गायत्री मंत्र - भाग २ : परमेश्वराची स्तुती व उपासना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |

Gayatri Mantra_1 &nb




मागील भागात आपण ईश्वराचे मुख्य नाव ‘ओ३म्’ यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली. यात ‘ओ३म्’चा अर्थपूर्ण जप केल्याने होणारे लाभ यावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता या भागात गायत्री मंत्राची स्तुती व उपासना यासंदर्भात
चर्चा करूया.


 
अन्वयार्थ

 
(ओ३म्) हे सर्वव्यापक, सकलरक्षका भगवंता! तू (भू:) सत् प्राणस्वरुप, स्वयंभू (भुव:) चित् सर्व दु:खांना दूर करणारा, (स्व:) आनंद स्वरुप, सुखप्रदान करणारा आहेस. (तत्) अशा त्यावरीलप्रमाणे सच्चिदानंद असलेल्या (सवितु:) सर्व जगाच्या उत्पतीकर्त्या, सृजनकर्त्या, जन्मदात्या (देवस्य) दातृशक्तीने व दिव्यगुणांनी परिपूर्ण अशा महानतम देवाच्या (वरेण्यम्) वरण करण्यास योग्य, स्वीकारण्यास योग्य गुणांचे व (भर्ग) पवित्र व शुद्ध स्वरुपाचे (वयम्) आम्ही सर्व उपासक (धीमहि) एकाग्रतेने ध्यान व धारण करतो. (य:) असा जो सर्वश्रेष्ठ महान परमेश्वर (न:) आम्हा सर्व उपासकांच्या, भक्तांच्या (धिय:) बुद्धींना व कर्मांना (प्रचोदयात्) सदैव सत्प्रेरित करो, पवित्र मार्गावर नेत राहो!
 
मागील भागात आपण ईश्वराचे मुख्य नाव ‘ओ३म्’ यासंदर्भात विस्तृतपणे चर्चा केली. यात ‘ओ३म्’चा अर्थपूर्ण जप केल्याने होणारे लाभ यावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता या भागात गायत्री मंत्राची स्तुती व उपासना यासंदर्भात चर्चा करूया. ‘भूर्भुव: स्व:’ ही स्तुती आहे आणि तत्सवितुर्वरेण्यं....धीमहि.’ हा अंश उपासना आहे. सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या गुणांची व त्याच्या कार्याची प्रशंसा करणे किंवा स्तवन करणे याला ‘स्तुती’ असे म्हणतात. परिणामी, त्या स्तुतिपाठकाला त्याकडून काही इच्छित गोष्टींची प्राप्ती होत असते. खरेतर सर्व जगाचा उत्पत्ती-स्थिती-प्रलयकर्ता म्हणजे परमेश्वर! त्याची सत्ता सर्वत्र विद्यमान आहे. म्हणूनच तो सर्वांचा विभू देव अशा त्या सर्वश्रेष्ठ भगवंताचीच स्तुती करणे इष्ट! कारण, तो सर्वांच्या कामना पूर्ण करतो. परमेश्वराची स्तुती का करावी? याविषयी थोर वेदज्ञ महर्षी दयानंद म्हणतात - स्तुतीमुळे ईश्वराप्रत जवळीकता, प्रेम व आदरभाव व्यक्त होतो. भक्त हा भगवंताच्या गुण, कर्म व स्वभावाप्रमाणेच आपलेदेखील गुण, कर्म स्वभाव बनवित आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.
 

गायत्री मंत्रातील ‘भूः’, ‘भुवः’ व ‘स्वः’ हे तीन शब्द स्तुतिवाचक आहेत. यांनाच ‘व्याहृति’ असेही म्हणतात. या शब्दाचा संधीविच्छेद केला असता ‘वि + आ + हृ + ति’ याप्रमाणे व्याहृतिंचा ‘महदाशयघन शब्द’ असा अर्थ होतो. हे तिन्ही शब्द ईश्वराच्या सत्-चित्-आनंद या तत्त्वांना विशद करतात. यातील पहिला ‘भूः’ स्तुतिवाचक शब्द भगवंताच्या सत्तेचे, उपस्थितीचे किंवा विद्यमानतेचे प्रकटीकरण करतो. ‘भू-भव्’ हा धातू ‘सत्’ (अस्तित्व) भावनेला व्यक्त करतो. ‘भवति इति भूः।’ म्हणजेच जो सदा सर्वकाळी आपल्या व्यापक सत्तेत, सर्वत्र विद्यमान आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी... एवढेच काय तर प्रत्येक सूक्ष्म व स्थूल वस्तूंमध्ये भूत, वर्तमान व भविष्यकाळी त्या परमेश्वराची सत्ता व्यापलेली आहे. म्हणून तो ‘भूः’ होय.
 

