मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये सध्या लॉकडाऊन आहे. अशावेळी घरात राहून काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. पण जो हाडाचा कलाकार असतो, तो कधीच स्वस्थ बसत नाही. वांबोरी [ता.राहुरी] येथील लेखक-कवी आशिष निनगुरकर यांनी घरात राहून 'कोरोना' जनजागृती विषयक सामाजिक संदेश देणारा "नियम" हा लघुपट तयार केला आहे. अवघ्या सहा मिनिटांच्या लघुपटात योग्य आशय मांडला आहे. हा लघुपट घरात चित्रित करण्यात आल्याने कुणीही शुटिंगसाठी घराबाहेर पडले नाहीत. "एकत्र येण्याची नको घाई, पुन्हा हा जन्म नाही" अशी भावनिक साद या लघुपटातून घातली आहे.
सरकारने या 'लॉकडाऊन'च्या काळात अनेक 'नियम' दिले आहेत. आपण जर हे नियम पाळले नाहीत, तर काय होऊ शकते ? हे या लघुपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवण्याचा त्यांनी विडा उचलला आहे. 'मोबाईल' हा 'कॅमेरा', 'कुटूंब' हेच 'कलाकार' आणि 'घर' हेच 'लोकेशन' वापरून, सामाजिक आशयाचा 'नियम' हा लघुपट निर्मित केला आहे. आशिषने कमी कालावधीमध्ये आणि उपलब्ध गोष्टींमध्ये हा लघुपट चित्रित केला. आशिष हा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लेखक-गीतकार म्हणून कार्यरत आहे. आशिष वगळता या क्षेत्रात बाकी घरातील सर्व नवखे आहेत. अवघ्या एका दिवसात 'नियम' नावाचा सामाजिक संदेश देणारा हा लघुपट तयार झाला.
"नियम" या लघुपटाची निर्मिती 'काव्या ड्रीम मुव्हीज' अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटात अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर व स्वरूप कासार यांनी भूमिका साकारल्या आहेत. इशांत सिंग व अभिषेक लगस यांनी या लघुपटाचे संकलन केले आहे. कॅमेरामन, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे. 'घरी राहा,सुरक्षित राहा' आणि 'नियम' पाळा, 'कोरोना' टाळा अशा सामाजिक आशय मांडणाऱ्या 'नियम' या लघुपटातून जनजागृती होईल असे वाटते.