संस्कृतीला त्यातून सोडवावे, असे रामदासांना वाटत होते. इथपर्यंत रामदास, म्लेंच्छ दैत्य असूर इत्यादी सूचक शब्दांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचा उल्लेख करीत होते. पण, आता मात्र स्वामींनी त्यांच्या मनातील स्पष्ट विचार पुढील कडव्यात मांडले.
 
 
बुडाला औरंग्या पापी ।
म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडिली मांजिली क्षेत्रे ।
 आनंदवनभुवनी ॥33॥
 
 
येथे दिल्लीचा बादशहा औरंगजेब याचा उल्लेख स्वामींनी ‘औरंग्या’ अशा तुच्छतादर्शक शब्दात केला आहे. दुष्ट, कपटी, कारस्थानी, विश्वासघातकी अशीच त्याची ओळख होती. संत प्रवृत्तीच्या रामदासांच्या मनात औरंगजेबाविषयी किती घृणा आणि तिरस्कार होता, हेच यातून दिसून येते. हा औरंग्या पापी बुडाला, नाश पावला एवढेच द्रष्ट्या स्वामींना दिसत होते, असे नसून त्यांना हेही जाणवत होते की, या औरंगजेबाने किंवा त्याच्यापूर्वीच्या म्लेंच्छांनी जी आमची श्रद्धास्थाने, तीर्थक्षेत्रे, मंदिरे उद्ध्वस्त केली, भ्रष्ट केली ती आता पुनर्स्थापित होत आहेत. अयोद्धेचे राममंदिरही पुनर्स्थापित व्हावे, ही स्वामींची इच्छा होती. तथापि हे त्यांचे स्वप्न साकार होण्यास 400 वर्षे जावी लागली. आज अयोद्धेला रामाच्या जन्मस्थानी पुन्हा मंदिर बांधले जात आहे, हे ऐकून स्वामींच्या आत्म्याला खचितच आनंद झाला असेल! स्वामींच्या इच्छाशक्तीला काळाचे बंधन नाही, हे खरे. अजूनही अनेक उद्ध्वस्त मंदिरे, तीर्थक्षेत्रे पुनर्स्थापित व्हायची आहेत. हा पापी औरंग्या बुडाल्यानंतर भक्तिमार्गी सात्त्विक स्वामींच्या पुढे हिंदू संस्कृतीचे एक मनोहारी स्वरूप दिसत होते.
 
 
उदंड जाहले पाणी ।
स्नान संध्या करावया ।
जप-तप-अनुष्ठाने ।
आनंदवनभुवनी ॥36॥
 
 
आता लोक आनंदाने तप, पुरश्चरणे, तीर्थस्नाने, धार्मिक विधिविधाने मोकळेपणाने करतील. लोकांमध्ये परस्पर प्रेम वाढेल, सगळीकडे देवालये, दीपमाळा, रंगमाळा अशी शुभसूचक चिन्हे बघायला मिळतील. त्यामुळे देवभक्त एक होतील. सगळीकडे आनंदीआनंद होईल. आनंदमयी वातावरणाने लोकांची काया आरोग्यदायी होईल. रामकर्ता, रामभोक्ता असे रामराज्य या भूमंडळी अवतरेल. मी आणि देव यात अंतरच राहणार नाही.
 
रामकर्ता रामभोक्ता ।
रामराज्य भूमंडळी ।
सर्वस्वे मीच देवाचा ।
माझा देव कसा म्हणो ॥48॥
 
 
यानंतर सर्व विद्या, कला, विवेक, वैराग्य या गुणांवर उभारलेली आमची संस्कृती पुन्हा नव्याने टवटवीत होईल. सतराव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या राज्यक्रांतीचे जोरदार वर्णन स्वामींच्या या स्वप्नात पाहायला मिळते. सर्व देश दुःखात बुडालेला पाहून स्वामींचा जीव तडफडला व या दुःखातून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेली मोहीम त्यांनी ‘आनंदवनभुवनी’ या स्वप्नात पाहिली व ते उद्गरले,
 
 
‘बुडाले सर्वही पाणी ।
हिंदुस्थान बळावले ॥’
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@