एक असेही गुरूकुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020
Total Views |


plumbig inst_1  


मध्यंतरी किचन सिंक जाम झालं. घरगुती नानाविध उपाय करून झाले. पण ते काही मानायला तयार नाही. शेवटी आमच्या नेहमीच्या प्लंबरदादांना फोन केला, तर ते होते कुठे तरी कामात. म्हणाले, इथलं काम आटपून येतोच. ते चार तासांनी आले आणि पटकन माझी समस्या सोडवून दिली. प्लंबर एक अतिशय महत्त्वाचा माणूस आहे. पुण्यातील अशाच एका प्लंबर घडविणार्‍या अनोख्या गुरूकुलविषयी...



‘प्लंबिंग’अतिशय कौशल्याचे असे कार्यक्षेत्र. भारतात एका पाहणीनुसार सध्या साडेतीन लाख प्लंबरची आवश्यकता आहे. पण हे अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असूनदेखील दुर्लक्षित आहे. त्यामुळे ही कामे करायला माणसे मिळत नाहीत. दुसरीकडे बेरोजगार म्हणून अनेक तरुण तसेच बसून आहेत. ‘प्लंबिंग’ या व्यवसायाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे. अगदीच खालच्या थरांतील काम वाटते ते. समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नोलॉजीही संस्था करते आहे. सुभाषराव इनामदार आणि त्यांच्या सहकार्यांनी यासाठी काहीतरी करूया म्हणून प्रयत्न सुरु केले. इनामदार हे कॉस्ट अकाऊंटंट. एका मोठ्या कंपनी मधून २००७ साली ते निवृत्त झालेले. त्यांनी त्यांच्या सहकारी मित्रांच्या सोबत या समस्येवर बराच अभ्यास केला. तरुण युवकांशीदेखील संवाद साधला. त्यातून त्यांना प्लंबिंगच्या क्षेत्रात खूप चांगल्या संधी आहेत हे लक्षात आले. या कामासाठी स्वतःच काम करायचे हे ठरवून ‘ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नोलॉजी’ या संस्थेची स्थापना झाली.
२० नोव्हेबर, २०१० रोजी पुण्याजवळ वाघोली जवळच्या जगताप वस्तीत एक जागा भाड्याने घेऊन या प्रशिक्षणाचा शुभारंभ केला गेला. या केंद्रात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. तांत्रिक शिक्षणासोबतच समाजात वावरत असताना आवश्यक असलेली कौशल्येदेखील मुलांना शिकवण्याचा विचार यातून केला गेला आहे. गुरुकुल पद्धतीमुळे मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते. या संस्थेचे उद्दिष्ट फक्त कुशल प्लंबर तयार करणे एवढेच नाही, तर एक उत्तम देशभक्त तयार करणे हादेखील आहे. तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सोबत सामंजस्य करार करून त्याद्वारे अद्ययावत अभ्यासक्रम इथे शिकवला जातो. यात स्वतः हाताने काम करण्यावर भर दिला जातो. इथे ‘मिली’ हा एक उत्तम उपक्रम घेतला जातो, जो आवर्जून सांगण्यासारखा आहे.


इथे ३०/३५ मुले दिवस-रात्र एकत्र राहतात. त्यामुळे अभ्यासक्रम सोडून ते रोज एकमेकांच्या सोबत असताना जे काही अनुभव त्यांना येतात, कधी भांडण, वाद, विसंवाद किंवा कोणाजवळ झालेला चांगला संवाद असे येणारे अनुभव रोज मुलांनी लिहून काढायचे असतात. त्यातल्या सकारात्मक गोष्टी या सांगायच्या असतात. काही वेळा कुणाचं काही चूक वाटलं तर तेदेखील लिहायचं. यातून मुलांना स्वतःला चूक-बरोबर याविषयी विचार करण्याची सवय लागते. आपण विचार करतो, त्यापेक्षा वेगळाही विचार त्याच गोष्टीमध्ये लपलेला असतो, हे पाहण्याची सवय लागते. त्याचबरोबर व्यक्त होण्याची सवय लागते. हे लिहिलेले जे काही मनातले असेल ते प्रत्येक मुलाने बाकीच्या सर्व मुलांच्या समोर उभे राहून वाचून दाखवायचे असते. त्यामुळे मुलांमध्ये सभाधीटपणा येतो. तसेच आपले विचार समोरच्याला सांगण्याची कलादेखील अवगत होते. हा अभ्यासक्रम आहे दोन महिन्यांचा. हा पूर्ण करण्याला हमखास नोकरी दिली जाते. चांगल्या कंपनीत कमीत कमी आठ ते दहा हजारापर्यंत पगार मिळतो. गेल्या काही वर्षात ‘ज्ञानदा’ संस्थेने एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले व नोकरी-व्यवसायाला लावले आहे. एखाद्या मुलाला या कोर्सनंतर एखाद्या विषयात ‘स्पेशलायझेशन’ करायचे असेल तरी तीदेखील सुविधा इथे आहे. जसे की आता प्लंबिंगच्या कामात आता ‘सोलर वॉटर हिटर’, ‘ड्रीप इरिगेशन’, ‘गॅस पायपिंग’ अशा विविध नवीन तंत्रज्ञानातून नवीन रोजगार निर्मिती होते आहे.


प्लंबिंग ही एक स्वतंत्र शाखा आहे. खूपसे पाच-सात वर्षे काम करणारे अनुभवी प्लंबर यांच्यासाठी प्लंबिंग सुपरवायझर असा एक छोटा कोर्स ज्यात १५/१६ सेशन्स घेतले जातात. या अशा अनुभवी प्लंबर्ससाठी घेतला जातो. जो ऑन साईट घेतला जातो. ज्यात याना मॅनेजमेंट, सुपरवायझर स्किल, टीम बिल्डिंग असे आठवड्यातून एक वार ठरवून हाफ डे म्हणजे चार-पाच तास हे ट्रेनिंग दिले जाते. ज्यामुळे हे अनुभवी प्लंबर्स हे प्लंबर्स सुपरवायझर म्हणून नोकरी करू शकतात. ‘सिव्हील इंजिनिअर’साठीदेखील ‘प्लंबिंग डोमेन नॉलेज’ देणारी काही सेशन्स घेतली जातात. ‘प्लंबिंग डिझाईन’ ही तरुण मुलांसाठी एक नवीन शाखा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. मला वाटते खूप जणांना हे माहीतही नसेल की प्लंबिंगमध्ये हे एवढं काही करता येऊ शकते. मोठ्या मोठ्या इमारती, टॉवर्स यांना हे ‘प्लंबिंग डिझायनर’ आवश्यक असतात. चएझ (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग) अस आहे तिघांच कॉम्बिनेशन मोठ्या इमारतीसाठी अतिशय आवश्यक असते. या पुढे प्लंबिंग रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट हे खूप गरजेचे होणार आहे.


मुलांचा दिनक्रम साधारण असा असतो


सकाळी- प्रातः स्मरण, मग प्राणायाम व योगासने, श्रमसंस्कार, वाचन, क्लासरूम ट्रेनिंग, प्रत्यक्ष काम, जेवण, मैदानी खेळ.आपल्याला हा दिनक्रम पाहून लक्षात आलंच असेल की इथे मुलांना स्वावलंबी बनवले जाते. त्यांच्या विचारशक्तीला चालना दिली जाते, शारीरिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ आहेत. मुलाच्या मनाची शरीराची आणि शिक्षणाची उत्तम काळजी घेणारी संस्था म्हणून ‘ज्ञानदा’चे नाव घेता येते.
 

- तनुजा इनामदार

@@AUTHORINFO_V1@@