तसेच तैत्तिरीय आरण्यकग्रंथात ‘भूः’चा अर्थ स्पष्ट करताना ऋषी म्हणतात- ‘भूः इति प्राणः।’ ‘भूः’ हा शब्द प्राणांकरिता वापरला जातो. महर्षी दयानंद हाच उपनिषदवचनाचा धागा पकडून म्हणतात- ‘प्राणयति जीवयति सर्वान् प्राणिनः स प्राणः प्राणादपि प्रियस्वरुपो वा स चेश्वर एव।’ म्हणजेच जो सर्व प्राण्यांचा जीवनदाता आणि प्राणांपेक्षाही प्रिय आहे, तोच ‘भूः’ ईश्वर होय. स्वतः ईश्वर परिपूर्ण असल्याने तो ‘स्वयंभू’देखील आहे.

 
दुसरा ‘व्याहृति’ शब्द आहे- ‘भुवः ।’ म्हणजेच जो चेतनस्वरुपी चित् शक्तीयुक्त असतो. ‘यः भावयति सः भुवः।’ जो इतर सर्व प्राणिसमूहास चेतवितो, चैतन्य निर्माण करतो आणि ज्ञानशक्तीने उत्साही बनवितो. तो ‘भुवः।’ नैत्तिरीय आरण्यकात ‘भुवः’ करिता ‘अपान’ असे म्हटले आहे. म्हणजेच सर्व प्रकारची दुःखे दूर करणारा! ‘भुवः इति अपानः।’ परमेश्वर पूर्ण ज्ञानी आहे. त्याला जगातील प्राकृतिक (जड) तत्त्वांची आणि आत्म(चेतन) तत्त्वांची दुःखे कळतात. कारण, तो त्रिकालज्ञ आहे म्हणत त्यांना दूर सारण्याचे सामर्थ्यदेखील त्या ‘भुवः’ स्वरुपी दुःखनिवारक ईश्वरामध्ये आहे. जगात नेहमीच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक दुःखे निर्माण होत असतात. माणसाचे सामर्थ्य स्वस्थ आहे आणि निसर्ग (प्रकृती) हादेखील अपूर्णच! म्हणून या त्रिविध दुःखांना परतवून लावणारा प्रभू हा ‘भुवः।’ होय.

 
 
मग हा परमेश्वर तर स्वतःदेखील सर्व दुःखांवाचून दूरच असणार.म्हणून शेवटचा तिसरा ‘व्याहृति’ शब्द आहे. ‘स्वः।’ समग्र विश्वात ईश्वराची सत्ता (सत्) चेतन स्वरूपी (चित्) आहे. पण, ती जर सुखपूर्ण किंवा नित्य आनंदमय नसेल, तर ती महानतम कशी काय होणार? म्हणून भगवंताला ‘स्वः।‘ म्हटले आहे. सृष्टी किंवा जीवात्म्यांमध्ये पूर्ण सुख कदापी नाही. ते कधी सुखी होतात तर कधी दुःखी! जगात आपणास अशी दृश्ये नेहमीच पाहावयास मिळतात -


 
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असे समर्थ म्हणतात, तर आचार्य भर्तृहरी म्हणतो - ‘न जाने संसार किनमृतमयः किं विषमयः।’ पण, ईश्वर मात्र पूर्णांशाने सुखस्वरूप व आनंदस्वरूप आहे. छंदोज्य उपनिषदात म्हटले आहे - ‘नाल्पे सुखमस्ति भूमा त्वेव सुखम्।’ परिपूर्ण असे सुख ज्या ईश्वरीय तत्त्वामध्ये आहे, त्यासारखा जगात कोणीही नाही. म्हणूनच ईश्वराला ‘रसो वै रसः।’ व ‘विज्ञानमानन्दं ब्रह्मः।’ अशा वर्णनशैलीने स्तुत्य मानले आहे.

 
अशा प्रकारे ‘भूः’, ‘भुवः’, ‘स्वः’ या तीन व्याहृति शब्दांनी भगवंताची स्तुती करीत भक्त त्या ईश्वराच्या सान्निध्यात वसतो (राहतो) किंवा आसन जमवितो. यालाच आध्यात्मिक भाषेत ‘उपासना’ असे म्हणतात. ‘उप + आसन’ म्हणजेच त्या सर्वव्यापक व सर्वांतयी मी ईश्वराच्या जवळ (निकट) जाऊन त्याच्या सारखेच आपले गुण, कर्म व स्वभाव बनविणे आणि तल्लीन होऊन त्या महान देवाच्या विशेष पवित्र सद्गुणांना जीवनात धारण करणे होय. उपासनेचा उद्देश हा शुद्ध व पवित्र असायला हवा आणि त्यासोबतच पूर्ण प्रयत्नदेखील हवा! यालाच ‘परम पुरुषार्थ’ असे म्हणतात. संकीर्ण व क्षुद्रस्वार्थापोटी किंवा इतरांचे वाईट चिंतण्याच्या हेतूने आणि काहीच प्रयत्न न करता आळशी व प्रमादी बनून (कर्महीनवृत्तीने) केलेली उपासना ही निश्चितच निष्फळ ठरते.
 


गायत्री मंत्रातील ‘तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।’ हा अंश उपासना आहे. याचा अन्वय असा होतो- ‘सवितुः देवस्य तत् वरेण्यं भर्गः च वयं धीमहि।’ सविता देवाच्या त्या वरणीय (एकीकरणीय) व शुद्ध (पवित्र) स्वरुपाचे आम्ही ध्यान करतो. त्याला जीवनात धारण करतो.  ‘सवितुः’ म्हणजेच त्या सर्वव्यापक निर्मात्याचे! सूर्याचे नव्हे, तर असंख्य सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रादी तत्त्वे आणि सकल प्राणिमात्राला उत्पन्न करणार्‍या ईश्वराचे! तसेच ‘देवस्य’ म्हणजे त्या दिव्य गुणांनी परिपूर्ण अशा भगवंताचे! सविता व देव ही ईश्वराची गौणिक नामे!
 


‘सु’ या प्रसववाचक किंवा ऐश्वर्यवाचक धातूपासून ‘सविता’ हा शब्द उत्पन्न होतो. ‘सुनोति सूयते सुपति वा उत्पादयति सकलं जगत् स सर्वपिता जगदीश्वरः।’ असा याचा अर्थ होतो. त्या सविता ईश्वरामुळे जगातील प्रत्येक जड व चेतन वास्तू उत्पन्न होतात. स्थूल अर्थाने आपण सूर्याला सविता असे म्हणतो. याचे कारण म्हणजे सूर्याची किरणे पडल्याबरोबर सृष्टीतील सर्व चेतन व जडतत्वे उत्पन्न होऊ लागतात. ऊर्जावान बनतात. तद्वतच सविता भगवंताचा कृपाप्रसाद किंवा त्याचा प्रकाश पडला की जगातील सर्वांमध्ये उत्पन्न होण्याची क्षमता व प्रक्रिया सुरू होते. जसा सूर्य प्रत्यक्ष येऊन कोणाला जन्माला घालत नाही, तर त्याची प्रकाश किरणे ज्यांच्या ज्याच्यावर पडतात. त्या त्या वस्तूंमध्ये जन्मण्याची किंवा निर्मितीची प्रक्रिया आरंभते, तसेच आहे त्या महासूर्य ईश्वराविषयी भगवंताला ‘देव’ असेही म्हणतात. ते का व कशासाठी हा आणि गायत्री मंत्रातील उर्वरित उपासना प्रार्थनेचा भाग पुढील अंकात पाहू.


 
- - प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@